पोहे, उपमा, उकडपेंडी यावर जर हिरवीगार कोथिंबीर भुरभुरलेली नसेल तर हे पदार्थ खायला मजाच येत नाही . भाज्यांना फोडणी देताना ताजी कोथिंबीर थोडी चिरुन घातली की भाजी आमटीला विशिष्ट स्वाद येतो. ओल्या मसाल्यांच्या वाटणात ताजी कोथिंबीर असली तर अशा मसाल्यांची भाजी चवीला आणि रंगाला खुलते. ताज्या कोथिंबीरची ओलं खोबरं घालून केलेली चटणी कशाबरोबरही खा छानच लागते. ही आहे कोथिंबीरच्या ताज्या स्वादाचा महीमा.
Image: Google
पण यासाठी कोथिंबीर ताजी राहायला हवी ना! कोथिंबीर आणल्यापासून 2-3 दिवसातच खराब होऊन जाते. अनेकदा कोथिंबीर केवळ खराब झाली, तिचा स्वादच निघून गेला, पिवळी पडली, सडली याकारणांनी भरपूर असलेली कोथिंबीर टाकून द्यावी लागते. हल्ली ताज्या कोथिंबीरचे वाटेही मिळत नाही. आणि वाटे म्हणून जे विकले जातात ते ज्या किंमतीला विकतात ते घेणंही परवडत नाही आणि सारखी कोथिंबीर विकत आणून ती निवडायला तेवढा वेळही मिळत नाही. अशा परिस्थितीत सोपा उपाय म्हणजे कोथिंबीर जास्तीत जास्त टिकेल कशी असे उपाय शोधणे.
कोथिंबीर लवकर खराब होते हे खरं असलं तरी ती निवडून साठवताना योग्य काळजी घेतली, काही युक्त्या वापरल्या तर कोथिंबीर आठवडाभर काय दोन आठवडे देखील हिरवीगार राहाते.
Image: Google
कोथिंबीर ताजीतवानी ठेवण्यासाठी..
1. फ्रिजमध्ये कोथिंबीर साठवण्यासाठी टिश्यू पेपर आणि हवाबंद डब्याचा वापर करता येतो. या दोन गोष्टींचा वापर करुन कोथिंबीर दोन आठवडे फ्रिजमध्ये जराही खराब न होता ताजी राहाते. यासाठी आधी कोथिंबीर निवडून पाण्यानं 2-3 वेळा धुवावी. नंतर कोथिंबीर पसरवून ठेवावी. कोथिंबीरमधलं पाणी वाळू द्यावं. कोथिंबीरमधलं पाणी सुकलं की टिश्यू पेपरमध्ये कोथिंबीर गुंडाळावी. हवाबंद डब्यात आधी टिश्यू पेपर ठेवून नंतर् त्यावर टिश्यू पेपरमध्ये गुंडाळलेली कोथिंबीर ठेवावी. डब्याला झाकण लावून डबा फ्रिजमध्ये ठेवावा.
Image: Google
2. प्लास्टिकच्या पिशवीत कोथिंबीर ठेवून ती पिशवी फ्रिजमध्ये ठेवल्यास कोथिंबीर दोन आठवडे ताजी राहाते. यासाठी कोथिंबीर आधी निवडून घ्यावी. ती धुवावी. पाणी सुकवून घ्यावी. पाणी सुकलेली कोथिंबीर प्लास्टिकच्या पिशवीत घालून फ्रिजमध्ये ठेवावी. फक्त प्लास्टिकच्या पिशवीत कोथिंबीर ठेवतान पिशवी अजिबात ओली नको.
Image: Google
3. कोथिंबीर बाहेर ताजी तवानी ठेवण्यासाठी जारमध्ये पाणी घालून त्यात कोथिंबीरची मुळं बुडलेली राहातील अशा पध्दतीने ठेवावी. जारमधलं पाणी सतत बदलत राहिल्यास फ्रिजमध्ये न ठेवताही कोथिंबीर 4-5 दिवस ताजी राहाते.
Image: Google
4. दोन आठवड्यांपेक्षाही कोथिंबीर ताजी राहावी यासाठी कोथिंबीर निवडून मलमली कपड्यत गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावी. यासाठे कोथिंबीर निवडावी. ती पाण्यानं स्वच्छ धुवावी. पाणी सुकलं की कोथिंबीर मलमलच्या कपड्यात गुंडाळून ती गुंडाळी फ्रिजमध्ये ठेवावी.