३१ डिसेंबर म्हणजे सेलिब्रेशन करायचा दिवस. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येतो आणि हा वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करतो. एकत्र येत सेलिब्रेशन म्हणजे टीव्ही, गेम्स, गप्पागोष्टी अशी धमाल असते. अशावेळी जेवायला काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असे पदार्थ असतील तर या इयर एंड पार्टीला मज्जा येते. यात अगदी स्टार्टरपासून डेझर्टपर्यंत बरंच काही करता येऊ शकतं. पण झटपट आणि सोपे मेन्यू असतील तर महिलांनाही थोडा मोकळा वेळ मिळतो आणि सगळ्यांसोबत मज्जा करता येते. म्हणूनच आज आपण असे काही सोपे पर्याय पाहणार आहोत जे करायला सोपे, खायला चविष्ट आणि तरीही झटपट होऊ शकतात. पाहूयात असेच काही सोपे पर्याय (31 st December Dinner Party Menu)...
१. मटार उसळ ब्रेड
सध्या मटारचा सिझन असून बाजारात हिरवेगार मटार मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. खोबरं, मिरची, कोथिंबीर, आलं, मिरची यांची पेस्ट करुन त्यामध्ये ही उसळ अतिशय छान होते. गव्हाचा ब्रेड किंवा साध्या ब्रेडसोबत ही गरमागरम उसळ फारच चविष्ट लागते. थंडीच्या दिवसांत हा मेन्यू सगळ्यांना आवडणारा असतो. यासोबत सॅलेड, एखादा पुलाव किंवा वेगळा भात आणि सगळ्यांना आवडेल असे गुलाबजाम, जिलेबी असे काहीही आणू शकतो.
२. व्हेज बिर्याणी आणि तळण
थंडीच्या काळात बाजारात भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. अशा भरपूर भाज्या घालून एकच भात केला तर रात्रीच्या जेवणाला चांगला पर्याय होतो. यासोबत एखादी कोशिंबीर, तळण असं काही केलं तरी चालतं. सोबत एखादा स्टार्टरचा पर्याय विकत आणला तरी चालतो. नाहीतर भजी, वडे असंही काही करता येऊ शकतं. पण भात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडत असल्याने आणि पोटभरीचा होत असल्याने हा चांगला पर्याय होऊ शकतो.
३. पराठे आणि सूप
मेथीचे किंवा बटाट्याचे पराठे केले तर त्यासोबत एखादी चटणी आणि सूप किंवा सार असा बेतही दमदमीत आणि चांगला होऊ शकतो. हे पराठे आधीच करुन ठेवले तरी चालतात किंवा ऐनवेळीही करता येतात. थंडीच्या दिवसांत गरम सूप प्यायला चांगले वाटत असल्याने हा चांगला पर्याय होऊ शकतो.
४. चाट
चाट हा सगळ्यांच्याच आवडीचा प्रकार. मग अगदी भेळीपासून ते रगडा पुरी, रगडा पॅटीस काहीही असो चाटचे सगळेच पदार्थ आवडीने खाल्ले जातात. यातच थोडं पौष्टीक करायचं असेल तर मूग, काकडी, टोमॅटो यांचा जास्त प्रमाणात वापर करायला हवा. चिंच गुळाची चटणी, तिखट चटणी, फरसाण या गोष्टींनी चाटला चांगली चव येते.