आरोग्य उत्तम ठेवायचं तर चांगला आहार घ्यायला हवा. यासाठी आहारविज्ञानाबद्दल थोडी तरी माहिती असणे आवश्यक आहे. जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर, खनिजे, स्निग्ध पदार्थ अशा सगळ्या घटकांचा आहारात समतोल असेल तरच आपली तब्येत चांगली राहण्यास मदत होते. आहारशास्त्रानुसार काही पदार्थ कच्चे खाल्लेले चांगले असतात तर काही पदार्थ शिजवल्याशिवाय खाल्ले तर आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. इतकेच नाही तर बरेच पदार्थ तळण्यापेक्षा किंवा शिजवण्यापेक्षा भाजणे अधिक हितकारक ठरु शकते. तर काही पदार्थ पाण्यात भिजवून खाल्लेले आरोग्यासाठी जास्त चांगले असते. भिजवल्यामुळे या पदार्थांचे पोषणमूल्य वाढते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्याबरोबरच पोटाचे आरोग्य चांगले राहते आणि ताण दूर होण्यास मदत होते. तर काही पदार्थ भिजवून खाल्ल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि काही व्हायरल इन्फेक्शन्स दूर होण्यासही त्याचा फायदा होतो. आता असे कोणते पदार्थ आहेत जे भिजवल्याशिवाय खाऊ नयेत पाहूया.
१. खसखस
खसखस आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून अतिशय महाग असणारा हा पदार्थ आहे. वजनाने खूप हलका असणारा हा पदार्थ साधारणपणे गोड पदार्थांमध्ये वापरला जातो. खसखसीमध्ये फोलेट, थियामिन, पँटोथेनिक अॅसिड, व्हिटॅमिन बी असे अनेक उपयुक्त घटक असतात. शरीरावर वाढलेले फॅटस कमी करण्यासाठी रात्रभर पाण्यात किंवा दुधात भिजवलेली खसखस खाणे उपयुक्त ठरते.
२. मेथ्या
मेथ्यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते त्यामुळे पोट आणि कोठा साफ होण्यास मदत होते. तसेच कोणाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर भिजवलेल्या मेथ्या खाणे अतिशय फायद्याचे असते. एका ग्लासमध्ये चमचाभर मेथ्या भिजत घालून सकाळी उठल्या उठल्या मेथ्यांसकट हे पाणी प्यायल्यास त्याचा चांगला फायदा होतो. हा उपाय नियमित केल्यास पचनाच्या तक्रारी दूर होतात. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही मेथ्या फायदेशीर असल्याने डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी हा उपाय अवश्य करायला हवा.
३. बदाम
बदाम रात्रभर पाण्यात भिजवल्यास त्याचे पोषणमूल्य आहे त्याहून जास्त वाढण्यास मदत होते. उच्च रक्तदाब आणि हाय कोलेस्टेरॉलपासून सुटका होण्यासाठी भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर असते. बदाम भिजवून खाल्ल्यास बुद्धी तल्लख होण्यास तसेच ऊर्जा मिळण्यासही मदत होते. बदाम भिजवल्यामुळे ते पचायला हलके होतात.
४. आंबे
आंबा हे उष्ण फळ असून ते पाण्यात भिजवून ठेवल्यास त्यातील उष्णता कमी होण्यास मदत होते. तसेच आंब्याच्या तोंडाशी जो पांढरा चिक असतो तो आरोग्यासाठी अतिशय हानीकारक असतो. आंबे भिजवल्यामुळे पचायल हलके होतात. त्यामुळे आंबा हे फळ काही तास भिजवून मगच खायला हवे.
५. काळे मनुके
काळ्या मनुकांमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. तसेच काळ्या मनुकांमध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने त्या आरोग्यासाठी अतिशय चांगल्या असतात. रात्रभर मनुका पाण्यात भिजवून ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ल्या तर त्वचा चांगली होण्यास मदत होते. ज्यांच्यामध्ये लोह, हिमोग्लोबिनची कमतरता असते अशांनी भिजवलेल्या काळ्या मनुका आवर्जून खायला हव्यात.