Lokmat Sakhi >Food > अळूवडीचे 4 खमंग प्रकार, अनुष्का शर्मालाही आवडलेल्या खमंग पारंपरिक अळूवडीची मस्त रेसिपी

अळूवडीचे 4 खमंग प्रकार, अनुष्का शर्मालाही आवडलेल्या खमंग पारंपरिक अळूवडीची मस्त रेसिपी

अनुष्कानं शेअर केला मराठमोळ्या जेवणाच्या ताटाचा फोटो; फोटोत भाव खाऊन गेलेल्या खमंग अळूवडीचे 4 प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 08:07 PM2022-04-12T20:07:02+5:302022-04-12T20:16:38+5:30

अनुष्कानं शेअर केला मराठमोळ्या जेवणाच्या ताटाचा फोटो; फोटोत भाव खाऊन गेलेल्या खमंग अळूवडीचे 4 प्रकार

4 delicious types of Aluvadi, Anushka Sharma's favorite crispy traditional Aluvadi recipe | अळूवडीचे 4 खमंग प्रकार, अनुष्का शर्मालाही आवडलेल्या खमंग पारंपरिक अळूवडीची मस्त रेसिपी

अळूवडीचे 4 खमंग प्रकार, अनुष्का शर्मालाही आवडलेल्या खमंग पारंपरिक अळूवडीची मस्त रेसिपी

Highlights एका रोलसाठी 5-6 अळूची पानं घेतल्यास अळूवडी गुटगुटीत होते.दुधातली अळूवडी करण्यासाठी नारळाचं दूध  घ्यावं. अळूची पानं अगदीच लहान आकाराची असल्यास  अळू बारीक चिरुन कोथिंबीर वडीप्रमाणे अळूवडी करता येते. 

अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आवडी निवडी सोशल मीडियावर सतत व्हायरल होत राहातात. अनुष्काची खवय्येगिरीही सोशल मीडियाला चांगलीच परिचित आहे. इन्स्टाग्रामवर अनुष्कानं इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये एक फोटो शेअर केला. हा फोटो आहे केळीच्या पानावरील महाराष्ट्रीयन जेवणाचा. रविवारचा मेन्यू म्हणून अनुष्कानं जेवणासाठी खास महाराष्ट्रीयन मेन्यूची निवड केली.

Image: Google

महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत अळूवडी शिवाय कसा पूर्ण होणार? अनुष्कानं शेअर केलेल्या फोटोत डाव्या बाजूला दिसणाऱ्या अळूवडीनं खवय्यांचं लक्ष वेधलं गेलं. जेवणात आवर्जून अळूवडीला स्थान देणाऱ्या अनुष्काच्या या खवय्येगिरीचं समाज माध्यमात कौतुक झालं. अनुष्काला आवडणारी ही अळूवडी महाराष्ट्रीयन जेवणाच्या प्रेमात असणाऱ्या प्रत्येकालाच आवडते. विविध प्रकारे खमंग चवीची अळूवडी करता येते. 

Image: Google

पारंपरिक अळूवडी

अळूवडी करण्यासाठी अळूची काळसर देठाची मोठाली किंवा मध्यम आकाराची पानं घ्यावी.  शिरा व्यवस्थित काढून घ्याव्यात. पानावरुन अलगद लाटून पानं तयार करुन घ्यावीत. पारंपरिक पध्दतीची अळूवडी करण्यासाठी 6 अळूची पानं (5-6 अळूची पानं एका संचात असतील तर अळूवडी छान गुटगुटीत होते.) 2 वाटी बेसन, 2 चमचे आलं लसूण मिरची पेस्ट,  2 चमचे लाल तिखट,  अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, चिमूटभर साखर,दिड चमचा गोडा मसाला, पाऊण वाटी किसलेला गूळ, अर्धी वाटी चिंचे कोळ, आवडत असल्यस धने-जिरे पावडर किंवा गरम मसाला घ्यावा. 

