Join us  

कैरीच्या पारंपरिक पन्ह्यासह करा 5 हटके -वेगळे प्रकार, उन्हाळ्यात गारेगार आंबटगोड सुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2022 7:59 PM

आंबट गोड चवीचं पन्हं करण्याच्या विविध पध्दती आहेत. झटपट पन्ह्यापासून वर्षभर टिकणारं पन्हं असे पन्ह्याचे अनेक प्रकार करता येतात.

ठळक मुद्देगुळाचं पन्हं करताना कैरीच्या गरात गूळ हातानं मिसळावा. यामुळे पन्ह्याला चव आणि रंग छान येतो.  कच्च्या कैरीचं पन्हं करण्यासाठी कैरी जाडसर किसून ती पाण्यात भिजवावी लागते. कैरीचं पन्हं वर्षभरासाठीही टिकवता येतं. 

उन्हाळ्यात सारखी तहान लागते, अंगाची लाही लाही होते. नुसत्या कैरीवर सैंधव मीठ घालून  खाल्लं तरी बरं वाटतं. कैरी म्हटलं की आधी डोळ्यासमोर येतं ते पन्हं. उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशनचा धोका पन्हं पिल्यानं दूर होतो. आंबट गोड चवीचं पन्हं करण्याच्या विविध पध्दती आहेत. झटपट पन्ह्यापासून वर्षभर टिकणारं पन्हं असे पन्ह्याचे अनेक प्रकार करता येतात. 

Image: Google

गुळाचं पन्हं

गुळाचं पन्हं करण्यासाठी अर्धा कि. कैरी, मीठ, गूळ, वेलची पूड आणि चवीप्रमाणे मीठ घ्यावं. आधी कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्याव्यात. कैरीची सालं काढून घ्यावीत. कैरीच्या फोडी कराव्यात. त्या शिजवून घ्याव्यात. थंडं झाल्यावर शिजवलेली कैरी मिक्सरमधून वाटून घ्यावी. कैरी वाटून झाल्यावर त्यात गूळ घालून तो हातानं मिसळावा. मिक्सरमध्ये कैरीच्या गरासोबत गूळ मिसळल्यास पन्ह्याचा रंग बदलतो. ते टाळण्यासाठी कैरीच्या गरात हातानं गूळ मिसळावा. त्यात  चवीप्रमाणे मीठ घालावं. त्यात पाणी घालून पन्हं नीट हलवून घ्यावं. ते थंडं करुन प्यावं.

Image: Google

साखरेचं पन्हं

साखर घालून पन्हं करण्यासाठी अर्धा किलो कैरी, साखर आणि मीठ घ्यावं.  कैरीची सालं काढून कैरीच्या फोडी कराव्यात. त्या कुकरमध्ये शिजवून घ्याव्यात. कैरी मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावी. कैरीचा जितका गर असेल त्याच्या अडीच पट साखर घालावी. साखर गरात नीट मिसळून पाणी घालून पन्हं तयार करावं. पन्ह्यात चवीप्रमाणे मीठ घालून पन्हं पिण्यापूर्वी गार करावं. 

Image: Google

पुदिना पन्हं

कैरीचं पुदिना पन्हं करण्यासाठी 3 कैऱ्या, 20-25 पुदिन्याची पानं, 100 ग्रॅम साखर, अर्धा चमचा सैंधव मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा कप बर्फाचे तुकडे आणि 2-3 कप पाणी घ्यावं.  कैरीची सालं काढून कैरीच्या फोडी कराव्यात. एका भांड्यात 2-3 कप पाणी घालावं. पाण्यात साखर घालावी. हे पाणी चांगलं उकळवून घ्यावं. पाणी उकळलं की त्यात कैरीच्या फोडी टाकाव्यात. भांड्यावर अर्धं झाकण ठेवून कैरीच्या फोडी 5-6 मिनिटं उकळाव्यात. नंतर गॅस बंद करुन मिश्रण गार होवू द्यावं. गार झाल्यानंतर कैरी आणि साखरेचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालावं. त्यात पुदिन्याची पानं, सैंधव मीठ, भाजलेल्या जिऱ्यांची पावडर आणि बर्फाचे तुकडे घालून मिक्सरवर किंवा ब्लेण्डरनं फिरवून घ्यावं. पन्हं ग्लासमध्ये काढावं. आणि त्यात थोडी मिरे पूड घालावी. हे पुदिन्याचं पन्हं छान थंडावा देतं आणि पचनासाठीही उत्तम असतं. 

Image: Google

कच्च्या कैरीचं पन्हं

कच्च्या कैरीचं पन्हं करण्यासाठी 1 कैरी किसून, चवीनुसार पिठीसाखर आणि मीठ घ्यावं.  पन्हं करण्यासाठी कैरी जाडसर किसून घ्यावी. किसलेली कैरी एका भांड्यात ठेवावी. त्यात पाणी घालावं. कैरीचा किस अर्धा तास पाण्यात भिजवावा. नंतर हा किस पिळून घ्यावा. त्या पाण्यात चवीनुसार पिठी साखर आणि मीठ घालावं. पन्हं थंडं करुन प्यावं.

Image: Google

वर्षभर टिकणारं पन्हं

वर्षभर टिकणारं पन्हं करण्यासाठी 2 कैऱ्या, 1 कप पाणी, पाऊण कप साखर, 2/3 वेलची आणि केशर घ्यावं.प्रथम कैऱ्या धुवून पुसून कोरड्या कराव्यात. कैरीचे सालं काढून कैरीच्या छोट्या छोट्या फोडी कराव्यात.  एका पातेल्यात कैरीचे तुकडे आणि त्यात 1 कप पाणी घालून मंद आचेवर कैरीच्या फोडी शिजवून घ्याव्यात.  फोडी मऊ शिजल्यावर त्यात साखर आणि वेलची पूड घालावी.  मिश्रण चांगलं परतून घ्यावं.  2-3 मिनिटांनी गॅस बंद करावा. मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरमधून बारीक वाटावं. नंतर यात केशर घालावं. कैरीचा हा घट्टसर गर एका हवाबंद काचेच्या बरणीत भरुन फ्रिजमध्ये ठेवावा. जेव्हा पन्हं प्यायचं असेल तेव्हा पाऊण ग्लास पाण्यात  2 चमचे पल्प घालून पाण्यात तो मिसळून घ्यावा. त्यात बर्फाचे 2-3 खडे आणि थोडं मीठ घालावं.

  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती