धान्यं, डाळी साळी-उसळी, फळं-भाज्या, तेल-तूप, तिखट-मसाले, मीठ-साखर-गूळ या गोष्टी आरोग्यावर जितक्या परिणाम करतात तितक्याच स्वयंपाकाच्या पध्दतींचा,स्वयंपाक करताना होणाऱ्या चुकांचा परिणाम आरोग्यावर होतो. पदार्थ केवळ चवीसाठी खात नाही तर त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम व्हावा, आहारातून पोषणमुल्यं शरीरास मिळावीत हा महत्त्वाचा हेतू खाण्यामागे असतो. पण हा हेतू स्वयंपाकात होणाऱ्या चुकांमुळे असाध्य होत असेल तर स्वयंपाक करताना आपण कुठे चुकतो याकडे बघायला हवं. केवळ चवीच्या पाठीमागे लागून स्वयंपाक करताना होणाऱ्या या चुका टाळता आल्यात तर आहारातून पोषण मिळण्याचा उद्देश सफल होईल.
पोषणास अडथळा आणणाऱ्या स्वयंपाकातल्या चुका
Image: Google
1.सॅण्डविच असेल किंवा भाज्या, सॅलेड यावर ड्रेसिंग करण्याची अति हौस आरोग्यावर विपरित परिणाम करते असं तज्ज्ञ म्हणतात. सॅण्डविच, सॅलेड यावर अति प्रमाणात चीज, मेयोनीज टाकून खाल्ल्यास शरीरात सोडियम जास्त जातं. त्याचा परिणाम शरीरातील पेशी पाणी जास्त धरुन ठेवतात.
Image: Google
2. पूर्वीच्या तुलनेत आता स्वयंपाकात मधाचा वापर वाढला आहे. औषधी गुणधर्माचं मध स्वयंपाकात योग्य पध्दतीनं वापरायला हवं. पदार्थाचं तापमान जास्त असताना त्यात मध घातलं तर मधातील पोषक गुणधर्म नष्ट होतात. उच्च तापमानात मधाचा वापर केल्यास त्यातील औषधी गुणधर्मांचं रुपांतर विषारी घटकात होतं. मध हे कच्च्या स्वरुपात वापरलं जाणं, पदार्थ गरम असताना, पदार्थ शिजवताना/ उकडताना मध न वापरणं हा नियम आहे. पण तो मोडला जावून आरोग्यास मधाचे अपाय भोगावे लागतात.
Image: Google
3. स्वयंपाकात विविध प्रकारच्या तेलांचा उपयोग केला जातो. खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल हे प्रामुख्याने पौष्टिक तेल म्हणून ओळखली जातात. या तेलातील पौष्टिक गुणधर्म उच्च तापमानाला नष्ट होतात. त्यामळेच खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल हे उच्च तापमानाला तापवायची नसतात. सूर्यफुल्, सोयाबीन तेलाचा वापर हा परतणे, भाजणे आणि तळण्यासाठी करता येतो. पण केवळ चव आणि ड्रेसिंगसाठी ऑलिव्ह ऑइल, जवसाचं तेल यांचा उपयोग होतो. त्यामुळे ऑलिव्ह ऑइल, जवसाचं तेल फोडणीसाठी जास्त तापवलं तर त्यातील पोषक गुणधर्मांच नाश होतो. तेलांचा चुकीच्या पध्दतीने वापर केल्यानं शरीरावरही नकारात्मक परिणाम होतात.
Image: Google
4. तळलेले पदार्थ चवीला छानच लागतात. पण सतत् तळलेले पदार्थ खाल्ल्यास मधुमेह, ह्रदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे आरोग्य जपायचं असल्यास तळण कमी करावं असं तज्ज्ञ सांगतात. तळण करायचं असल्यास एयर फ्रायर्स हा पर्याय वापरावा असं तज्ज्ञ म्हणतात. या प्रकारे तळण केल्यास तळणास फारच कमी तेल लागतं.
Image: Google
5. पौष्टिक पदार्थ अयोग्य भांड्यात शिजवल्यास त्याचा परिणाम अयोग्यच होतो. स्वयंपाकासाठी जास्तीत जास्त नाॅनस्टिक भांड्याचा वापर केल्यास या भांड्यातील टेफ्लाॅन या घटकातील परफ्लुओरोओक्टॅनोइक ॲसिडचा नकारात्मक परिणाम आरोग्यावर होतो. या रसायनाचा यकृतावर घातक परिणाम होतो असं तज्ज्ञ म्हणतात. स्वयंपाकासाठी ॲल्युमिनियम, नाॅनस्टिक या भांड्यांचा वापर न करता लोखंडी, स्टील आणि मातीची भांडी वापरावीत.
Image: Google
6. पदार्थ शिजताना त्यात मीठ घालणं योग्य पध्दत आहे. पण नंतर पदार्थात मीठ टाकून चव ॲडजेस्ट करणं ही घातक सवय असून त्याचा परिणाम ह्रदय, किडनीच्या आरोग्यावर होतो. पदार्थ शिजल्यानंतर ,गॅस बंद केल्यावर वरुन मीठ टाकणं ही सवय रक्तवाहिन्या, मज्जासंस्था, लसिका ग्रंथी यांच्यावर वाईट परिणाम करणारी ठरते असं तज्ज्ञ सांगतात.
Image: Google
7. पदार्थ किती प्रमाणात शिजवावा यावरही त्याचं पोषण मुल्यं अवलंबून असतं. भाज्या गाळ होतील इतक्या प्रमाणात शिजवल्या तर त्यातील पोषणमुल्यं नष्ट होतात. अशा अति शिजलेल्या भाज्या खाऊन शरीरास शून्य पोषण घटक मिळतात. सूपसाठी पालेभाज्या शिजवताना त्यांना फक्त एक उकळी काढणं गरजेचं असतं. सूप पौष्टिक होण्यासाठी या भाज्यांमध्ये करकरीतपणा असणंही गरजेचं असतं. तो जर भाज्या अति शिजवण्यात निघून गेला तर भाज्यांच्या सूपमधून आरोग्यास शून्य पोषणमुल्यं मिळतात. एरवी कोरड्या भाज्य करताना त्या चांगल्या परतून आणि अगदी थोड्या प्रमाणात शिजवल्या तर त्या भाज्यातील पोषक घटकांचा आरोग्यास लाभ होतो.
Image: Google
8. भाज्या, सॅलेड करताना प्रत्येक भाजीची सालं काढून टाकणं अयोग्य बाब अस्ल्याचं तज्ज्ञ म्हणतात. बटाटा, डांगर, काकडी, गाजर या भाज्यांमध्ये त्यांच्या सालातही पोषक गुणधर्म जास्त असतात त्यामुळे भाज्यांची सालं काढून टाकल्यास भाज्यातील पोषक गुणधर्मांचं नुकसान होतं. भाज्यांप्रमाणेच फळांच्या सालीतही पोषक गुणधर्म असतात. सफरचंदाच्या सालांमध्ये पोषक गुणधर्म जास्त असतात. सालं काढून फळं खाण्याची सवय फळांमधील पोषण मुल्यास मारक ठरते.