Image: Google

अळूवडी करताना सर्व साहित्य एका मोठ्या भांड्यात एकत्र करुन पाण्यानं भिजवावं. मिश्रण एकजीव होईल अशा प्रकारे भिजवावं. मिश्रण सैलसर असलं तर पानांना व्यवस्थित लागतं. लाकडी पाटावर किंवा परात उपडी करुन त्यावर अळूचं मोठं पानं पाठच्या बाजूनं पसरुन ठेवावं. मिश्रण हातनं पूर्ण पानाला व्यवस्थित लावावं. पीठ लावताना थर पातळ किंवा जाड नसावा. दुसरे पान उलट्या बाजूनं आधीच्या पानाच्या टोकाच्या विरुध्द दिशेनं पसरुन ठेवावं. एक उलट एक सुलट अशा प्रकारे पीठ लावत पानं एकमेकांवर ठेवावी. सर्व पानं पीठ लावून झाल्यावर डाव्या आणि उजव्या बाजूनं मधल्या बाजूला अलगद दुमडावी. दुमडलेल्या भागावरही पिठाचा थर लावावा. रोल वळून झाला की शेवटच्या टोकाला पण मिश्रणाचा हात लावून रोल एकदम पसरट करावा. रोल  15 मिनिटं उकडून घ्यावेत. उकडलेले रोल थंड झाले की धारदार सुरीने मध्यम आकारचे काप करुन घ्यावेत. तेल गरम करुन एक एक वडी सोडून शॅलो फ्राय करुन घ्यावी.तळताना वरुन तीळ भुरभुरावेत. अळूवडी मध्यम ते मोठ्या आचेवर तळली की कुरकुरीत होते. 

Image: Google

नारळाच्या दुधातील  अळूवडी

नारळाच्या दुधतील अळूवडीसाठी दीड ते दोन वाटी नारळाचं दूध घ्यावं. त्यात थोडंसं मीठ आणि जिरे पावडर मिसळून तयार करुन ठेवावं. पारंपरिक अळूवडीच्या साहित्याप्रमाणे साहित्य घेऊन मिश्रण तयार करावं. हे मिश्रण  सैलसर भिजवून घ्यावं. अळूच्या पानांना वर दिल्याप्रमाणे पिठाचा थर लावून रोल करुन घ्यावा. हे रोल न उकडता धारदार सुरीने कापून घ्यावेत. कढईत तेल गरम करुन तेलाला मोहरीची फोडणी करावी. त्यात अळूवडी कढईमध्ये नीट लावावी. कढईवर झाकण ठेवून अळूवडीचे तुकडे जरा 2-3 मिनिटं शिजू द्यावं. झाकण काढून अळूवडीचे तुकडे अलगद उलटावेत. अळू वडी उलटल्यावर त्यावर नारळाचं दूध ओतावं. कढईवर पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवर अळूवडी अर्धा तास शिजत ठेवावी. नारळाचं दूध वड्यात शोषलं जाऊन वड्या छान खरपूस होतात. 

Image: Google

गुजराती पध्दतीची अळूवडी

गुजराती पध्दतीची अळूवडी करताना पारंपरि पध्दतीनं केल्या जाणाऱ्या अळूवडी प्रमाणे सामग्री घ्यावी. फक्त या सामग्रीत बेसन कमी आणि गूळ दुप्पट घ्यावा. तिखटाचं प्रमाण कमी घेऊन पानांवर पिठाचा थर देताना तो जाडसर असावा.  पीठ लावून रोल करुन ते उकडावेत. उकडलेले रोल थंड झाल्यावर वड्या कापून घ्याव्यात. तेल तापवून त्यात तीळ, मोहरी आणि बारीक चिरलेया कोथिंबीरची फोडणी द्यावी. अळूवडी शॅलोफ्राय  करावी. 

Image: Google

बारीक चिरलेल्या अळूची वडी

अळूची पानं खूपच लहान मिळाल्यास याप्रकारची अळूवडी करता येते. यासाठी अळूची 8-10 पानं आधी पाण्यानं व्यवस्थित धुवावी. शिरा काढाव्यात. पानं कोरड्या फडक्यानं पुसून घ्यावीत. अळू बारीक चिरुन घ्यावा. पानात मावेल इतकं बेसन घालावं. वडी खुसखुशीत होण्यासाठी त्यात पाव कप तांदळाचं पीठ घालावं. मिश्रणात चवीप्रमाणे मिरच्या आल्याचा तुकडा वाटून घालावा.  1 चमचा तीळ, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, साखर, चिंचेचा कोळ आणि गूळ  घ्यावा. मिश्रण पाणी न घालता नीट मिसळून मळून घ्यावं. मळताना पाण्याचा हात लावत मिश्रण मऊ मळावं. हाताला तेल लावा मिश्रणाची लांबसर वळी करावी. अळूच्या वळ्या 15 मिनिटं वाफवून घ्याव्यात. थंड झाल्या की त्याचे तुकडे करावेत. कढईत तेल घालावं. तेल गरम करुन त्यात मोहरी, तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिंगाची फोडणी द्यावी. फोडणीत अळूवड्या घालून खमंग परतून घ्याव्यात. 

Web Title: 4 delicious types of Aluvadi, Anushka Sharma's favorite crispy traditional Aluvadi recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.