भक्ती चपळगावकर
हिवाळा सुरू झाला की हमखास गावची आठवण येते, फार थंडी पडली नाही आणि एखादी झुळूक आली तरी तेवढेही पुरेसे असते. हिवाळा हा ऋतु फळं, भाज्या, धान्य या सगळ्या दृष्टीनं संपन्न. खावेसेही वाटते या काळात. कुणी ओळखीच्यांचं शेत असावं, त्यांनी आपल्याला शेतावर बोलवावं. मग हुरडा, बोरं, डाळबाटी, वांग्याचा रस्सा, तीळ लावलेली बाजरीची भाकरी याचा मनापासून आस्वाद घ्यावा. कधी आईला घरी सांगावं सोलाण्याची आमटी कर. मग तिने हरबऱ्याचे सोलाणे, कांदा खोबरं भाजून त्याची आमटी करायची, वरतून लसणाची चरचरीत फोडणी द्यायची आणि वाफाळत्या भातावर ओतून, पातळ कालवून ओरपत खायची. बाजरीची भाकरी हवी पण तिला तीळ लावलेच पाहिजेत. आणि तिकडे करतात तशी वांग्याची भाजी तर घरी होतंच नाही.
मुंबईसारख्या महानगरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्यांची हिवाळ्यात हीच अवस्था होते. पदार्थ वेगळे, स्वाद वेगळे पण सगळ्या खमंग आठवणी. या नॉस्टेल्जियाला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करायला गेली काही वर्ष करतेय. मुंबई स्वयंपाकघर फेसबूक ग्रुपच्या निमित्ताने वर्च्युअली ते शक्य झाले आहे. मुंबई स्वयंपाकघराला मुंबईपुरते सीमित करु नका अशी अनेकांनी सूचना केली. पण हे सुरू करताना मुंबईकर डोळ्यासमोर होते, पण ते मुंबईकर जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे आलेत, पण येताना आठवणीत गावची चव घेऊन आलेत.
आता येत्या २ डिसेंबरला महाराष्ट्र सेवा संघ मुलूंड पश्चिम इथे पहिला सुगी महोत्सव आयोजित केला आहे! हा प्रकल्प महात्वाकांक्षी आहे आणि त्यासाठी सगळ्यात मोठा वाटा महाराष्ट्र सेवा संघाच्या मैत्रेयी या महिला विभागाचा आहे. त्यांनी सगळ्या स्तरांवर या प्रकल्पाला मदत दिली आहे. त्याचबरोबर माझ्या सहकारी स्नेहल बनसोडे शेलुडकर, सई तांबे, अल्पना खंदारे, शुभांगी जोशी यांना मी हक्काने रात्रीबेरात्री मेसेजे करुन बिनधास्त कामे सांगत आहे. संपर्क संस्थेचे मार्गदर्शन आहेच. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांची प्रत्यक्ष भेट होईल ही उत्सुकता आहे.
सुगी महोत्सवात तीन कार्यक्रमांचा समावेश आहे..१. एक तर दिवसभर गावरान स्वादोत्सव होईल. अर्थात गावाकडच्या गोष्टींचे शॉपिंग करता येईल, मसाले, वाळवणं, धान्ये याचबरोबर लाईव्ह स्टॉल्स असतील, तुम्ही इथे मनसोक्त आस्वाद घेऊ शकता, शॉपिंग करु शकता.२. दुसरा कार्यक्रम म्हणजे पाककला स्पर्धा २०२३. यात १८ ते ६५ आणि ६५ पेक्षा जास्त वय असलेले अशा दोन कॅटेगरी आहेत. सर्व विजेत्यांबरोबरच वरिष्ठ नागरिकांना खास बक्षिसे आहेतच पण त्याचबरोबर सर्व स्पर्धकांना आम्ही एक स्वागत भेट देणार आहोत. त्याचबरोबर त्यांना प्रमाणपत्र मिळेल. यापूर्वी आम्ही ऑनलाईन पाककला स्पर्धा घेतली. त्यातील विजेत्यांना आणि या स्पर्धेतील विजेत्यांना याच दिवशी बक्षिसे दिली जातील. ३. तिसरा कार्यक्रम फारच इंटरेस्टिंग असणार आहे. खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक - लेखक चिन्मय दामले आणि साहित्य रसिक आणि लेखिका मेघना भुस्कुटे गेल्या दीड शतकात महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेत झालेल्या बदलांचा, प्रवाहांचा वेध घेणार आहेत आणि त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे. तेव्हा सुगी महोत्वसाला नक्की या!
सुगी महाेत्सव कुठे?3 डिसेंबर २०२३
सकाळी ११ ते रात्री ९महाराष्ट्र सेवा संघ, मुलूंड (पश्चिम)
(लेखिका मुक्त पत्रकार आणि मुंबई स्वयंपाकघर फेसबुक ग्रुपच्या ॲडमिन आहेत.)