एखादी गोष्ट करायला नाही सांगितली की तिच गोष्ट हमखास करावी वाटते.. एरवी आठवणही येत नाही. पण कुणी नाही म्हटलं की वारंवार त्याच गोष्टीची आठवण होते. डायबिटीस (diabetes) असणाऱ्यांचंही काहीसं असंच असतं. त्यांच्या साखर खाण्यावर बंदी येते. त्यामुळे मग अर्थातच गोड पदार्थांना सक्तीची मनाई. त्यामुळे मग आणखीनच गोड पदार्थ खावेसे वाटतात. शिवाय त्यांच्यासमोर घरातल्या इतर मंडळींनी गोड खाल्लं की यांना पण गोडाधोडाचं खूप प्रकर्षाने खावंसं वाटतं. म्हणूनच तर हे बघा असे काही गोड पदार्थ जे डायबिटीस असणाऱ्यांनाही खाता येतील. (safe sweet food for diabetes)
डायबिटीस असतानाही चालणारे गोड पदार्थ
१. कोको पावडर
चॉकलेट केक, चॉकलेट आईस्क्रिम करण्यासाठी या पावडरचा वापर करतात. या पावडरचा वापर करून डायबिटीस असणाऱ्यांसाठी गोड पदार्थ बनवता येतात. यासाठी कोको पावडर आणि शुगर फ्री नट बटर किंवा होममेड शुगर फ्री नट बटर हे दोन्ही पदार्थ एकत्र करा. गोड खावंसं वाटलंच तर हे मिश्रण ब्रेडला, पोळीला लावून खाता येतं. किंवा फळांसोबतही खायला छान लागतं.
२. सब्जाचं खास पुडींग
मधुमेह असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम स्नॅक्स असू शकतो. काही फळांचा शेक, ज्यूस आणि त्यात सब्जा घातलेलं पाणी हा एक चांगला गोड पदार्थ होऊ शकतो. कारण फळांचा रस आणि सब्जा हे दोन्ही पदार्थ अतिशय आरोग्यदायी आहेत. त्यांच्यामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स, वेगवेगळी पोषणद्रव्ये आणि खनिजे, प्रोटीन्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर हे सगळेच घटक भरपूर प्रमाणात असतात.
३. डार्क चॉकलेट
गोड खावंसं वाटलंच तर डायबिटीस असणाऱ्यांसाठी हा एक सगळ्यात सोपा गोड पदार्थ आहे. डार्क चॉकलेट नेहमी घरात ठेवा आणि गोड खावसं वाटलं की तोंडात टाका. अर्थात तुम्ही ते प्रमाणात खाणंही गरजेचं आहे. कारण त्यात थोडा का होईन पण शुगर कंटेंट असताेच. शिवाय डार्क चॉकलेटमध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स, झिंक, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते.
४. सातूचं पीठ
सातूच्या पीठामध्ये गुळाचं पाणी करून टाकलं की झाला एक पौष्टिक गोड पदार्थ तयार. सातूचं पीठ हे गहू आणि वेगवेगळ्या डाळींपासून तयार केलेलं असतं. शिवाय आपण त्यात गुळ टाकतो. त्यामुळे त्याचं पोषणमुल्य आणखी वाढतं. त्यामुळे सातूचं पीठ हा एक चांगला गोड पदार्थ आहे.
५. ब्राऊन ब्रेड आणि मध
दुपारच्या चहाच्या वेळी किंवा सकाळी जर काही गोड खावं वाटलं तर हा एक चांगला पदार्थ आहे. यासाठी ब्राऊन ब्रेड बटर लावून किंवा घरचं साजूक तूप टाकून खमंग भाजून घ्या. त्यावर एक बाजूने मध लावा. अतिशय चवदार लागणारा हा पदार्थ नक्कीच गोड खाल्ल्याचं समाधान देतो.