Join us  

थंडीत करा खास ३ प्रकारची इम्युनिटी बूस्टर लोणची; चवीला बेस्ट सिझनल सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 2:55 PM

Food and recipe: हिवाळ्यात केली जाणारी लोणची नुसतीच आपली रसनातृप्ती करणारी नसतात, तर इम्युनिटी बुस्टर (pickle recipe in marathi) म्हणून ती कामं करतात.. म्हणून हिवाळ्यातली ही आरोग्यदायी लोणची घालायला आणि खायला पाहिजेतच...

ठळक मुद्दे गाजर, आवळा, लसूण लोणचं कसं करायचं याच्या सोप्या रेसिपीही बघा..  केवळ चव बदल म्हणून नाही तर आरोग्यासाठी ही लोणची खाणं महत्त्वाचं मानलं जातं.

उन्हाळयात लोणच्याचा जेवढा थाट केला जातो, तेवढा तो हिवाळ्यात आपण करत नाही. पण खरंतर उन्हाळ्यासारखंच महत्त्व हिवाळ्यातल्या चटकदार लोणच्यांना द्यायला पाहिजे. कारण हिवाळ्यातली लोणची ही उन्हाळी लोणच्यांपेक्षाही अधिक पौष्टिक आणि पोषक मानली जातात. त्यामुळे केवळ चव बदल म्हणून नाही तर आरोग्यासाठी ही लोणची खाणं महत्त्वाचं मानलं जातं. गाजर, आवळा, बोरं, ओली हळद याप्रमाणेच  हिवाळ्यात आलं- लसूण लोणचं खाणंही तब्येतीच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक असतं. या बाबतीत आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एक पोस्ट नुकतीच शेअर केली असून ती पोस्टही वाचा आणि गाजर, आवळा, लसूण लोणचं कसं करायचं याच्या सोप्या रेसिपीही बघा.. 

 

१. कसं करायचं आवळ्याचं लोणचं (recipe of aamla pickle)- सगळ्यात आधी १ चमचा मोहरी, १ चमचा जिरं, १ चमचा अख्खे धने एका कढईत घ्या. हे सगळं मध्यम आचेवर २ ते ३ मिनिट भाजून घ्या.- मोहरी तडतड करायला लागली की गॅस बंद करा.- यानंतर गरम तव्यावर अर्धा चमचा मेथीचे दाणे घाला आणि एखादा मिनिट परतून घ्या. गरम तव्यावर मेथ्या भाजू नका. आता हा मसाला थोडा थंड झाला की मिक्सरमध्ये फिरवून त्याची रवाळ पूड करा. हा झाला लोणच्याचा मसाला.

video credit- Madhura's recipe

- एका कढईत पाव कप मोहरीचं तेल घ्या. त्यात एक कप आवळ्याचे तुकडे घाला आणि आवळा पिवळट होईपर्यंत मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिट परतून घ्या. - गॅस बंद करून आवळ्याच्या फोडी थोड्या थंड होऊ द्या. त्यानंतर त्यात आपण केलेला मसाला घाला. तिखट आणि मीठ चवीनुसार घाला. हे मिश्रण एक ते दिड तास थंड होऊ द्या आणि त्यानंतर काचेच्या बरणीत भरून ठेवा.

 

२. लसूण लोणचं रेसिपी (recipe of garlic pickle)- लसूण सोलून घ्या. आपण या लोणच्यासाठी अख्खा लसूण वापरणार आहोत. त्यामुळे तो चिरू नका.- जेवढ्या पाकळ्या घेतल्या असतील, त्यानुसार मीठ आणि हळद घ्यावे आणि एका भांड्यात एकत्र करून टाकावे.- दोन ते तीन तास हे मिश्रण असेच ठेवावे.- आता लोणच्याचा मसाला तयार करून घ्यावा. मसाला तयार करण्यासाठी बडीशेप, मीरे, लवंग, मोहरीची डाळ किंवा मोहरी हे साहित्य कढईत गरम करून घ्यावे. थंड झाल्यानंतर ते मिक्सरमधून फिरवून त्याचा मसाला करावा.

- लोणच्यासाठी लागणारे तेल गरम करून घ्यावे आणि नंतर थंड होऊ द्यावे.- दोन- तीन तासानंतर लसूणाला पाणी सुटलेले असेल. हे पाणी निथळून घ्यावे.- लसूणाच्या पाकळ्यातील पाणी संपूर्णपणे निथळून गेले की त्यात मसाला, गुळ, तिखट आणि तेल टाकावे.- तेल आताच नाही टाकले तरी चालते. जेव्हा लोणचे खायचे असेल, तेव्हा त्यावर ताजी, करकरीत फोडणी करून टाकली तरी चालते.- एक- दोन दिवसातच ते मुरतं आणि खाण्यायोग्य होतं.

 

३. गाजर लोणचं रेसिपी (recipe of gajar/ carrot pickle)- गाजर धुवून स्वच्छ पुसून घ्यावे आणि त्याच्या बारीक फोडी कराव्या. तेल गरम करा त्यात लसुण आणि आलं टाका. लालसर रंग आल्यानंतर त्यात चिरलेले गाजर, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, मोहरीची डाळ आणि बारीक केलेला गुळ, २ चमचे लिंबाचा रस टाका. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि थंड झाले की काचेच्या बरणीत भरून ठेवा.

  

टॅग्स :अन्नपाककृतीथंडीत त्वचेची काळजीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.