Join us  

उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचे ५ फायदे, जेवणात नियमित खा-वाढत्या उन्हाचा त्रास टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 2:02 PM

कांदा प्रकृतीने थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत तर तो आवर्जून खायला हवा.

ठळक मुद्देकांदा जेवणात स्वाद तर आणतोच पण तो आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असतोउन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचे फायदे समजून घेऊया

कांदा हा भारतीय जेवणातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोणतीही ग्रेव्ही करायची असो किंवा आणखी काही कांद्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. जेवणाला स्वाद देण्यासाठी हा कांदा जितका उपयुक्त असतो तितकाच तो आरोग्यासाठीही फायदेशीर असतो हे लक्षात घ्यायला हवे. हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा एखादी ग्रेव्हीची भाजी असेल तर आपण आवर्जून कांदा तोंडी लावायला घेतो. कच्चा कांदा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी तसेच वेगवेगळ्या इन्फेक्शन्सपासून आपला बचाव करण्यासाठी कांदा अतिशय उपयुक्त असतो. कांद्यातील फ्लेवोनाईडस आणि अँटीऑक्सिडंटस हाडांचे आरोग्य, हृदयाचे आरोग्य आणि काही कर्करोगांपासून आपला बचाव करण्यासाठी उपयुक्त असतात. कांदा प्रकृतीने थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत तर तो आवर्जून खायला हवा. पाहूयात कच्चा कांदा खाण्याचे फायदे...

(Image : Google)

१. उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला त्वचेचे किंवा इतरही इन्फेक्शन्स होतात. यापासून दूर राहण्यासाठी कच्चा कांदा खाणे फायदेशीर ठरते. कधी कोशिंबीरीमध्ये तर कधी भेळीमध्ये कधी जेवताना तोंडी लावायला आपण हा कच्चा कांदा आवर्जून खाऊ शकतो. 

२. उन्हाळ्याच्या दिवसांत खाल्लेले अन्न लवकर पचत नाही. पण कांदा खाल्ल्यास खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. म्हणून कच्चा कांदा जेवणात आवर्जून असायला हवा. यामध्ये आपण पातीचा कांदा, पांढरा कांदा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कांद्यांचा समावेश करु शकतो. 

३. कांद्यामध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे आणि शरीराला आवश्यक असणारे इतरही अनेक घटक असतात. त्यामुळे पूर्वीच्या काळी कांद्याचा औषध म्हणून वापर केला जात असे. त्याचप्रमाणे आरोग्याच्या विविध तक्रारींवर कांदा उपयुक्त ठरतो. 

(Image : Google)

४. एका मध्यम आकाराच्या कांद्यामध्ये केवळ ४४ कॅलरीज असतात. ज्यामध्ये व्हिटॅमिन सी व इतरही अनेक घटक असतात. त्याचा कोलेजन तयार करण्यासाठी, उतींच्या बळकटीसाठी आणि शरीरात लोह शोषले जावे यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. 

५. कांदा आरोग्याप्रमाणेच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर असतो. यामध्ये असलेले कुरसेटीन नैसर्गिक अंटीहिस्टामाइन म्हणून काम करते. उन्हाळ्यात त्वचेला येणारे रॅशेस, डास चावल्याने येणारे फोड यांवर हिस्टेमाइन हा उत्तम उपाय असतो. त्यामुळे कांदा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो.  

टॅग्स :अन्नकांदाआरोग्यसमर स्पेशल