रोज उठून नाश्त्याला वेगळे काय करायचे असा प्रश्न महिलांना सतावत असतो. सतत पोहे, उपीट खाऊन कंटाळा तर येतोच पण त्यातून शरीराला म्हणावे तसे पोषणही मिळत नाही. अशावेळी झटपट होतील आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच पौष्टीक असतील असे पदार्थ केले तर? हे पदार्थ पारंपरिक असून गरमागरम असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत आवर्जून करु शकतो. पोटभरीचे आणि नाश्ता म्हणून प्रोटीन, कॅल्शियम आणि इतरही अनेक घटकांनी युक्त असलेले हे पदार्थ तुम्ही नाश्त्याला नक्की ट्राय करु शकता. (Authentic Easy Breakfast Tips) विशेष म्हणजे मुले भाज्या खात नसतील तर यामध्ये भाज्या, कोथिंबीर, दही अशा गोष्टी घालून यांची पौष्टीकताही वाढवता येते. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून करता येतील अशा ३ सोप्या पदार्थांची रेसिपी पाहूया (3 Healthy Breakfast Recipes)...
१. नाचणीचे आंबील
नाचणीचे पीठ साधारणपणे आपल्या घरात असते. लोह, कॅल्शियम, प्रोटीन आणि आरोग्यासाठी इतरही अनेक उपयुक्त घटक असलेल्या नाचणीच्या पीठाचे आंबील करायला एकदम सोपे आहे. पावसाळ्याच्या दिवसांत हे गरमागरम आंबील आवर्जून प्यायला हवे. यासाठी नाचणीच्या पीठात दही किंवा ताक घालावे. चवीला साखर, मीठ आणि तिखट आपल्या आवडीनुसार घालावे. हे सगळे चांगले एकजीव करुन घ्यावे आणि त्याला वरुन तेलात जीरे, लसूण आणि कडीपत्त्याची फोडणी द्यावी. वरुन भरपूर कोथिंबीर घालून हे गरमागरम आंबील प्यायला घ्यावे. पातळसर केल्यास ते मस्त होते आणि गरम प्यायलाही खूप चांगले लागते.
२. ज्वारीचे आप्पे
ज्वारीच्या पीठाच्या आपण साधारणपणे भाकरी करतो. पण नाश्त्यासाठीही वेगळं आणि तरीही हेल्दी असं काही करायचं असेल तर १ वाटी ज्वारीच्या पीठात अर्धी वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी दही घालावे. त्यात चवीसाठी मीठ, साखर आणि आलं-मिरची लसूण पेस्ट घालावी. भरपूर कोथिंबीर, थोडा ओवा घालून याचे आप्पे घालावेत. हे आप्पे नारळाची चटणी किंवा अगदी सॉससोबतही चांगले लागतात. ज्वारीचे पीठ पचायला हलके असल्याने लहान मुलांनाही आपण हे आप्पे देऊ शकतो. मुलं कोणत्या भाज्या खात नसतील तर यामध्ये आपण कोबी, बीट, गाजर, भोपळा यांसारख्या भाज्या किसून घालू शकतो.
३. डाळींचे डोसे
डाळी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याने आपण आहारात डाळींचा जास्तीत जास्त वापर करतो. डाळींमधून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात. मात्र आपण अनेकदा डाळींचे वरण, डाळींचे वडे अशा गोष्टी खातो. पण डाळींचे डोसेही अतिशय चविष्ट लागतात. भर पावसात मूग, उडीद, हरभरा अशा मिश्र डाळींचे किंवा एक एक डाळी भिजवून त्या मिक्सरवर वाटून त्याचे डोसे करता येतात. यामध्ये आलं-मिरची लसूण पेस्ट, लिंबू, मीठ, ओवा, कोथिंबीर असे घातल्यास या डोशांची चव आणखी चविष्ट लागते. तेव्हा रात्री झोपताना डाळ भिजत घातल्यास सकाळी मिक्सर केल्यावर झटपट जाळीदार डोसे निघतात. एकदा पोटभर नाश्ता झाला की दुपारपर्यंत पोटाची चिंता राहत नाही.