Lokmat Sakhi >Food > पौष्टिक इडलीचे ४ झटपट प्रकार; नाश्त्याला करा मऊ, लुसलुशीत मस्त इडली

पौष्टिक इडलीचे ४ झटपट प्रकार; नाश्त्याला करा मऊ, लुसलुशीत मस्त इडली

ओटस, रवा, भाज्या वापरुन एकाहून एक टोस्टी इडल्या ट्राय तर करुन बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 04:35 PM2021-12-01T16:35:07+5:302021-12-01T16:47:49+5:30

ओटस, रवा, भाज्या वापरुन एकाहून एक टोस्टी इडल्या ट्राय तर करुन बघा

4 instant types of nutritious idli; Have a soft, luscious teasty Idli for breakfast | पौष्टिक इडलीचे ४ झटपट प्रकार; नाश्त्याला करा मऊ, लुसलुशीत मस्त इडली

पौष्टिक इडलीचे ४ झटपट प्रकार; नाश्त्याला करा मऊ, लुसलुशीत मस्त इडली

Highlightsटेस्टी आणि हेल्दी इडली प्रकार ट्राय करा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे करतील एन्जॉयनाश्त्याला सतत वेगळं काय करायचं असा प्रश्न पडत असेल तर हे घ्या इडलीेचे प्रकार

छायाचित्रे - हेबर्स किचन 

इडली म्हणजे कोणत्याही वेळेला खाण्यासाठी अगदी मस्त पदार्थ. गरमागरम वाफाळती इडली आणि त्यासोबत मस्त चटणी आणि सांबार म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीता पदार्थ. आपल्याला तांदळाच्या पीठाची किंवा फारतर नाचणीची वगैरे इडली माहित असते. पण याच इडलीचे आणखी काही हेल्दी आणि टेस्टी प्रकार करता आले तर? पाहूयात अशाच काही झटपट होणाऱ्या आणि एकदम टेस्टी इडलीच्या रेसिपी....

१. व्हेज इडली 

साहित्य 

तेल - २ चमचे 
फोडणीसाठी - मोहरी, जीरे, हिंग, हळद 
उडीद डाळ - एक चमचा 
हरबरा डाळ - एक चमचा 
कडीपत्ता - ५ ते ६ पाने 
आलं - अर्धा चमचा बारीक चिरलेले 
मिरची - २ मिरच्या बारीक चिरलेल्या 
भाज्या - मटार, गाजर, ढोबळी मिरची, फरसबी
काजूचे तुकडे - एक चमचा 
इडली रवा - २ वाट्या 
दही - २ मोठे चमचे 
मीठ - चवीनुसार 
कोथिंबीर - पाव वाटी बारीक चिरलेली

कृती 

१. कढईत तेल घेऊन त्यात मोहरी, जीरे, हिंग, हळद देऊन फोडणी करुन घ्यावी. 
२. यामध्ये उडीद डाळ, हरबरा डाळ, कडीपत्ता, आलं, मिरची, काजुचे तुकडे आणि सगळ्या भाज्या घालाव्यात. 
३. चवीनुसार मीठ घालून हे सगळे एकसारखे परतून घ्यावे
४. यामध्ये विकत मिळणारा इडली रवा घालून पुन्हा एकजीव करुन घ्यावे.
५. गॅस बंद करुन हे मिश्रण एका भांड्यात काढावे. यामध्ये दही घालून एकजीव करावे. अंदाजे थोडे पाणी घालून पुन्हा हे मिश्रण एकजीव करुन घ्यावे. कोथिंबीर घालावी
६. २० ते २५ मिनिटे हे मिश्रण तसेच ठेवून इडलीपात्राला तेल लावून इडल्या लावाव्या. 

