पराठे हा असा पदार्थ आहे जो सकाळी नाश्त्याला खाल्ला तरी पोट भरतं, दुपारच्या जेवणाला पराठे असले तरी चालतं आणि रात्री दुसरं काही करायचा कंटाळा आला आणि पराठे आणि चटणी केली तरी भागतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ आहे. हेच पराठे जरा काही विशिष्ट युक्त्यांनी बनवले तर ते पौष्टिकही होतात. अनेकदा मुलं काय मोठेही भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, आपल्यालाही विशिष्ट भाजी आवडत नसते, पण तिच्यातली पौष्टिकता माहित असते अशा वेळेस ही भाजी करण्याची टाळण्यापेक्षा तिला पराठ्याचं स्वरुप दिलं की ती आवडीनं खाल्ली जाते. रात्री केलेल्या भाजीचं सकाळी करायचं काय ते आज जेवणाला वेगळं काय करु असे अनेक महत्त्वाचे प्रश्न पराठे सोडवू शकतात. त्यासाठी काही सोप्या युक्त्या.
Image: Google
पराठे पौष्टिक करण्यासाठी..
1. पराठ्यांचं पीठ मळताना त्यात गाजर/ कोबी/ मुळा किसून टाकावा.
2. भिजवलेल्या उसळी मिक्सरमधे वाटून किंवा त्या थोड्याशा उकडून त्या वाटून पराठ्यांच्या पिठात मिसळून पौष्टिक पराठे करता येतात.
3. पराठ्याचं पीठ मळताना त्यात पालकाची प्युरी, हरभर्याच्या डाळीची प्युरी घातली तर पराठ्यांना छान चव येते तसेच पराठ्यांचे पौष्टिक गुणधर्मही वाढतात.
4. सकाळी केलेली भाजी रात्री किंवा रात्री केलेली भाजी सकाळी उरुन राहाते. शिळी भाजी खाण्याचा कंटाळा येतो आणि ती टाकून देणं हा पर्यायही योग्य वाटत नाही अशा वेळेस उरलेली भाजी मिक्सरमधून काढून बारीक करुन घ्यावी. त्यात मावेल इतकं पीठ घालून ते मळून घ्यावं आणि त्याचे पराठे करावेत. या पध्दतीचे पराठे चविष्ट, खमंग तर होतातच सोबत त्यात भाजीचे गुणधर्म असल्याने ते पौष्टिकही होतात.
5. पराठे पौष्टिक करण्यासाठी त्यात केवळ कणिकच न घालता बाजरी, नागली, ज्वारी, तांदळाचं पीठ, बेसन पीठ ही पिठं मिसळून त्यात घरात असलेली पालेभाजी चिरुन लसूण मिरची पेस्त्ट, गरम मसाला घालून तिखट मिठाचे पराठे करता येतात. सकाळच्या वेळेस हे पराठे दह्यासोबत खाल्ल्यास उत्कृष्ट लागतात.
Image: Google
6. अनेकदा घरच्या घरी पनीर तयार करतो. पनीर करताना त्याचं निघालेलं पाणी आपण सरळ फेकून देतो. तसं न करता हे पाणी फ्रिजमधे ठेवावं. पराठे करताना हे पनीरच्या पाण्यानं पीठ मळावं. अशा प्रकारे पराठ्याचं पीठ मळल्यास या पाण्यातील प्रथिनं, प्रोबायोटिक तत्त्व यांचा फायदा शरीरास होतो. पनीर बाहेरुन जरी आणलं तरी ते काही वेळ पाण्यात भिजून ठेवावं. आणि ते पाणी फ्रिजमधे ठेवून पराठे करताना ते वापरावं.
7. सारणाचे पराठे करताना केवळ बटाटा किंवा पनीर यांचाच वापर न करता सोयाबीन, ब्रोकोली, सातूचं पीठ यांचाही वापर करावा. या घटकांमुळे पराठे चविष्ट होतात आणि पौष्टिकही.
8. पराट्यांचं पीठ मळताना त्यात कोथिंबीर/ पुदिना/ तुळशीची पानं बारीक चिरुन घालावी. किंवा ओवा वाटून घालावा. तीळ थोडी ओबडधोबड वाटून घालावी. या मार्गानेही पराठे पौष्टिक होतात.
9. पराठे करताना डांगराच्या, सूर्यफुलाच्या बियाही वाटून टाकता येतात. हे घटक शरीरास ऊर्जा देतात.