Lokmat Sakhi >Food > थंड गारठल्या रात्री जेवणात करा 3 प्रकारचे सूप; भूकही भागेल, मूडही होईल खूश

थंड गारठल्या रात्री जेवणात करा 3 प्रकारचे सूप; भूकही भागेल, मूडही होईल खूश

स्वयंपाकाचा कंटाळा आणि लागलेली भूक या दोन्ही गरजा भागवायच्या असतील तर मग सूपसारखा दुसरा चविष्ट, पोटभरीचा आणि पौष्टिक पर्याय नाही. तीन प्रकारचे सूप केवळ एक वाटीभर घेतलं तरी पोट भरतं. जे वेटलाॅससाठी योग्य सूपच्या शोधात असतील त्यांच्यासाठी हे तीन प्रकारचे सूप म्हणजे 'हॅपी सूप बाउल' ठरतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 04:52 PM2022-01-14T16:52:32+5:302022-01-14T17:07:43+5:30

स्वयंपाकाचा कंटाळा आणि लागलेली भूक या दोन्ही गरजा भागवायच्या असतील तर मग सूपसारखा दुसरा चविष्ट, पोटभरीचा आणि पौष्टिक पर्याय नाही. तीन प्रकारचे सूप केवळ एक वाटीभर घेतलं तरी पोट भरतं. जे वेटलाॅससाठी योग्य सूपच्या शोधात असतील त्यांच्यासाठी हे तीन प्रकारचे सूप म्हणजे 'हॅपी सूप बाउल' ठरतील.

3 types of soup for a dinner in cold night; Hunger will go away and mood will be happy with these 3 types of soups | थंड गारठल्या रात्री जेवणात करा 3 प्रकारचे सूप; भूकही भागेल, मूडही होईल खूश

थंड गारठल्या रात्री जेवणात करा 3 प्रकारचे सूप; भूकही भागेल, मूडही होईल खूश

Highlightsपालकाचं पौष्टिक सूप हे सपक, मिळमिळीतच असलं पाहिजे असं नाही. तर ते मसालेदार चविष्टही करता येतं.बीट आणि नारळाचं मोहक आणि चविष्ट सूप हे हाडांचं आरोग्य आणि चयापचय यासाठी लाभदायक असतं. राजमा आणि पास्ता प्रोटिन रिच सूप तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लाभदायक 

हिवाळ्यात समजा संध्याकाळी खूप हुडहुडी भरवणारी थंडी असेल तर स्वयंपाकाचा कंटाळा येतो. पण भूक मात्र लागलेली असते. आता स्वयंपाकाचा कंटाळा आणि लागलेली भूक या दोन्ही गरजा भागवायच्या असतील तर मग सूपसारखा दुसरा चविष्ट, पोटभरीचा आणि पौष्टिक पर्याय नाही.  तीन प्रकारचे सूप केवळ एक वाटीभर घेतलं तरी पोट भरतं. जे वेटलाॅससाठी योग्य सूपच्या शोधात असतील त्यांच्यासाठी हे तीन प्रकारचे सूप म्हणजे हॅपी सूप बाउल ठरतील. कारण या तीन प्रकारच्या सूपमध्ये पोट भरण्याचा, भरपूर वेळ भरलेलं ठेवण्याचा गुणधर्म आहे.  हे सूप चविष्ट लागतात आणि या सूपमुळे चयापचय क्रिया सुधारते , पचन नीट होतं, त्यामुळे वजन कमी करण्यास हे सूप फायदेशीर ठरतात. 

Image: Google

1. काॅटेज चीज घातलेलं  पालकाचं मसालेदार सूप 

 हिवाळ्यात हिरवागार आणि कोवळा पालक मिळतो. पालक म्हणजे पोषणाचा खजिना.  पालकाचे विविध पदार्थ केले जातात. पण पालक सूप अनेकांना खूपच सपक वाटतं. पण पालकाच्या इतर कोणत्याही पाककृतीतून पालकातील सर्व गुणधर्मांचा फायदा शरीराला होत नाही तितका तो पालकाचं सूप पिल्यानं होतो. पालकाचं पौष्टिक सूप सपक, मिळमिळीतच असलं पाहिजे असं नाही. तर ते मसालेदार चविष्टही करता येतं. या पध्दतीने केलेलं सूप घेतलं तर आरोग्यास पालकात असलेल्या सर्व पोषण मुल्यांचा फायदा होतो. 

