Join us  

बिनधास्त खा चमचमीत 'डाळ- पालक'! भाजी इतकी पौष्टिक, 5 चविष्ट फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 6:18 PM

जेवणात  डाळ आणि पालक एकत्र खाण्याला विशेष महत्व आहे. 'डाळ पालक' ही पौष्टिक भाजी मस्त चविष्टही होते. 

ठळक मुद्देजीवनसत्व आणि खनिजांचा शरीरास लाभ होण्यासाठी डाळ-पालक खाण्याला महत्व आहे.जेवणात वरचेवर डाळ-पालक ही भाजी असल्यास लोहाची कमतरता भरुन निघते आणि ॲनेमियाचा धोका टळतो.डाळ-पालक खाल्ल्याने पोटाचं आरोग्य जपलं जातं. 

आहारात पालेभाज्या आणि डाळी-साळी असण्याला विशेष महत्व आहे. पण पालेभाज्या आणि डाळ एकत्र खाल्ल्याने होणारे फायदे डाळ आणि पालेभाज्या वेगवेगळ्या खाण्याच्या तुलनेत अधिक आहेत. विशेषत: डाळ आणि पालकाची एकत्र भाजी केल्यास ती चविष्ट लागते आणि पौष्टिकही होते. डाळ-पालक खाल्ल्याने प्रथिनं, लोह आणि कॅल्शियम ही महत्वाची खनिजं मिळतात. पचन क्रिया सुरळीत होण्यापासून ते हाडं आणि स्नायू मजबूत होण्यापर्यंत डाळ पालक एकत्र खाण्याचे फायदे होतात. 

Image: Google

डाळ-पालक खाल्ल्याने..

1. डाळ आणि पालक या दोन्हीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं. मजबूत हाडांसाठी डाळ पालक खाणं आवश्यक आहे. पालकामध्ये असलेल्या जीवनसत्वाचाही हाडांना उपयोग होतो. जीवनसत्व आणि खनिजांचा शरीरास लाभ होण्यासाठी डाळ-पालक खाण्याला महत्व आहे. 

2. पालकामुळे जेवन पचण्यास मदत होते. डाळ -पालक या भाजीत पाणी आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं.  फायबरमुळे अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. डाळ -पालक खाल्ल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट उत्तम राहातो. डाळ पालक खाल्ल्याने बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी डाळ-पालक खाण्याला विशेष महत्व आहे. 

Image: Google

3. डाळ-पालक या भाजीतून शरीरास आवश्यक सर्व पोषक घटक मिळतात. या भाजीत पोषक घटकांचा उपयोग स्नायुंच्या मजबुतीसाठी होतो. स्नायुंचा विकास करण्यासाठी म्हणूनच डाळ -पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. 

4. महिलांमध्ये ॲनेमियाची समस्या मोठ्या प्रमाणावर आढळते. रक्तातील लाल पेशींच्या कमतरतेमुळे ॲनेमिया होतो. लाल पेशींचा संबंध लोहाशी असतो. डाळ-पालकाच्या भाजीत लोहाचं प्रमाण चांगलं असतं. जेवणात वरचेवर डाळ-पालक ही भाजी असल्यास लोहाची कमतरता भरुन निघते आणि ॲनेमियाचा धोका टळतो.

5. डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी आहारात पालेभाज्या आवश्यक असतात. डाळ-पालक भाजीतून शरीरास अ जीवनसत्व मिळतं जे निरोगी डोळ्यांसाठी महत्वाचं असतं. 

Image: Google

डाळ- पालक  भाजी कशी करावी?

डाळ पालक करण्यासाठी आधी पालक निवडून स्वच्छ धुवून घ्यावा. कुकरमध्ये साजूक तूप घालून मोहरी, हिंग आणि दालचिनीची फोडणी द्यावी. नंतर यात हिरवी मिरची घालावी. आलं लसणाची पेस्ट घालून ती खमंग परतून घ्यावी. चिरलेला टमाटा घालून तो मऊ होईपर्यंत परतून घ्यावा. टमाटा मऊ झाल्यावर त्यात हळद, धने पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट घालावं. सर्व मसाले फोडणीत नीट मिसळून घ्यावेत.

तूर/ मूग/ हरभरा डाळ ( आधी धुवून भिजवून घेतलेली) घालून ती परतून घ्यावी. नंतर यात बारीक चिरलेला पालक घालावा. चवीनुसार मीठ आणि प्रमाणात गरम पाणी घालून कुकरला झाकण लावून 3-4 शिट्या घ्याव्यात. भाकरी/ पोळी/ गरम भात यासोबत डाळ-पालक भाजी छान लागते.  

टॅग्स :अन्नआहार योजनाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.