सुटीच्या दिवशीचा चविष्ट आणि आटोपशीर बेत म्हणजे जेवायला राजमा आणि भात (rajma and rice) करायचा. हा बेत आटोपशीर असला तरी यासाठी राजमा आठवणीनं भिजत घालावा लागतो. पण राजमा भिजत घालण्यास विसरलात तर मात्र राजमा राईसचा बेत कॅन्सल करावा लागतो. पण या लेखातील राजमा झटपट शिजवण्याच्या 3 युक्त्या (tips for cook rajma instantly without soaking) वाचल्या तर राजमा भिजत घालण्यास विसरलो तरी टेन्शन येणार नाही.
Image: Google
राजमा झटपट शिजवण्यासाठी
1. राजमा झटपट शिजवण्यसाठी बेकिंग सोड्याची ट्रिक वापरता येते. बेकिंग सोड्याचा वापर करत राजमा शिजवण्याची ही सोपी युक्ती आहे. यासाठी पहिले पाणी गरम करावं. गरम पाण्यात राजमा भिजत घालावा. यात थोडं मीठ आणि थोडा बेकिंग सोडा घालावा. अशा पध्दतीनं राजमा 1 तास भिजत ठेवावा. नंतर कुकरमधून 3 शिट्ट्या करुन घेतल्यास राजमा लगेच शिजतो.
2. बेकिंग सोड्याप्रमाणे इनोही प्रत्येकाच्या घरात असतोच. पोटाचे आणि पचनाचे विकार उद्भवल्यास वापरला जाणारा इनो राजमा झटपट शिजवण्यासाठीही वापरता येतो. राजमा झटपट भिजवून शिजवण्यासाठी इनो वापरताना आधी पाणी गरम करुन घ्यावं. गरम पाण्यात राजमा घालावा. यात पाव चमचा इनो घालून अर्धा तास राजमा भिजू द्यावा. नंतर प्रेशर कुकरमध्ये राजमा घालून कुकरला 3 शिट्या घेतल्यास राजमा झटपट शिजतो.
Image: Google
3. समजा घरात बेकिंग सोडा आणि इनो नसला तरी चिंता करण्याचं कारण नाही. पाणी आणि मीठ यांचा वापर करुनही राजमा झटपट शिजवता येतो. ही युक्ती वापरताना आधी राजमा पाण्यानं चांगला धुवून घ्यावा. धुतलेला राजमा प्रेशर कुकरमध्ये घालावा. त्यात पाणी आणि मीठ घालावं. कुकरला झाकण लावून एक शिट्टी घ्यावी. गॅस बंद करावा. कुकरमध्ये राजमा 2 तास तसाच राहू द्यावा. दोन तासांनी गॅस लावून पुन्हा कुकरला 3 शिट्या घ्याव्यात. या युक्तीनं राजमा झटपट शिजतो.