इडली जितकी नाश्त्याला सहज बनवली जाते तितका डोसा नाही. कारण घरी बनवलेला डोसा कुरकुरीत आणि जाळीदार होत नाही. त्यामुळे बाहेर हाॅटेल रेस्टाॅरण्टमध्ये जाऊनच डोसा खाल्ला जातो. किंवा घरी डोसे केले तर त्याला धिरडे म्हणावे, डोसे म्हणू नये असा सल्लाही घरातले देतात, तेव्हा डोसा घरी करायलाच नको असं वाटतं. पण आवडतो म्हणून रोज बाहेर जाऊन डोसा कोण खाणार? त्यापेक्षा घरच्याघरी परफेक्ट डोसा कसा करता येईल हे शिकून घेणं सहज शक्य आहे.
Image: Google
अनेकींची स्वत: तयार केलेल्या डोशाबद्दल एक सर्वसामान्य तक्रार असते की, डोसा फडक्यासारखा होतो. तो कुरकुरीत लागत नाही. डोशाच्या बाबतीत चवीआधी त्याची जाळी आणि कुरकुरीतपणा याचा विचार आधी केला जातो. हे घरी केलेल्या डोशाच्या बाबतीत जमून येण्यासाठी डोसा कसा भाजावा, कसा भाजू नये हा नंतरच्या मुद्दा. मुळात डोशाचं पीठ नीट तयार करता येणं महत्त्वाचं. ते जमलं की पुढचं काम सोपं आणि यशस्वीरित्या पार पडतं. डोशाचं पीठ करताना काही चुकलं तर मात्र पिठात चवीसाठी भरपूर काही घातलं तरी आपण केलेल्या डोशाचा पोत अस्सल डोशाच्या पोतासारखा जमत नाही . म्हणून डोशाचं पीठ करताना काही नियम पाळणं महत्त्वाचं.
Image: Google
डोशांचं पीठ तयार करताना
1. डोशाचा पोत डोशांसारखाच होण्यासाठी तांदूळ आणि उडदाच्या डाळीचं योग्य प्रमाण महत्त्वाचं. त्यासाठी दोन मोठे पातेले घ्यावे. त्यात 4 वाट्या तांदूळ धुवून भिजत घालावा आणि एका भांड्यात उडदाची डाळ धुवून भिजत घालावी. डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजवावे. वेगवेगळे वाटून मग दोन्ही पिठं एकत्र करुन डोशाचं पीठ तयार करावं.
2. डोशाचं पीठ नीट होण्यासाठी डाळ आणि तांदुळ नीट भिजायला हवेत. ते नीट भिजण्यासाठी त्यांना पुरेशी जागा हवी. म्हणून छोट्या भांड्यात तांदूळ आणि डाळ भिजत घालू नये. डाळ तांदूळ भिजत घालण्यासाठी मोठे पातेले घ्यावे.
Image: Google
3. तांदूळ आणि उडदाची डाळ वाटून झाल्यावर हे दोन्ही पिठं एकत्र करुन डोशाचं पीठ होतं. डोशाचं पीठ खूप घट्ट आणि खूप पातळ असू नये. तर ते सरबरीत असावं. खोलगट चमच्याने घेऊन ते ओतून बघावं. चमच्यातून लवकर सुटत नसेल, चिटकून राहात असेल तर पीठ घट्ट झालं असं समजून त्यात थोडं पाणी घालावं. पण डोशाच्या पिठात जास्त पाणी घालून उपयोगाचं नाही, यामुळे डोशाचं पीठ नीट आंबत नाही. डोशाचं पीठ आंबायला ठेवण्याआधी ते चमच्यानं कमीत कमी दहा मिनिटं फेटावं. फेटातना पीठ वरचेवर नाही तर चमच्यानं भांड्याच्या बुडापासून फेटावं.
4. सामान्य तापमानात डोशाचं पीठ आंबवण्यासाठी 8 -10 तास पीठ झाकून थोड्या ऊबदार जागेत ठेवावं लागतं. पण थंडं हवामान असल्यास पीठ आंबण्यासाठी 12- 16 तासही लागतात. उन्हाळ्यात 6- 8 तासात पीठ आंबतं.
Image: Google
5. डोशाचं पीठ जास्त आंबू नये म्हणून पीठ फेटून ते फ्रीजमधे ठेवलं जातं. पण ही कृती चुकीची आहे. यामुळे डोशाचं पीठ थोडं काय तर काहीच आंबत नाही. डोशाचं पीठ हे फ्रिजच्या बाहेर, सामान्य तापमानातच आंबवायला हवं. फ्रिजमधील कमी तापमानात आंबण्याची क्रिया होत नाही.