भाज्या आणि फळे खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते असे आपण नेहमी ऐकतो. प्रत्येक भाजी आणि फळात काही ना काही गुणधर्म असतो ज्याचा शरीराला फायदा होतो. आता भेंडीसारख्या भाजीमधून काय मिळणार, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण भेंडीमध्येही आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक घटक असतात. भेंडीची भाजी काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात आवडत नाही. लहान मुलांना साधारणपणे आवडणारी ही भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. बारीक काप करून, उभी चिरून, दह्यातली भेंडी, भरली भेंडी, तेलावर फ्राय केलेली भेंडी असे भेंडीचे बरेच प्रकार करता येतात.
भेंडीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हीटॅमिन ए, के, सी आणि बी ६ ही पोषक तत्वे असतात. या सर्व घटकांची शरीराला आवश्यकता असून शरीराचे उत्तमरितीन पोषण होण्यासाठी आहारात भेंडीच्या भाजीाच समावेश असायलाच हवा. व्हिटॅमिन सी आणि के १ या घटकांसाठी भेंडी हा उत्तम स्रोत आहे. भेंडीमध्ये कार्बोहायड्रेटचे आणि कॅलरीचे प्रमाण कमी असल्यानेही ही भाजी हेल्दी मानली जाते. तर शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन आणि फायबर हे घटक भंडीत पुरेशा प्रमाणात असतात.
१.अँटीऑक्सिडंटसचा उत्तम स्रोत
भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असतात. शरीराचे कार्य सुरळीत होण्यासाठी अँटीऑक्सिडंटसची आवश्यकता असते. हल्ली बॉडी डिटॉक्स करण्याच्या नावाखाली, ग्रीन टी किंवा तत्सम पदार्थ घेतले जातात ज्यामध्ये अँटीऑक्सिंडंटसचे प्रमाण जास्त असते. मात्र आपल्याला माहित नसते आपण नियमितपणे खात असलेल्या भेंडीच्या भाजीतही हे घटक असतात, ज्यामुळे बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होत असते. भेंडीमुळे शरीराच्या पेशींचे रक्षण होते आणि कर्करोगासारख्या दुर्धर आजारांपासून आपण दूर राहू शकतो. तसेच हृदयाचे कार्य सुरळीत राहावे यासाठीही त्याचा उपयोग होतो.
२. मधुमेहासाठी फायदेशीर
मधुमेहींसाठी भेंडी खाणे फायदेशीर असते. या भाजीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे पचन व्हायला वेळ लागतो. त्यामुळे रक्तात साखर तयार होण्यासही वेळ लागतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण इतर पदार्थांच्या तुलनेत कमी वाढते. भेंडीची भाजी नियमित खाल्ल्यास शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. सध्या मधुमेह ही अतिशय सामान्य समस्या झाली असून ३० ते ४० वर्षे वयोगटात मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भेंडीचे सेवन केल्यास तुम्ही या आजारापासून काही प्रमाणात दूर राहण्यास मदत होऊ शकते.
३. गर्भवतींसाठी फायदेशीर
गर्भवती महिलांना फोलेट म्हणजेच व्हीटॅमिन बी ९ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व मानले जाते. अनेकदा गर्भवती महिलांना फोलिक अॅसिडची गोळी घेण्याचाही सल्ला दिला जातो. गर्भवती महिलेला दिवसाला ४०० मायक्रोग्रॅम फोलेटची आवश्यकता असते. तर १०० ग्रॅम भेंडीमधून यातील १४ टक्क्यांची गरज पूर्ण होते. त्यामुळे गर्भवती महिलांनी ९ महिन्यांच्या काळात भेंडीची भाजी आवर्जून खायला हवी.
४. कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव
भेंडीत लॅक्टीन नावाचा पोषक घटक असतो. शरीरातील कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखण्यासाठी हा घटक आवश्यक असतो. कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यास हा घटक ६३ टक्के उपयुक्त ठरत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे भेंडीच्या भाजीला कमी न लेखता तिचा आहारात समावेश करायला हवा.
५. केसांसाठी उपयुक्त
भेंडी खाल्ल्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. केसांची निगा राखणे हा एक मोठा विषय असून त्यासाठी आहारात सर्व घटकांचा समावेश केल्यास बरेचसे काम होते. भेंडीमुळे केसांमधील कोंड्याचे प्रमाण कमी होऊन कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.
६. पचनशक्ती सुधारते
सध्या बैठी जीवनशैली, अपुरी झोप, कामाचा ताण यांचा परिणाम म्हणून पचनाच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसते. मात्र भेंडीचे नियमित सेवन केल्यास या समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. मळमळ, पोटदुखी, गॅसेस, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. एकूण पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
७. त्वचा चांगली होण्यास मदत
भेंडीतील अँटीऑक्सिडंटस एकूणच शरीरासाठी फायदेशीर ठरतात. शरीरातील नको असलेले घटक बाहेर न पडल्याने चेहऱ्यावर पुरळ, काळे डाग, पिंपल्स येण्यास सुरुवात होते. पण तुम्ही नियमित भेंडी खाल्ली तर या संमस्यांपासून तुम्ही काही प्रमाणात दूर राहू शकता. भेंडीमध्ये असणारे अँटीबॅक्टेरीयल, अँटीफंगल घटक तुमची त्वचा नितळ ठेवण्यास मदत करतात.