(Image : Google)
(Image : Google)

२. मूग इडली

साहित्य 

मूग डाळ - २ वाट्या 
तेल - २ चमचे 
फोडणीसाठी - मोहरी, जीरे, हिंग, कडीपत्ता, मिरची, आलं, हरभरा डाळ, काजुचे तुकडे
गाजर - बारीक चिरलेले अर्धी वाटी
दही- २ चमचे 
मीठ - चवीनुसार 
कोथिंबीर - पाव वाटी बारीक चिरलेली 

कृती - 

१. मूगाची डाळ दोन तास पाण्यात भिजवून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी.
२. त्यामध्ये दही, मीठ घालून हे मिश्रण एकजीव करुन घ्यावे 
३. गॅसवर कढईमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, जीरे, हिंग याची फोडणी द्यावी.
४. फोडणीत कडीपत्ता, आलं, काजुचे काप, मिरचीचे तुकडे, किसलेले गाजर घालावे. 
५. ही फोडणी मूगाच्या पीठात एकत्र करावी, यामध्ये कोथिंबीर आणि गरजेनुसार पाणी घालून मिश्रण एकजीव करावे. 
६. १० मिनीटांनी हे सगळे एकजीव झाल्यानंतर इडली लावावी. 

३. नीर इडली 

साहित्य 

तेल - २ चमचे 
फोडणीसाठी - मोहरी, जीरे, मेथ्या, उडीद डाळ, लाल मिरचीचे तुकडे, कडीपत्ता 
इडली रवा - २ वाट्या 
दही - अर्धी वाटी
नारळाचा चव - एक वाटी 
मीठ - चवीनुसार 

कृती

१. कढईत तेल घालून त्यात मोहरी, जीरे, मेथ्या, उडीद डाळ, लाल मिरचीचे तुकडे, कडीपत्ता हे सगळे घालून छान परतून घ्यावे.
२. यामध्ये इडली रवा, नारळ आणि मीठ घालून एकजीव करुन घ्यावे.
३. यामध्ये उकळलेले पाणी घालावे, त्यामुळे ते उपम्यासारखे एकजीव होईल. 
४. हे मिश्रण गार झाल्यावर त्याचे हाताने गोलाकार गोळे करावेत.
५. इडली पात्रामध्ये हे गोळे उकडायला ठेवावेत. आधी एक वाफ आलेली असल्याने हे बऱ्यापैकी हलके झालेले असते, त्यामुळे कमी वाफेवर ही इडली तयार होते.  
६. लसणाच्या चटणीसोबत ही इडली अतिशय उत्तम लागते. 

(Image : Google)
(Image : Google)

४.ओटस इडली 

साहित्य 

ओटस - २ वाट्या 
तेल - २ चमचे फोडणीसाठी - मोहरी, जीरे, हिंग, हळद , उडीड डाळ, हरभरा डाळ, कडिपत्ता, आलं पेस्ट, मिरचीचे तुकडे 
भाज्या - तुम्हाला आवडत असतील त्या, गाजर, बीट, कोबी, मटार, फरसबी अशा घरात उपलब्ध असतील त्या
रवा - एक वाटी 
दही - अर्धी वाटी 
मीठ - चवीनुसार 
कोथिंबीर - पाव वाटी बारीक चिरलेली 

कृती 

१. कढई गॅसवर ठेवून त्यात फोडणीचे सगळे साहित्य घालावे. 
२. उपलब्ध असलेल्या सगळ्या भाज्या किसून त्यामध्ये परतून घ्यायच्या
३. ओटस भाजून त्याची बारीक पूड करुन घ्यायची 
४. ही ओटसची पूड आणि रवा या फोडणीत घालून एकजीव करुन घ्यायचा
५. हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात दही, पाणी, मीठ आणि कोथिंबीर घाला आणि मिश्रण हलवून पुन्हा एकजीव करा. 
६. यामध्ये थोडे इनो घालून हलवा आणि २० ते २५ मिनिटांनी इडल्या करा
 

Web Title: 4 instant types of nutritious idli; Have a soft, luscious teasty Idli for breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.