Join us  

तांदळाच्या भाकरीचाच खास प्रकार, अक्की रोटी! नाश्त्यासाठी खास पारंपरिक साऊथ इंडियन पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 4:50 PM

अक्की रोटी म्हणजे तांदळाच्या पिठाची, मसालेदार स्वादाची  चविष्ट रोटी. सकाळचा पोटभरीचा हेल्दी नाश्ता !  

ठळक मुद्देअक्की रोटीत फायबर, प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्वंही असतात. कर्नाटक आणि दक्षिण भारतात सकाळच्या न्याहारीला अक्की रोटी करतात.अक्की रोटीसाठीचं पीठ भिजवताना गरम पाणी वापरवं. थंडं पाणी वापरल्यास अकी रोटी थापता येत नाही. 

नाश्त्याला किंवा जेवणात आपल्याचे पध्दतीचे तेच तेच पदार्थ खाऊन उबग येतो. खाण्यापिण्याच्या त्याच त्याच पध्दतीत थोडा बदल हवासा वाटतो. छोटा बदलही खाण्यात मजा आणतो. सकाळच्या नाश्त्याला पोहे, उपमा, इडली, डोसा, थालिपिठं हे नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तोंडाला मस्त चव आणणारी आणि वेटलाॅसला मदत करणारी अक्की रोटी करावी. अक्की रोटीचा झणझणीत नाश्त्यानं होईल दिवसाची तेज तर्रार सुरुवात्.रोटी म्हटलं , की हा जेवणाचा पदार्थ वाटेल. पण खरंतर हा नाश्त्याचा पदार्थ असून कर्नाटक आणि दक्षिण भारतात सकाळच्या न्याहारीला करतात. तांदळाच्या पिठाची ही मसालेदार स्वादाची रोटी म्हणजे चविष्ट, पोटभरीचा आणि हेल्दी नाश्ता होय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा पदार्थ आहे हा. करायलाही एकदम सोपा!

Image: Google

अक्की रोटीचं हेल्दी रहस्य

1. अक्की रोटी खास सकाळी नाश्त्याला खाण्याची विशेष कारणं आहेत जी आरोग्याशी संबंधित आहे.  एका अक्की रोटीत 430 कॅलरीज असतात. 64 ग्रॅम कर्बोदकं,  20 ग्रॅम फॅटस आणि 30 ग्रॅम  फॅटस, 5 ग्रॅम प्रथिनं, 76 ग्रॅम् पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि ब -6 हे जीवनसत्वंही असतं. 

2. तांदळाचं पीठ हे ग्लुटेन फ्री असतं. त्यामुळे ग्लुटेनची ॲलर्जी असलेल्यांना तांदळाच्या पिठाची अक्की रोटी लाभदायक ठरते. 

3. अक्की रोटीत फायबरचं प्रमाण भरपूर असतं. तांदळाच्या पिठातलं फायबरचं प्रमाण कोलेस्टेराॅल, रक्तातील साखर यांच्यावर नियंत्रण ठेवतं. अक्की रोटी पोटभरीची असली तरीही पचनास सुलभ ठरते. 

4. अक्की रोटीत प्रथिनांचं प्रमाण चांगलं असतं. तांदळाचं पीठ जर हातसडीच्या तांदळापासून तयार केलेलं असेल तर त्या पिठापासून तयार केलेल्या  अक्की रोटीत ब जीवनसत्त्वही मोठ्या प्रमाणात असतं.

Image: Google

कशी करायची अक्की रोटी?

अक्की रोटी करण्यासाठी 2 कप तांदळाचं पीठ, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेलं गाजर, गरजेप्रमाणे आलं, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, मीठ आणि आवश्यकतेनुसार तेल घ्यावं. अक्की रोटी करताना एका मोठ्या भांड्यात  तांदळाचं पीठ घ्यावं. त्यात चिरलेला कांदा, गाजर, आलं, हिरवी मिरची. जिरे, कोथिंबीर आणि मीठ घालावं. सर्व् नीट एकत्र करुन घ्यावं. अक्की रोटीचं पीठ भिजवण्यासाठी गरम पाण्याचा उपयोग करावा. गार पाणी वापरल्यास आवश्यक चिकटावा निर्माण होत नाही आणि त्यामुळे रोटी करता येत नाही. 

Image: Google

अक्की रोटी लाटण्यानं न लाटता ती हातानं थापून करावी. यासाठी एका प्लास्टिकच्या कागदावर थोडं तेल लावून आणि हात ओला करुन मिश्रणाचा गोळा घेऊन रोटी थापावी. ती थापेपर्यत तवा गरम करुन घ्यावा. तापलेल्या तव्यावर रोटीला मध्यभागी बोटान्ं छिद्र पाडून ती शेकण्यास तव्यावर टाकावी. थोडा वेळ रोटीवर झाकण ठेवावं. थोडं तेल सोडून रोटी पलटावी. दुसरी बाजू शेकण्यासाठीही त्यावर थोडावेळ झाकण ठेवावं. तेल सोडून रोटी चांगली शेकून घ्यावी. 

अक्की रोटी ही झणझणीत लसूण आणि कोरड्या लाल मिरचीच्या किंवा ओल्या नारळाच्या तिखट चटणीसोबत खावी. 2 अक्की रोटी चटणीसोबत खाल्ल्या तरी पोट भरतं.

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सआहार योजना