उन्हाळा सुरु झाला की, पापड, कुरड्या, फ्रायम्स असे पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ जेवणासोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात, हे पदार्थ काहींना बनवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे आपण बाजारातून विकतचे आणून खातो. परंतु, त्याला हवी तशी होममेड टेस्ट मिळत नाही. घरी बनवलेले पापड, चकल्या, फ्रायम्स तळल्यानंतर चौपटीने फुलतात. मात्र, बाजारातून आणलेल्या पापड्या जास्त फुलत नाही.
साबुदाणा बटाटा चकली हा पदार्थ कमी साहित्यात झटपट बनतो. चवीला ही उत्तम लागतो. उपवासाला काही तरी हटके खायचे असेल तर, आपण हा पदार्थ तळून खाऊ शकता. टिफिन अथवा प्रवासात देखील आपण पदार्थ घेऊन जाऊ शकता. चला तर मग या कुरकुरीत पदार्थाची कृती पाहूयात.
साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी लागणारं साहित्य
साबुदाणा
बटाटे
लाल तिखट
जिरं
मीठ
तेल
कृती
साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम, साबुदाणे भिजत ठेवा. त्यानंतर बटाट्यांना उकड्ण्यासाठी ठेवा. बटाटे उकडून झाल्यानंतर त्याला बाऊलमध्ये स्मॅश करून ठेवा.
एका भांड्यात २ कप पाणी गरम करत ठेवा. गरम पाणी झाल्यानंतर त्यात मीठ घाला. त्यानंतर भिजवलेले साबुदाणा घाला, व मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजवून ढवळत राहा. मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा, व त्यात उकडून किसून घेतलेले बटाटे मिक्स करा.
मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात लाल तिखट, जिरं, चवीनुसार मीठ, घालून मिश्रण मिक्स करा.
आता चकलीचा साचा घ्या, त्याला तेल लावून ग्रीस करा. आता साबुदाण्याचे तयार मिश्रण घालून झाकण बंद करा. आता प्लास्टिक किंवा बटर पेपर घ्या, त्यावर ज्याप्रमाणे चकली बनवतो, त्याचप्रमाणे हे चकली तयार करून घ्या.
हॉटेलस्टाइल कुरकुरीत कांदा भजी करण्याची १ झटपट ट्रिक, भजी होतील खमंग
चकली बनवून झाल्यानंतर उन्हात सुकवण्यासाठी ठेवा. चकलीला निदान २ दिवस तरी उन्हात सुकवण्यासाठी ठेवा. जेणेकरून ते अधिक काळ टिकून राहतील. चकली सुकवून झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. या चकल्या ४ - ५ महिने आरामात टिकतील.
आपण या चकल्या गरम तेलात फ्राय करून खाऊ शकता. या चकल्या कुरकुरीत खमंग लागतात. सायंकाळच्या चहासोबत अथवा छोटी भूक लागल्यावर आपण हा पदार्थ झटपट तळून खाऊ शकता.