थंडीच्या दिवसात ठराविक काळाने भूक लागतेच. जेवणाची लज्जत वाढवायची असेल तर ताटातली डावी आणि उजवी बाजू व्यवस्थित असायला हवी. त्याच त्या भाज्या, पोळी, भात, आमटी यांसोबत जेवणात एखादी चटणी असेल तरी जेवणाची चव बदलते. थंडीच्या दिवसांत तर शरीराची ऊर्जा भरुन काढण्यासाठी पौष्टीक आणि संतुलित आहार घेणे गरजेचे असते. आपली आई, आजी अगदी झटपट आणि तरीही चविष्ट अशा आवर्जून करायच्या अशा काही चटण्या करुन ठेवल्या तर एखादी न आवडणारी भाजीही लहान मुले आणि सगळेच सहज खातात. तोंडी लावणे हा महाराष्ट्रीयन जेवणातील एक महत्त्वाचा भाग. भुकेच्या वेळी पटकन काही करण्यापेक्षा या चटणी पोळीचा रोलही खाता येतो. इतकेच काय तर गरम भात वरण आणि दाण्याची किंवा तीळाची चटणी म्हणजे खरं सुख. दाणे, तीळ आणि कडीपत्ता हे आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक घटक. पाहूया अशाच काही सोप्या आणि आरोग्यासाठी उपयुक्त अशा चटण्यांची रेसिपी
लसणाची (दाण्याची) चटणी
साहित्य -
भाजलेले दाणे - २ वाट्या लसूण - पाव वाटी तिखट - चवीपुरते मीठ - चवीपुरते जीरे - अर्धा चमचा तेल १ चमचा
कृती
१. पॅनमध्ये एक चमचा तेल घालून त्यात लसूण भाजून घ्यावा२. त्याच तेलात दाणे घालून ते खरपूस भाजून घ्यावेत३. हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यात घालून एकदा मिक्सर फिरवून घ्यावा४. अर्धवट फिरवल्यावर झाकण उघडून त्यात तिखट, मीठ, जीरे घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यावे५. ही चटणी अतिशय चविष्ट लागते.
तीळाची चटणी
साहित्य
तीळ - एक वाटी दाणे - अर्धी वाटी लसूण - पाव वाटी मीठ - चवीनुसार तिखट चवीनुसार
कृती
१. पॅनमध्ये तेल घेऊन त्यावर लसून परतून घ्या२. त्याच पॅनमध्ये दाणे घालून ते खरपूस भाजा, थोडा वेळाने त्यातच तीळ घालून तेही भाजून घ्या.३. गार झाल्यावर लसूण, तीळ आणि दाणे मिक्सरमध्ये घालून हलके फिरवून घ्या. ४. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि तिखट घालून फिरवून घ्या
कडीपत्त्याची टचणी
साहित्य
कडीपत्ता - दिड वाटी डाळं- अर्धी वाटी काळी मिरी - १० ते १२ दाणे लाल मिरची - ४ ते ५ चिंच - ५ ते ७ बुटुक मीठ - चवीनुसार साखर - एक चमचा
कृती
१. कडीपत्ता धुवून वाळवून घ्यावा२. वाळलेला कडीपत्ता कढईत कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावा ३. त्यानंतर डाळं, काळी मिरी आणि लाल मिरच्या परतून घ्याव्यात४. हे सगळे मिक्सरच्या भांड्यात घालून चवीनुसार मीठ, साखर आणि चिंच घालून मिक्सर करावे५. कडीपत्ता आरोग्यासाठी अतिशय चांगला असून ही पूडचटणी ब्रेड, गरम भात, पोळी, उपमा, इडली अशा कोणत्याही पदार्थांवर चांगली लागते.