Join us  

ग्रेव्हीत दही घातल्यावर ते फाटून ग्रेव्ही खराब होऊ नये म्हणून ३ टिप्स, दही घातल्यावर वाढेल चव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2023 1:10 PM

3 Tips To Prevent Spoilage Of Gravy After Adding Curd To Gravy : पदार्थात दही घालून गरम करावे की नाही यावर वाद असू शकतो, पण घातलंच दही तर निदान ते फाटू नये म्हणून काळजी घ्या.

दही हे आपल्याकडे जेवणात वापरले जाते. जेवणात दह्याचा वापर केल्यास अन्नाची चव वाढते. त्याचबरोबर आपल्या शरीरास आवश्यक असलेली अनेक पोषक द्रव्ये देखील मिळतात. दही खाल्ल्याने पोटाला आणि शरीराला थंडावा मिळतो. दह्यामध्ये असणारे बॅक्टेरिया आपल्या केसांना व त्वचेला निरोगी बनवतात. तसेच दह्यामध्ये कॅल्शियम असल्याने ते आपल्या हाडांना, दातांना, नखांना मजबूत बनवण्याचे काम करते. तसेच दह्याच्या नियमित सेवनाने आपल्या मांसपेशी चांगल्या पद्धतीने काम करतात. इतके बहुगुणी दही खाणे गरजेचे असते. रस्सेदार आणि ग्रेव्हीच्या भाज्यांची चव वाढवण्यासाठी आपण त्यात दह्याचा वापर करतो. दह्याचा वापर केल्याने या रस्सेदार भाज्या अधिक घट्ट आणि टेस्टी होतात. परंतु या रस्सेदार भाज्यांमध्ये दही घालताना कधी कधी हे दही फुटते आणि आपल्या सगळ्या ग्रेव्हीची टेस्ट बिघडते. ग्रेव्हीत दही घातल्यानंतर ते फुटल्यावर ग्रेव्हीची चव बिघडून ती वाया जाऊ नये म्हणून काही सोप्या टिप्सचा वापर आपण करू शकतो(3 Tips To Prevent Spoilage Of Gravy After Adding Curd To Gravy).

ग्रेव्हीत दही घालतांना ते फुटू नये म्हणून... 

घरांत काही खास फंक्शन किंवा सण असेल तर आपण ग्रेव्ही किंवा रस्सेदार भाज्यांचा बेत आखतो. या भाज्यांची चव वाढवण्यासाठी आपण त्यात दही घालून त्यांची लज्जत आणखीन वाढवतो. पण कधी कधी ग्रेव्हीमध्ये दही घालताना ते दही फुटून ग्रेव्ही खराब होते. अशावेळी या सोप्या टीप्सचा वापर करून दही फुटण्यापासून वाचवू शकता. 

भाजीच्या ग्रेव्हीमध्ये दही घातल्यानंतर ते फुटू नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दल सुप्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया masterchefpankajbhadouria या इंस्टाग्राम पेजवरून काही सोप्या टीप्स शेअर केल्या आहेत.

 

 

टीप १ :- भाजीच्या ग्रेव्हीमध्ये दही घालणार असाल तर ते दही आधी चांगले फेटून घ्या. दही चांगले फेटून घेतल्यावर ग्रेव्हीमध्ये घातल्यास दही फुटत नाही. 

टीप २ :- ग्रेव्हीमध्ये दही घालताना आपला गॅस पूर्ण बंद किंवा मंद आचेवर ठेवावा. दही घालताना गॅस मोठ्या आचेवर ठेवणे टाळा. जेव्हा आपण कोणत्याही ग्रेव्हीमध्ये दही घालत असताना ग्रेव्ही उकळी फुटलेल्या स्थितीत नसावी. अशा स्थितीत ग्रेव्ही मध्ये दही घातल्यास ते फुटते. म्हणून गॅस मंद आचेवर ठेवून ग्रेव्हीला देखील उकळी फुटलेली नसावी अशावेळी ग्रेव्हीत दही घालावे. 

टीप ३. :- ग्रेव्हीमध्ये दही घातल्यानंतर, दही ग्रेव्हीमध्ये एकजीव होईपर्यंत ग्रेव्ही चमच्याच्या मदतीने ढवळत राहावी. ग्रेव्हीमध्ये दही संपूर्णपणे मिक्स होईपर्यंत चमच्याने हलवत राहावे. 

या सोप्या ३ टीप्स फॉलो करून आपण ग्रेव्हीत घातलेल दही फुटण्यापासून वाचवू शकतो. 

टॅग्स :अन्नकिचन टिप्स