Join us  

मिरचीचा अस्सल झणका बघायचाय? खाऊन तर बघा भारतातल्या सर्वात जास्त तिखट ५ मिरच्या, जाळ असा की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 3:16 PM

Food lover: झणझणीत, तिखटजाळ खाण्याचे शौकिन असाल तर भारतात प्रसिद्ध असणाऱ्या या ५ तेजतर्रार मिरच्या (famous chilli in India) तुम्ही खाऊन बघायलाच हव्यात...

ठळक मुद्देतेजतर्रार, तिखटजाळ पण तिखटालाही एक न्यारी चव असणाऱ्या या मिरच्या नेमक्या मिळतात कुठे आणि काय आहे त्यांची खासियत.. 

गोड पदार्थ आवडीने खाणारे आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे अनेक गोडघाशे असतात. तसंच तिखटजाळ पदार्थांच्या आकंठ प्रेमात बुडालेलेही खवय्ये असतात. तिखट खाल्ल्याशिवाय त्यांची रसनातृप्ती होत नाही.. अस्सल चवीचं, झणझणीत तिखट पदार्थ कुठे खायला मिळतील, याच्या ते कायमच शोधात असतात. तुम्हीही तिखट पदार्थांचे शौकिन असाल तर भारतातल्या या ५ प्रकारच्या तिखट जाळ मिरच्यांचे प्रकार तुम्हाला माहिती हवेतच... म्हणूनच तर वाचा तेजतर्रार, तिखटजाळ पण तिखटालाही एक न्यारी चव असणाऱ्या या मिरच्या नेमक्या मिळतात कुठे आणि काय आहे त्यांची खासियत.. 

 

१. भूत झोलकिया..(Bhut Jolokia)मिरचीच्या राज्यातली बाप मिरची म्हणून ही मिरची ओळखली जाते.. भूत मिरची अतिशय प्रसिद्ध असून ती भारतातली सगळ्यात तिखट मिरची मानली आहे. नावाप्रमाणेच ही मिरची खरोखरंच भुताप्रमाणेच कमाल करणारी आहे. त्यामुळे खाण्याप्रमाणेच संरक्षणासाठीही तिचा उपयोग केला जातो. सैन्यातर्फे, पोलिस दलाकडून अनेकदा अश्रू नळकांड्या फोडल्या जातात. यात असणारा गॅस तयार करण्यासाठी भूत मिरचीच वापरण्यात येते. आसाम, नागालँड, मणिपूर येथे या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. भूत मिरचीच्या तिखटपणाची नोंद गिनिज बुकनेही घेतली आहे. 

 

२. गुंटूर मिरची  (Guntur Chillies)गुंटूर मिरची ही आंध्रप्रदेशची खरी ओळख. आता मध्य प्रदेशातही गुंटूर मिरचीचं बऱ्यापैकी उत्पादन घेतलं जातं. भारतामध्ये लाल तिखट तयार करण्यासाठी सगळ्यात जास्त या मिरचीचा वापर केला जातो. कारण तिच्या तिखटामध्येही एक अनोखा स्वाद असतो. भारतातून होणाऱ्या मिरचीच्या निर्यातील गुंटूर मिरचीचा वाटा जवळपास ३० टक्के आहे. 

 

३. डल्ले खुर्सानी  (Dalle Khorsani)मिरचीचा हा प्रकारही अतिशय प्रसिद्ध असून त्याचे पिक प्रामुख्याने सिक्कीममध्ये घेतले जाते. या मिरचीला काही वर्षांपुर्वीच जीआय नामांकन मिळाले आहे. या मिरचीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मिरची एखाद्या छोट्याशा फळासारखी दिसते. दिसायला जेवढी आकर्षक तेवढीच खाल्ल्यावर अंगार असं या मिरचीचं वर्णन करता येईल. ५०० रूपये प्रतिकिलो यापेक्षाही अधिक भावाने या मिरचीची विक्री होते. 

 

४. खोला मिरची  (Khola Chilli)मिरचीचा हा प्रकार मुळचा गोव्यातल्या खोला जिल्ह्यातला. ही मिरची खूप तिखटजाळ प्रकारातली नसते. खूप तिखटही नाही आणि अगदीच फिकीपण नाही, अशा प्रकारातली ही मिरची. गोवन फूडची चव वाढविण्याचं काम ही मिरची अगदी परफेक्ट करते. गोव्यात कैरीच्या लोणच्यापासून ते वेगवेगळ्या व्हेज, नॉनव्हेज पदार्थांच्या करी बनविण्यापर्यंत या मिरचीचा वापर केला जातो. 

 

५. हथेई मिरची  (Hathei Chilli)मणिपूरची ही प्रसिद्ध मिरची. ही मिरची इतर मिरच्यांपेक्षा अधिक लांब असते. मध्यम तिखट प्रकारातली ही मिरची अतिशय चवदार असून तिला २०२१ साली जीआय मानांकन मिळालं आहे. 

 

टॅग्स :अन्नगोवासिक्किमगुंटूर