चाट पार्टी म्हटलं, की सुरुवात पाणीपुरीने होणार आणि शेवटही पाणीपुरीनेच. तरीही मन भरतच नाही. जाता जाता ' भैय्या बहोत तिखी लगी, एक मसाला पुरी दो ना' ही विनंती होते आणि ही मागणी होणारच हे आता चाट गाड्यावरच्या भैय्यांनाही चांगलंच माहीती आहे. त्यामुळे कधीही मसाला पाणीपुरीच्या विनंतीला नाक मुरडलं जात नाही.
Image: Google
पाणीपुरी फक्त आपल्याकडे खूप लोकप्रिय आहे असं नाही. भारतभरात पाणीपुरीनं आपल्या लोकप्रियतेचं साम्राज्य निर्माण केलं आहे. वेगवेगळ्या राज्यातली पाणीपुरी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते आणि चवीच्या बाबतीतही प्रदेशानुसार बदल झालेले आढळतात. सांगायचा मुद्दा हा, की कुठे दुसऱ्या राज्यात फिरायला गेलात तर तिथली पाणीपुरी नक्की खाऊन पाहा. आणि आवडलीच तर आल्यावर आपल्या नेहमीच्या पुरीत त्यापध्दतीचं पाणी आणि सारण भरुन बघा.
Image: Google
पाणीपुरीच्या आठ तऱ्हा
1. गोल गप्पे- गोल गप्पे नावाची, मसालेदार पाणीपुरी ही दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मिर, हरियाणा, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात खाल्ली जाते. या गोल गप्प्यांमधे बटाटा, छोटे, चटणी यांचं सारण भरतात. आणि तिखट पाण्यात बुडवून खायला दिले जातात.
2. फुचका- भारतातील पूर्वेकडील बिहार, झारखंड राज्यात आणि पश्चिमेकडे बंगालमधे फुचका नावाची पाणीपुरी खाल्ली जाते. फुचकाच्या सारणासाठी उकडलेले हरभरे, उकडलेला बटाटे कुस्करुन वापरले जातात. फुचकाची चटणी तिखट असते आणि पाणी मसालेदार असतं. फुचका इतर पाणीपुरींपेक्षा आकारानं मोठी असते. ही पुरी गव्हाच्या कणकेपासून तयार केली जाते.
Image: Google
3. पाणीपुरी- ही पाणीपुरी गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू या राज्यात खाल्ली जाते. ही अशीच पाणीपुरी नेपाळ या देशातही मिळते. पण राज्यानुसार पाणीपुरीच्या स्वादात मात्र फरक असतो. गुजरातमधे उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि गोड चटणी असं सारण पाणीपुरीत भरतात. तर महाराष्ट्रात चिंचेची गोड चटणी, पुदिन्याचं हिरवं तिखट पाणी हे पाणीपुरीचं वैशिष्ट्य आहे.
4. पकौडी- पाणीपुरीला कोणी पकौडी कसं म्हणेल बरं. पण गुजरात आणि मध्यप्रदेश मधील काही भागात पाणीपुरी पकौडी नावानं ओळखली जातात. ही पकौडी देताना हिरवी मिरची आणि पुदिन्याचं पाणी घातलं जातं. खायला देताना वरुन बारीक शेव टाकली जाते.
Image: Google
5. गुपचुप- पाणीपुरीचं हे एक मजेशीर नाव आहे. गुपचुप प्रकारची पाणीपुरी तोंडात टाकल्यावर काही वेळ बोलताच येत नाही, म्हणून ही पाणीपुरी गुपचुप नावानं ओळखली जाते. ओडिशा, बिहार, झारखंड, छत्तीसगड, हैद्राबाद आणि तेलंगणामधील काही भागात ही गुपचुप प्रकारची पाणीपुरी मिळते. यात पांढऱ्या वाटाण्याचं आणि उकडलेल्या बटाट्याचं सारण आणि तिखट मसालेदार पाणी हे या गुपचुपचं वैशिष्ट्य.
6. पानी के बताशे- उत्तर प्रदेशात पाणीपुरी ही पानी के बताशे नावानं ओळखली जाते. याची पुरी आपल्या नेहमीच्या पाणीपुरीसारखीच असते. सारण मात्र वेगळं असतं.
Image: Google
7. टिक्की- कबाबसारखं वाटणारं नाव. पण ही आहे पाणीपुरी. मध्यप्रदेशातील होशंगाबादमधे पाणीपुरीला टिक्की म्हणून ओळखलं जातं. ही टिक्की एरवीच्या पाणीपुरीपेक्षा छोट्या आकाराची असते.
8. फुलकी- उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये काही भागात पाणीपुरी ही फुलकी नावानं ओळखली जाते. ही पाणीपुरी महाराष्ट्रात मिळणाऱ्या पाणीपुरीसारखीच असते, फक्त नाव वेगळं आहे.