संध्याकाळी स्नॅक्स म्हणून काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. पण रोज चटपटीत खालं तर पोट बिघडेल, वजन वाढेल अशी भीती असतेच. ही भीती घालवून टाकायची असेल तर तांदळाचे असे पदार्थ आहेत जे संध्याकाळची चटपटीत खाण्याची भूक भागवतात तेही कमी कॅलरीजमधे. या पदार्थांनी पोट बिघडत नाही उलट ते पौष्टिक असून तोंडाला छान चव आणतात.शिजवलेल्या भातापासून स्नॅक्सचे पदार्थ बनतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण तांदळाचा उपयोग करुनही चटपटीत पदार्थ तयार होतात. एखाद्या दिवशी थोडा निवांत वेळ असेल तर हे पदार्थ तयार करुन ठेवता येतात आणि जेव्हा केव्हा खावेसे वाटतील तेव्हा खाता येतात. हे पदार्थ तयार करायला ना जास्त वेळ लागतो ना जास्त जिन्नस .
तांदळाची कचरी
छायाचित्र:- गुगल
हा उत्तर भारतीय पदार्थ असून तिथे त्याला चावल की कचरी असं म्हणतात. ती तयार करण्यासाठी दोन कप तांदुळ, एक चमचा कलौंजी आणि चवीनुसार मीठ एवढंच जिन्नस लागतं. इतर काही मसाले टाकायचे असतील तर ते खाण्याच्या वेळेस वरुन टाकावेत करताना घालू नये.
तांदळाची कचरी करताना..
सर्वात प्रथम तांदूळ वीस मिनिटं भिजत घालावेत. त्यानंतर ते वाटून घ्यावेत. वाटलेले तांदूळ थोडं पाणी, मीठ आणि कलौंजी घालून कुकरमधे शिजवून घ्यावेत. वाटलेले तांदूळ शिजवताना अगदी कमी पाणी वापरावं. ते शिजले की ते स्मॅशरनं स्मॅश करुन घ्यावेत. त्यात पाणी वाटत असेल तर ते काढून टाकावं. हे मिर्शण घट्ट पेस्टसारखं असायला ह्वं. चकलीच्या साच्यात हे मिर्शण घालून त्याच्या चकल्या पाडाव्यात. आता या चकल्या उन्हात ठेवून द्याव्यात. त्या सुकायला थोडा वेळ लागतो. पण करायला मात्र झटपट होतात. जेव्हा इच्छा होईल तेव्हा या कचरी तळून खाव्यात. यात 100 पेक्षाही कमी उष्मांक असतात. तळलेल्य कचरीवर आपल्या आवडीचे मसाले भुरभुरता येतात.
तांदळाची मुरुक्कू
छायाचित्र:- गुगल
उत्तर भारतात कचरी तर दक्षिण भारतात भाताची चकली जिल मुरक्कू म्हटलं जातं ती प्रसिध्द अहे. मुरुक्कू छान लागतात म्हणून ते आयते दुकानातून घेतले जातात. पण घरी तयार केले तर ते भरपूर होतात. मुरक्कू करताना तांदळासोबत डाळही वापरली जाते.मुरुक्कूसाठी अर्धा कप उडदाची डाळ, 2कप तांदूळ, अर्धा चमचा जिरे किंवा तीळ, चवीनुसार मीठ, 2-3 चमचे बटर, आवश्यकतेनुसार पाणी आणि तळण्यासाठी तेल हे जिन्नस लागतं.
मुरुक्कू तयार करताना..
आधी एका कढईत उडदाची डाळ एक दोन मिनिट भाजून घ्यावी. नंतर ती मिक्सरमधून वाटून चाळणीनं पीठ गाळून घ्यावं. आता एका भांड्यात दोन कप तांदूळ तीन चार तास पाण्यात भिजत घालावेत. नंतर पाणी निथळून घेऊन तांदूळ वाटून घ्यावेत. वाटलेले डाळ आणि तांदूळ एकत्र करावेत किंवा ते दोन्ही एकत्र वाटून घ्यावेत. यामुळे मुरुक्कूचा पोत चांगला येतो. आता यात मीठ, जिरे आणि वितळून घेतलेलं बटर घालून मऊ पिठ मळून घ्यावं. आता हे पीठ चकलीच्य साच्यात घालून त्याच्या गोल चकल्या कराव्यात. या चकल्या लगेच तळाव्यात आणि मग हवाबंद डब्यात ठेवून द्याव्यात.
तांदळाचं अप्पम
छायाचित्र:- गुगल
दक्षिण भारतातील हा तांदळाचा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. हे अप्पम तयार करण्यासाठी अडीच कप तांदूळ , 400 मिली. नारळाचं दूध, पाऊण कप पाणी, एक कप शिजवलेला भात आणि चवीनुसार मीठ आणि यीस्ट मिश्रण तयार करण्यासाठी एक छोटा चमचा अँक्टिव्ह ड्राय यीस्ट, अर्धा चमचा साखर, 3 चमचे गरम पाणी घ्यावं.
अप्पम तयार करताना..
आधी तांदूळ पाच सहा तास पाण्यात भिजत घालावेत. त्यानंतर यीस्टचं मिश्रण तयर करावं. एका भांडयात यीस्ट मिश्रणाचं सर्व साहित्य घालून ठेवावं. ते पाच दहा मिनिटं तसंच ठेवावं. मग यात बुडबुडे येतात. आता नारळाचं दूध, भिजवलेले तांदूळ , शिजवलेला भात आणि पाणी घालून ते वाटून घ्यावेत. मिश्रण चांगलं सरसरीत करावं. आता यात यीस्टचं मिश्रण घालावं. आता हे मिश्रण आठ ते बारा तासांसाठी आंबवायला ठेवावं. ते आंबवतानाच त्यात मीठ घालावं.सकाळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकळी स्नॅक्स म्हणूनही करता येतात. डोशाच्या तव्यावर पॅनकेकसारखे ते करावेत. ते भाजताना तेल किंवा बटर काहीही वापरलं तरी चालतं. हे पॅनकेक अवघ्या एक दोन मिनिटात तयार होतात. अप्पमचं पीठ तयार करुन फ्रीजमधे ठेवून बरेच दिवस वापरता येतं.तांदळाचे हे चविष्ट पदार्थ असतील तर चटपटीत खाण्याची हौस भागलीच म्हणून समजा.