ऊन जसं वाढायला लागतं तशी स्वयंपाकघरातली एक समस्या डोकं वर काढते. ज्याला त्याला मुंग्या लागतात. ओट्यावर, गॅसवर, भांड्यांच्या मांडणीत , बिस्कीट-खाऊच्या डब्यांना मुंग्या लागतात. रव्या साखरेच्या डब्यांना तर मुंग्यांची रांग लागते. मुंग्या लागल्या की सर्व गोष्टी पसरट भांड्यात, ताटात काढा, ते सगळं उन्हात नेऊन ठेवा, मुंग्या गेल्या की पुन्हा डब्यात भरा. मुंग्या गेल्या असं वाटत न वाटतं तोच पुन्हा त्याच किंवा नव्या डब्यांना मुंग्या लागलेल्या दिसतात. स्वयंपाकघरातल्या मुंग्याचा मुक्काम फक्त स्वयंपाकघरात राहात नाही. तो बैठकीच्या खोलीत, कपड्यांच्या कपाटात, गादीवर, उशांवर असा सर्वत्र विस्तारतो. अशी ही मुंग्यांची समस्या मीठ, कापूर, लवंग, लाल तिखट यांंचा उपाय करुन कंट्रोल करता येते.
1. पुजा-आरतीसाठी उपयोगात येणाऱ्या कापुराचा उपयोग करुन कपाट आणि गादी उशांवरील मुंग्यांची समस्या घालवता येते. यासाठी कपड्यांच्या कपाटात, गादी, उशांखाली कापराची वडी ठेवावी. कापराच्या उग्र वासानं मुंग्या असल्यास निघून जातात आणि पुन्हा येत नाही.
2. स्वयंपाकघरातील मुंग्या, किडे यावर प्रभावी उपाय म्हणजे मीठ. मिठाचा उपाय करताना एका भांड्यात पाणी घ्यावं. त्यात भरपूर मीठ घालावं. मीठ घालून ते पाणी भरपूर उकळावं. नंतर हे पाणी सामान्य तापमानाला येवू द्यावं. हे पाणी एका स्प्रे बाॅटलमध्ये भरावं. जिथे जिथे मुंग्या नेहमी होतात त्या ठिकाही स्प्रे बाॅटलमधील मिठाचं पाणी फवारावं. मुंग्या असल्यास निघून जातात. मुंग्या होण्याच्या संभाव्य ठिकाणी हे पाणी फवारल्यास मुंग्या होत नाही.
3. ज्या ज्या ठिकाणी मुंग्या झालेल्या दिसतात त्या ठिकाणी लवंग ठेवल्यास मुंग्या निघून जातात. खाऊच्या डब्यात, साखरेच्या डब्यात लवंग ठेवावी. लवंगाच्या उग्र वासामुळे मुंग्या होत नाही.
4. मुंग्यांना नियंत्रित करणारे रसायनयुक्त खडू मेडिकल/ दुकानांमध्ये मिळतात. हे रसायनयुक्त खडू वापरायचे नसल्यास साधे फळ्यावर लिहायचे वापरल्यास त्याचाही उपयोग मुंग्या नियंतत्रित करण्यासाठी होतो. खडुमध्ये कॅल्शियम कार्बोनेट हा घटक असतो. मुंग्याना नियंत्रित करण्यासाठी/ रोखण्यासाठी या खडुचा उपयोग होतो.
5. लाल मुंग्यांचं प्रमाण जास्त असल्यास त्या ठिकाणी थोडी तिखटाची पूड भुरभुरावी. तिखटाच्या वापरानं मुंग्या लगेच गायब होतात. मुंग्याच्या संभाव्य ठिकाणी तिखट भुरभुरुन ठेवल्यास मुंग्या होत नाही.
6. अन्न पदार्थ सांडलेले असल्यास, डब्यांना, कपाला चिगट ओघळ असल्यास, डब्बे नीट लावलेले नसल्यास मुंग्या होतात. त्यामुळे स्वच्छता ठेवल्यास, डब्बे नीट लावून ठेवल्यास , मुंग्या न होण्यासाठी मीठ पाणी फवारणं, खडुंच्या रेषा ओढून ठेवणं, ही काळ्जी घेतल्यास मुंग्यांवर नियंत्रण मिळवता येतं.
7. व्हिनेगर, लेमन/ पेपरमिण्ट या इसेन्शियल ऑइलचा उपयोग करुन स्प्रे तयार करुन तो फवारल्यास मुंग्यावर नियंत्रण मिळवता येतं.