रात्री जेवणानंतर थंडंगार खाण्याची इच्छा होते. पण नेहमीचे कुल्फी, आइस्क्रीम, फ्रूट सॅलेड हे खाऊन कंटाळा आला असेल तर फालूदा खा तोही स्पेशल चवीचा. आता असा फालूदा खाण्यासाठी कुठे खायला जावं असा विचार करणार असाल तर जरा थांबा.आणि पुढचं वाचा.. स्पेशल चवीचा फालूदा खाण्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. स्पेशल चवीचा रबडी फालूदा घरच्याघरी सहज तयार करता येतो. चविष्टही होतो आणि खिशालाही परवडतो फक्त त्याची तयारी ऐनवेळी नाही तर आधीच करावी लागते.
Image: Google
कसा करायचा रबडी फालूदा?
रबडी फालूदा करण्यासाठी दूध, दूध पावडर, वेलची पूड, सुकामेवा, केशर आणि चवीनुसार साखर घ्यावी. फालूदा सजवण्यासाठी भिजवलेले चिया सीड्स किंवा सब्जा, रुह अफजा, सुकामेवा आणि टूटी फ्रूटी एवढं साहित्य लागतं.
रबडी फालूदा करताना एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करण्यासाठी ठेवावं. दुधाला आधी उकळी येऊ द्यावी. दूध निम्मं झालं की ते आणखी घट्ट होण्यासाठी त्यात दोन मोठे चमचे दूध पावडर घालून दूध चांगलं हलवून घ्यावं. दूध पावडर चांगली मिसळून घेतली की त्यात साखर आणि वेलची पूड घालून मिश्रण 2-3 मिनिटं उकळू द्यावं. रबडीमध्ये आपल्या आवडीचा सुकामेवा घालून रबडी थंडं होण्यास फ्रिजमध्ये ठेवावी. बारीक शेवया आधी उकळून घ्यावात. उकळलेल्या शेवया निथळून घ्यावा. निथळताना त्यावर बर्फाचे तुकडे घालावे. यामुळे उकळलेल्या शेवयांचा गचका होत नाही.
Image: Google
रबडी फालूदा करण्यासाठी काचेचा एक ग्लास घ्यावा. ग्लासमध्ये थोड्या शेवया घालाव्यात. त्यावर थोडा साखरेचा पाक घालावा. चिया सीड्स किंवा सब्जा घालावा. नंतर रबडी घालून मिश्रण हलवावं. पुन्हा रबडी घालून त्यात थोडा बर्फाचा चुरा घालावा. सर्वात शेवटी वरुन 1-2 चमचे रुह अफजा, सुकामेवा आणि टूटी-फ्रूटीचे तुकडे घालावेत. थंडगार रबडी फालूदा खावा, खिलवावा आणि स्वत:लाच शाबासकी द्यावी!