हे सूप तयार करण्यासाठी  1 मोठा चमचा मोहरीचं तेल, 1 मध्यम आकाराचा पांढरा कांदा, बडीशेपाची पानं, अर्धा चमचा अगदी बारीक चिरलेलं आलं, 6-7 कढीपत्त्याची पानं, अर्धा छोटा चमचा हळद, 1छोटा चमचा मोहरी, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 कप लाल मसूर डाळ,  1 लिटर उकळून घेतलेल्या भाज्यांचा स्टाॅक ( भाज्यांचं दाटसर पाणी)  उकळलेल्या भाज्यांचा स्टाॅक करण्यासाठी  1 जुडी आंबट चुका, एक छोटी जुडी पालक, बडिशेपाची पानं, अर्धा  कप मेथीची पानं, मूठभर ताजी कोथिंबीर  घ्यावी. हे सर्व निवडून आणि धुवून घ्यावं. मग सर्व एका मोठ्या कढईत घालून त्यात पाणी घालून  हे चांगलं उकळून घ्यावं. उकळल्यानंतर गॅस बंद करावा. नंतर कोमट झाल्यावर भाज्या पिळून घ्याव्यात. मग हे पाणी गाळून घ्यावं.   उकळलेल्या भाज्यांचा स्टाॅक अशा पध्दतीने तयार करतात. सूपसाठी या स्टाॅकसोबत . 1 ते 2 कप चिरलेली मेथी , अर्धा कप काॅटेज चीज घ्यावं, गरम मसाला, चाट मसाला,  1 मोठा चमचा मोहरीचं तेल आणि थोडं ऑलिव्ह ऑइल घ्यावं. 

Image: Google

काॅटेज चीज घातलेलं मसालेदार पालक सूप करताना आधी कढईत मोहरी तेल तापवायला ठेवावं. तेल तापलं की तेलावर मीठ घातलेलं पाणी शिंपडावं. यामुळे मोहरीच्या तेलातला उग्रपणा कमी होतो. मग तेलात मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यत चिरलेली मिरची, आल्याचे बारीक केलेले तुकडे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली बडिशेपाची पानं  कढीपत्ता घालावा.  यामुळे सूपला खूप छान स्वाद येतो.  काॅटेज चीजचे तुकडे करावेत. त्याला गरम मसाला, मीठ, काळी मिरे पूड आणि थोडं ऑलिव्ह ऑइल लावून ते ओव्हनमधे 15-20 मिनिटं भाजून घ्यावेत. तोपर्यंत फोडणी घातलेल्या मिश्रणात भिजवलेली मसूर डाळ आणि उकळलेल्या भाज्यांचा स्टाॅक टाकावा. डाळ मऊ होईपर्यंत हे मंद गॅसवर उकळू द्यावं. नंतर यात  चिरलेल्या  थोडा पालक आणि मेथी चिरुन घालावी.  हे घातल्यानंतर एक मिनिट हे सूप उकळू द्यावं. एकदा का हे सूप तयार झालं की त्यात थोडा बर्फ घालावा. हे सूप मग एका बाऊलमधे घ्यावं.  सूपवर चाट मसाला घालावा आणि भाजलेले काॅटेज चीजचे तुकडे घातले की सूप खायला तयार होतं. 

Image: Google

2. बीट आणि नारळाचं सूप

हे सूप आरोग्यासाठी लाभदायक असतं तसंच या सूपचा रंग खूपच मोहक असतो. बीट, नारळाचं दूध आणि लिंबू यांच्या एकत्रित स्वादाचं हे चविष्ट सूप फोलेट म्हणजेच ब9 या जीवनसत्त्वानं समृध्द असतं.  बीटामुळे रक्तवाहिन्यांची होणारी हानी नियंत्रित होते, हदयरोगाचा धोका टळतो. या सूपमधील नारळाच्या दुधामुळे या सुपात मॅग्निज हा घटक असतो. हाडांचं आरोग्य आणि चयापचय यासाठी हा घटक लाभदायक असतो.
बीट आणि नारळाचं सूप करण्यासाठी  2 कांदे चिरलेले, ऑलिव्ह ऑइल, 1 गाजर बारीक चिरलेलं, अर्धा चमचा बारीक चिरलेलं आलं, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, थोडा बारीक चिरलेला गवती चहा, 5-6 कढीपत्त्याची पानं, 1 बीट बारीक कापलेलं, 1 मोठा चमचा व्हाइट व्हिनेगर, 250 मिली भाज्यांचा स्टाॅक, मीठ, मिरेपूड, 200 मिली नारळ दूध आणि 1 मोठा चमचा फ्रेश क्रीम घ्यावं. 

