Join us  

रोजच्याच पोळीला द्या छोटासा ट्विस्ट, ७ पर्याय-त्याच पोळीतून मिळेल मुलांना दुप्पट पोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2024 9:14 AM

7 options for making Childs roti or paratha more nutritious : हे घटक नेमके कोणते, ते कधी-कसे घालायचे याबाबत

पोळी हा महाराष्ट्रीयन लोकांच्या आहारातील महत्त्वाचा पदार्थ आहे. यासाठी प्रामुख्याने आपण गव्हाचा वापर करतो. गव्हातून शरीराला आवश्यक असे बरेच घटक मिळत असल्याने भाजी-पोळी खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. मुलांनाही शाळेच्या डब्याला आपण आवर्जून पोळी-भाजी देतो. पण या नेहमीच्याच पोळीची पौष्टीकता थोडी जास्त वाढावी यासाठी काही सोपे उपाय केल्यास त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. पोळ्या करतानाच त्यामध्ये लक्षात ठेवून काही घटक घातल्यास पोळ्यांचे पोषणमूल्य नक्कीच वाढते. पण हे घटक नेमके कोणते, ते कधी-कसे घालायचे याबाबत आधीपासून नियोजन आणि योग्य ती माहिती असायला हवी. पाहूयात मुलांचा शारीरिक विकास चांगला व्हावा यासाठी त्यांच्या पोळीमध्ये घालता येतील असे ७ सोपे पर्याय (7 options for making Childs roti or paratha more nutritious)...   

१. पोळी लाटताना त्यामध्ये तीळ घालायचे.तीळ हा प्रोटीन आणि ओमेगा ३ चा उत्तम स्रोत असल्याने आरोग्यासाठी तीळ अतिशय फायदेशीर असतात. 

(Image : Google)

२. पोळी करून झाल्यावर त्यावर भरपूर तूप आणि दाण्याची चटणी किंवा दाण्याचा कूट घालून खावा. त्यामुळे पोळीची पौष्टिकता वाढण्यास मदत होते. 

३. मोरींगा पावडर म्हणजेच शेवग्याची पावडर पोळी लाटताना घातल्यास शरीराला कॅल्शियम, फॉस्फरस यासारखी खनिजे मिळण्यास मदत होते.  

४. पोळी लाटताना त्यामध्ये दाण्याचा कूट किंवा इतर कोणत्याही नट्सची पावडर घातल्यास पोळी नेहमीपेक्षा जास्त ताकद देणारी ठरते. 

५. कणिक मळताना त्यामध्ये जवसाची पावडर करून घालावी आणि मग पोळी लाटावी. जवस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. 

६. ओट्स भाजून त्याची मिक्सरमध्ये पावडर करून ती कणिक मळताना त्यामध्ये घालावी. यामुळे पोळीची पौष्टिकपणा वाढण्यास मदत होते. 

७. याबरोबरच पोळीची कणिक मळताना त्यामध्ये पालकाची प्युरी किंवा बिटाची प्युरी घातली तरी त्याचे पौष्टिक कलरफुल पराठे होऊ शकतात.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीपालकत्व