Join us  

तेलकट पदार्थ खायची भीती वाटते? ४ टिप्स, भजी-वडे-पुऱ्या तेल पिणार नाहीत, खा खमंग मनसोक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 12:41 PM

4 tips to keep in mind while deep frying the food : तळलेले कोणतेही पदार्थ खूप तेल पिऊ नयेत आणि तेलकट होऊ नयेत यासाठी

थंडीच्या दिवसांत आपण बरेचदा तळलेले पदार्थ करतो. थंडीच्या दिवसांत शरीराला स्निग्धतेची आवश्यकता असते आणि या काळात खाल्लेले चांगले पचत असल्याने या काळात तेलकट पदार्थ केले जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तेलकट पदार्थ आवडतात. थंडीत पचत असले तरीही तेल योग्य त्या प्रमाणातच आहारात असायला हवे.  तळलेले पदार्थ पानात असले की जेवणाची रंगत वाढते हे जरी खरे असले तरी आहारात तेल योग्य त्या प्रमाणातच असायला हवे. अन्यथा कोलेस्टेरॉल आणि हृदयाशी निगडीत तक्रारी, लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पण भजी, वडे, पुऱ्या किंवा तळलेले कोणतेही पदार्थ खूप तेल पिऊ नयेत आणि तेलकट होऊ नयेत यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. ज्यामुळे पदार्थ जास्त तेलकट न होता पोटात कमीत कमी तेल जाते. पाहूयात या ट्रिक्स कोणत्या (4 tips to keep in mind while deep frying the food )...

 १. भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहन आणि बेकिंग सोडा किंवा तांदळाचं पीठ मिसळा. त्यामुळे भजी किंवा वडे तेलकट न होता कमीत कमी तेलात चांगली तळली जातात. 

(Image : Google)

२. तेल पूर्ण गरम झाल्यावर मगच त्यामध्ये पुऱ्या किंवा वडे घालावेत म्हणजे पदार्थ झटपट तळला जातो. नाहीतर बारीक गॅसवर पदार्थ बराच वेळ तेलात राहीला तर तो गॅस लहान असल्याने लवकर तळला जात नाही आणि खूप तेल पितो. म्हणून तेल आणि कढई नीट तापलेले असायला हवे. 

३. पुऱ्याचं पीठ जास्त सैल न भिजवता घट्टसर भिजवावे. पीठ जास्त पातळ किंवा मऊ असेल तर पुऱ्यांमध्ये जास्त तेल राहतं आणि त्या व्यवस्थित फुगत नाहीत. म्हणून पुऱ्याचं पीठ मळताना कमीत कमी पाण्याचा वापर करा. तसेच पुरीचे पीठ मिळताना त्यात थोडा रवा घालायचा म्हणजे पुऱ्या कमी तेल पितात. 

(Image : Google)

४. तेल कढईत तापत असताना त्यामध्ये थोडं मीठ घालावं. यामुळे वडे, भजी, पुऱ्या यांमध्ये जास्त प्रमाणात तेल शोषले न जाता कमीत कमी तेलात पदार्थ चांगले तळले जातात. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.