Image: Google

सूप करताना कढईत आधी ऑलिव्ह तेल तापवावं. त्यात चिरलेला कांदा, गाजर, आल्याचे तुकडे घालावे. ते थोडे परतून घ्यावेत. नंतर त्यात चिरलेली मिरची, चिरलेला गवती चहा, कढीपत्ता घालून ते चांगलं परतून घ्यावं. नंतर यात चिरलेलं बीट घालावं. बीट यात चांगलं मिसळून घ्यावं. सर्व नीट मिसळलं गेलं की त्यात व्हिनेगर घालावं. व्हिनेगर घातल्यावर हे पटकन हलवून घ्यावं. त्यात भाज्यांचा स्टाॅक घालावा. (भाज्यांचा स्टाॅक करण्यासाठी लसूण, स्टार फूल, मसाला वेलची, दालचिनी असे उग्र मसाले, बारीक चिरलेला कांदा, गारजर, सेलरी, थोडे मश्रुम एकत्र करावं. त्यात पाणी घालून ते चांगलं उकळावं. यातील गाजर मऊ झालं की गॅस बंद करावा. हे पाणी गाळून घ्यावं. अशा प्रकारे भाज्यांचा स्टाॅक तयार करता येतो. उरला तर तो फ्रिजमधे ठेवता येतो.) भाज्यांचा स्टाॅक घातला की त्यात मीठ, काळी मिरी पूड घालावी. नारळाचं दूध घालून मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. त्यात एक चमचा फ्रेश क्रीम घालावं. सूपला हलकीशी उकळी काढली की सूप खाण्यास तयार होतं. 

Image: Google

3.  राजमा पास्ता सूप

मोठ्यांपासून लहानांपर्यंत हे सूप सगळ्यांनाच खूप आवडतं. थोड्या भाज्या घातलेलं आंबट गोड चवीचं हे सूप छान लागतं. या सूपमधील राजम्यामुळे शरीराला आवश्यक असलेले प्रथिनं आणि फायबर मिळतं. राजम्यामधे कर्बोदकांचं प्रमाण जास्त असल्यानं राजमा नीट शिजवायला हवा.

राजमा पास्ता सूप करण्यासाठी  1 मोठा चमचा ऑलिव्ह तेल, छोटा पाव चमचा हिंग, 1 मोठा चमचा बडिशेप पावडर,  1 कप सिमला मिरची,  1 बटाटा अर्धवट शिजवलेला बारीक तुकडे केलेला, 1 गाजर थोडं अर्धवट शिजलेलं बारीक कापलेलं, अर्धा कप राजमा,  अर्धा कप अर्धवट शिजवलेला राजमा, 1 कप होलव्हीट पास्ता उकडून घेतलेला, टमाटा चिंचेचं साॅस, मीठ, मिरेपूड, पुदिन्याची पानं आणि थोडं चीज घ्यावं. 

Image: Google

हे सूप करताना आधी कढईत तेल तापवून घ्यावं. त्यात हिंग आणि बडिशेप पावडर घालावी. हे काही सेकंद परतून घ्यावं. नंतर त्यात बारीक चिरलेल्या भाज्या घालाव्यात. सर्वात आधी सिमला मिरची घालून परतून घ्यावी. नंतर बटाटा, गाजर. घालावं. राजमा उकळलेलं पाणी घालावं. हे सर्व नीट हलवून घ्यावं. नंतर यात शिजलेला राजमा घालावा. हे सर्व नीट मिसळून घ्यावं. राजमा नीट मिसळला की मग उकडलेला पास्ता घालावा. पास्ता घातल्यावर 1-2 टमाट्याची प्युरी आणि थोडा चिंचेचा कोळ घालावा. आपल्याला जेवढं घट्ट, पातळ हवं  त्या पध्दतीने त्यात पाणी घालावं. वरुन त्यात मीठ आणि मिरपूड घालावी. पुदिन्याची पानं चिरुन वरुन घालावी. नंतर कढई झाकून मिश्रण चांगलं उकळू द्यावं. साधारण 5-10 मिनिटांनी मिश्रण उकळतं आणि दाटसरही होतं. गॅस बंद केल्यावर पुन्हा वरुन चिरलेला पुदिना आणि किसलेलं चीज घालावं.

Web Title: 3 types of soup for a dinner in cold night; Hunger will go away and mood will be happy with these 3 types of soups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.