Join us  

हिवाळ्यात इम्युनिटी वाढविण्यासाठी खा 6 गोष्टी; सुपरफूडने मिळवा उत्तम प्रतिकारशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 11:34 AM

थंडीत मस्त खा, स्वस्थ राहा म्हणत आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा...

ठळक मुद्देकपड्यांनी ऊब मिळवण्याबरोबरच आहारातील या पदार्थांनीही मिळवा थंडीत ऊब वर्षभर तब्येत चांगली ठेवण्यासाठी खा हे पदार्थ, तुम्हीही राहाल तंदुरुस्त

थंडी पडायला लागली की आपण गरम कपडे, ब्लँकेट यांची तयारी करतो. थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी बाह्य गोष्टींबरोबरच आहाराच्या बाबतीतही तयारी करायला हवी. आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर ही थंडी नक्कीच सुखकर आणि प्रतिकारशक्ती वाढवणारी होऊ शकेल. थंडीत तब्येत कमावली तर पुढील वर्षभर आरोग्याकडे फारसे लक्ष द्यावे लागत नाही असे म्हणतात. थंडीच्या दिवसांत बाजारात भाज्या, फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच या दिवसांत खाल्लेले अन्न सहज पचत असल्याने आहारात सर्व गोष्टींचा समावेश करायला हवा. पण या काळात आवर्जून काही गोष्टी खायलाच हव्यात, ज्यांना आपण थंडीसाठीचे सूपरफूड म्हणू शकतो. ज्यामुळे कुडकुडायला लावणारी थंडी काही प्रमाणात ऊब निर्माण करु शकेल. आता थंडीत मुद्दाम कोणते पदार्थ खायला हवेत पाहूया....

१. आवळा - हे फळ चवीला आंबट असले तरी नियमितपणे आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. आवळ्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. थंडीत उद्भवणाऱ्या सर्दी, कफ यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी आवळा अतिशय उपयुक्त असतो. 

२. तूप - तूप हा अनेकांच्या आवडीचा विषय. प्रत्येक पदार्थांवर तूप घालून खाणारे लोक आपल्या आसपास असतात. एरवी इतके तूप खाणे चांगले नसते असे आपण म्हणत असलो तरी थंडीच्या दिवसांत शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी नियमित तूप खायला हवे. तूपामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.   

३. रताळे - रताळे केवळ उपवासाला खातात असा आपला समज असतो. पण तुम्ही एरवीही विशेषत: हिवाळ्यात रताळ्याचा आहारात समावेश करायला हवा. कंदमूळ असलेल्या रताळ्यामध्ये व्हीटॅमिन्स, फायबर, खनिजे जास्त प्रमाणात असतात असे नाही, मात्र तरीही थंडीत रताळी खाणे आरोग्यासाठी चांगले असते. 

४. खजूर - खजूरामध्ये लोह, खनिजे यांचे प्रमाण जास्त असते असे म्हटले जाते. खजूर काही प्रमाणात उष्ण असल्याने थंडीत दररोज आवर्जून खजूराच्या दोन ते तीन बिया खायला हव्यात. खजूरामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि वाढलेले वजन कमी होण्यासही मदत होते. तसेच हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खजूर अतिशय उपयुक्त असतात. यामध्ये तुम्ही खजूर रोल, खजूर लाडू अशा वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करु शकता. 

५. दाणे - शेंगादाणे, बदाम, आक्रोड यांसारखे दाण्यांचे प्रकार थंडीच्या दिवसांत आहारात असायला हवेत. यामुळे केवळ प्रतिकारशक्ती वाढते असे नाही तर शरीरातील उष्णता टिकू राहण्यास मदत होते. दाण्याचे किंवा सुकामेव्याचे लाडू करुन ते खाणे हा उत्तम पर्याय आहे. 

६. पालेभाज्या - हिवाळ्यात पालेभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पालेभाज्यांमध्ये व्हीटॅमिन, खनिजे, लोह, पोटॅशियम हे घटक पुरेशा प्रमाणात असतात. त्यामुळे आरोग्य चांगले राहायला मदत होते. पालेभाज्यांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. 

टॅग्स :अन्नथंडीत त्वचेची काळजीआहार योजना