उन्हाळा काही दिवसांसाठी राहीला असला तरी शेवटच्या टप्प्यात जास्त गरम होतं. पाऊस जवळ आल्याने गरमीने अनेकदा जीव नको नको होतो. अशावेळी सतत पाणी पिऊनही आपली तहान भागत नाही. फक्त तहानच नाही तर शरीराचा ऊन्हाने किंवा घामाने होणारा थकवा भरुन निघण्यासाठीही शरीराला इतर घटकांची आवश्यकता असते. दिवसा ऊन्हातून घरी आल्यावर तर आपल्याला अंगातले त्राण गेल्यासारखे वाटते. अशावेळी शरीराला थंडावा देणारे आणि तरीही ताकद भरुन काढणारे काही मिळाले तर त्याचा चांगला उपयोग होतो. आहारतज्ज्ञ लवलीन कौर यासाठीच काही सोप्या आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज सांगतात. या रेसिपीजमुळे अंगातली ताकद भरुन येण्यास मदत होते. पाहूयात या रेसिपी कोणत्या आणि त्या कशा करायच्या (5 Summer Drinks To Beat The Heat).
१. कलिंगड ज्यूस
कलिंगडाच्या फोडी करुन त्यातील बिया काढून टाकाव्यात. त्यामध्ये पुदिन्याची पाने, लिंबू, काळं मीठ, मिरपूड घालावी. मग हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून त्याचा ज्यूस करुन घ्यावा. उन्हातून आल्यावर हा ज्यूस अतिशय छान लागतो. यामुळे किडनी डिटॉक्स होते, मायग्रेनचा त्रास कमी होतो आणि बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
२. लस्सी
दही एका वाडग्यात घेऊन त्याची घुसळून लस्सी करावी. त्यात थोडे लोणी घातल्यास मस्त गारेगार वाटते. यामध्ये आपण आवडीनुसार पुदीन्याची पाने, काळं मीठ, भाजलेले जीरे, हिंग, कडीपत्ता पाने किंवा पावडर, कोथिंबीर पाने किंवा पावडर घालावी. यामुळे लस्सीला फ्लेवर येण्यास मदत होते.
३. लिंबू-चिया वॉटर
चिया सीडस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात हे आपल्याला माहित आहे. पचनक्रियेसाठी या बिया फायदेशीर ठरतात. या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लिंबाच्या पाण्यात घालून घ्याव्यात. आवडीनुसार त्यात खडे मीठ घालावे. शरीराला अल्कलाईन्स मिळण्यास याची चांगली मदत होते. तसेच शरीर हायड्रेट राहण्यास याची चांगली मदत होते.
४. नारळ पाणी
बाजारात अनेक ठिकाणी नारळ पाणी मिळते. त्यामुळे पॅकींगचे नारळ पाणी न पिता बाजारात मिळणारे फ्रेश नारळ पाणी घ्यायला हवे.
५. गुलकंद पाणी
उन्हाळ्यात गुलकंद उष्णता कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. त्यामुळे गुलकंद दूध, गुलकंद कुल्फी खाल्ली जाते. चिया सीडसच्या पाण्यात १ चमचा गुलकंद घालून प्यायल्यास त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. यामुळे शरीर शांत राहण्यास मदत होते आणि त्वचा ग्लो करण्यास मदत होते.