नारळी पौर्णिमा अगदी दोन दिवसांवर आली आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त सगळ्यांच्याच घरी नारळाचे वेगवेगळे गोडाधोडाचे पदार्थ तयार केले जातात. या दिवशी नारळाचे पदार्थ करण्याला फार महत्व असते. रक्षाबंधन म्हटल्यावर बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि सोबतच मिठाई भरवून त्याच तोंड गोड करते. राखीपौर्णिमा म्हणजेच नारळीपौर्णिमा. महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या बऱ्याच भागात हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भावाला ओवाळून राखी बांधल्यानंतर त्याला नारळाचा गोड पदार्थ भरवला जातो. यामध्ये नारळी भात, नारळाची करंजी, नारळाचा लाडू, नारळाची वडी या पदार्थांपैकी काही ना काही आवर्जून केले जाते(4 Mistakes You Should Avoid While Making Coconut Barfi).
राखी पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या नारळाच्या अनेक पदार्थांपैकी नारळी वडी हा एक सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. नारळाची वडी आपण क्वचितच करतो. परंतु खायला खुसखुशीत आणि तोंडात टाकली की विरघळणारी ही पांढरीशुभ्र नारळाची वडी नारळीपौर्णिमेला हमखास केली जाते. घरातील प्रत्येक गृहिणी अगदी हौसेने नारळाची वडी तयार करते. परंतु काहीवेळा ही नारळीवडी बनवताना त्यातील साखर संपूर्ण विरघळत नाही, ती तशीच राहून वडी खाताना चरचरीत लागते. त्याचबरोबर वड्या काहीवेळा ओल्या राहतात, तर कधी या पांढऱ्याशुभ्र वाडयांना काळपट रंग येतो. त्यामुळे या वड्या दिसताना चांगल्या दिसत नाहीत. त्याचबरोबर वडी आपल्याला पाहिजे तशी खुसखुशीत होत नाही. अशावेळी ही नारळाची वडी करण्यासाठीची सगळी मेहनत फुकट जाते. अशावेळी आपण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवून ही नारळाची वडी अगदी परफेक्ट पांढरीशुभ्र, खुसखुशीत करु शकतो. यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात( Avoid These 4 Common Mistakes While Making Coconut Barfi At Home).
नारळाची वडी तयार करताना या चुका करु नका...
चूक १ :- नारळ वडीचे मिश्रण खूप चिकट किंवा कोरडे असणे.
नारळ वडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खोबऱ्याची सालं व्यवस्थित काढून घ्यावी. त्याचबरोबर खोबर व्यवस्थित बारीक किसून घ्यावे. त्याचबरोबर वडी तयार करताना त्यातील ओलावा किंवा पाण्याचे प्रमाण योग्य प्रमाणात सुकवणे गरजेचे असते, नाहीतर वडी ओली, चिकट होते. नारळाची वडी बनवण्यासाठी किसून घेतलेल्या खोबऱ्यात जास्त ओलावा असेल तर वडी जास्त चिकट होते याउलट जर कमी ओलावा असेल तर वडी कोरडी होते. यामुळे नारळ वडी तयार करताना त्यातील ओलावा तपासून पाहावा. नाहीतर नारळाची वडी योग्य पद्धतीने सेट होणार नाही.
मदुराई स्पेशल ‘थन्नी चटणी’ खाऊन तर पाहा, इडली-डोसा लागेल मस्त-चमचमीत चटणीची रेसिपी...
चूक २ :- साखरेचा योग्य प्रमाणात वापर न करणे.
नारळाच्या वडीमध्ये साखरेचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते. जास्त साखर घातल्याने वडी खूप गोड आणि चिकट होते. याउलट कमी साखर घातल्यास वडीला चांगली चव येत नाही आणि कोरडी होते.
चूक ३ :- नारळाच्या वडीचे मिश्रण योग्य पद्धतीने न शिजवणे.
नारळाच्या वडीचे मिश्रण मिश्रण योग्य प्रकारे शिजवणे खूप महत्वाचे असते. जर मिश्रण साखर आणि मावा घालून पूर्णपणे व्यवस्थित शिजवले नाही तर वडी व्यवस्थित सेट होणार नाही आणि चवही बिघडू शकते. याचबरोबर जर नारळाच्या वडीचे मिश्रण योग्य पद्धतीने शिजवले नाही तर वड्या व्यवस्थित कापल्या जात नाहीत.
चूक ४ :- नारळाच्या वडीचे मिश्रण खूप जास्त शिजवणे.
नारळाची वडी बनवण्यासाठी साखर, नारळाचा किस आणि मावा खूप काळजीपूर्वक शिजवावा लागतो. जर आपण हे नारळाच्या वडीचे मिश्रण गॅसच्या हाय फ्लेमवर शिजवून घेतले तर बर्फीचा रंग तपकिरी होतो आणि वडीला जळका वासही येतो. अशा परिस्थितीत नारळ वडीचे मिश्रण मंद आचेवर शिजवताना ते सतत हलवत राहा. यामुळे मिश्रण न जळता त्याला परफेक्ट पांढराशुभ्र रंग येईल.
चपातीचा मोमो? १० मिनिटात करा भरपूर भाज्या घालून मोमो, भाजीपोळी होईल फस्त...
परफेक्ट नारळाची वडी तयार करण्याच्या टिप्स...
१. नारळाच्या वड्यांसाठी साखरेचा पाक तयार करताना त्यात जास्त पाणी घालू नये.
२. साखरेच्या पाकात लिंबाचा रस घालावा यामुळे वाडयांना छान पांढराशुभ्र रंग येण्यास मदत होते.
३. साखेरच्या पाकात खोबर घातल्यावर त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे काढून मिश्रण कोरडे करुन घ्यावे यामुळे वड्या ओल्या होणार नाहीत.
४. साखरेचा पाक व खोबऱ्याचे मिश्रण तयार करताना ते मंद आचेवर ठेवावे नाहीतर मिश्रणाचा रंग बदलून वड्या थोड्या लालसर होतात.