नाश्ता म्हटलं की पोहे, उपमा, इडली, डोसा हे पदार्थ आपण खाल्लेच असतील. इडली, मेदू वडा, डोसा हे साऊथ इंडियन पदार्थ चवीला उत्कृष्ट व आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मात्र, हे पदार्थ बनवण्यासाठी तांदूळ यासह इतर गोष्टींना भिजत ठेवावे लागते. जर आपल्याला झटपट डोसा खायची इच्छा होत असेल, तर रव्यापासून देखील आपण डोसा बनवू शकता.
या रेसिपीसाठी आपल्याला मिश्रण भिजत ठेवावं लागणार नाही. ऐनवेळी झटपट व कमी साहित्यात हा पदार्थ बनतो. मऊ, जाळीदार, कुरकुरीत हा डोसा चवीला स्वादिष्ट लागतो. हा पदार्थ बनवायला सोपा असून, साधारण ५ ते १० मिनिटात बनतो. सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. जर झटपट काहीतरी नाश्ता खाण्याची इच्छा होत असेल तर, हा पदार्थ नक्की ट्राय करा. आपण हा डोसा सांबार, खोबऱ्याची चटणी अथवा बटाट्याच्या भाजीसह खाऊ शकता.
रवा डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य
रवा
तांदळाचं पीठ
मैदा
मीठ
पाणी
बारीक चिरलेली हिरवी मिरची
किसलेलं आलं
बारीक चिरलेला कडीपत्ता
जिरं
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर
तूप अथवा तेल
रवा डोसा बनवण्याची सोपी पद्धत
सवर्प्रथम, एका बाऊलमध्ये पाणी घ्या, त्यात रवा, तांदळाचं पीठ, मैदा, कडीपत्ता, किसलेलं आलं, हिरवी मिरची, मीठ, जिरं, कडीपत्ता व कोथिंबीर घाला. साहित्य घातल्यानंतर संपूर्ण मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून १५ मिनटे भिजत ठेवा.
आता दुसरीकडे गॅसवर नॉन - स्टिक पॅन अथवा तवा गरम करत ठेवा. त्यावर बारीक चिरलेला कांदा पसरवा. वाटीमध्ये रवापासून तयार पीठ घ्या. ते पीठ तव्यावर गोल आकारात पसरवा. त्याला डोश्याचा आकार द्या. पीठ ओतल्यानंतर त्यावर तूप अथवा तेल घाला. दोन्ही बाजूने डोश्याला क्रिस्पी भाजून घ्या. अशा प्रकारे झटपट क्रिस्पी - जाळीदार रवा डोसा खाण्यासाठी रेडी.