स्वयंपाक करताना लिंबाचा रस लागतो. याच लिंबाच्या रसाचा उपयोग करुन स्वयंपाकघरातील स्वच्छतेची कामं करता येतात. भाज्या फळं धुण्यापासून स्वयंपाकघरातली पुसपाशीची फडकी स्वच्छ करण्यापर्यंत लिंबाच्या रसाचा उपयोग करता येतो.
Image : Google
लिंबाच्या रसाचा स्वच्छता प्रयोग
1.भाज्या आणि फळांवर निर्जंतुकांचा वापर केलेला असतो. ती जर नीट धुतली गेली नाहीत तर पोटात जावून आरोग्यास अपाय होतात. भाज्या आणि फळं स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग होतो. यासाठी एक ते दोन लिटर पाणी घ्यावं. ते हलकं गरम करुन त्यात एक चमचा लिंबाचा रस घालावा. तो पाण्यात चांगला मिसळून घ्यावा. या पाण्यात भाज्या फळं 5 मिनिटांसाठी बुडवून् ठेवल्यास ती स्वच्छ होतात.
2. स्वयंपाकघरातील नळावर गंज चढतो, तो काढण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग होतो.यासाठी थोडा चुना आणि लिंबाचा रस घ्यावा. ते दोन्ही एकत्र करुन हा लेप जिथे गंजं लागला आहे तेथे लावावा. 5 मिनिटं तो तसाच ठेवून नंतर त्यावर थोडा लिंबाचा रस घालावा. थोड्या वेळानं ब्रशनं घासून नळ स्वच्छ केल्यास गंजं निघून जातो.
Image: Google
3. सिंकच्या जवळ, पाण्याची भांडी जिथे ठेवतो तिथे चिलटे होतात. हे चिलटे अन्नपदार्थांवर बसून आरोग्यास अपाय करतात. हे चिलटे घालवण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग होतो. यासाठी 2 मग पाणी घ्यावं. त्यात 2 चमचे लिंबाचा रस आणि 1 चमचा बेकिंग सोडा घालून पाणी चांगलं हलवून घ्यावं. हे पाणी स्प्रे बाॅटलमध्ये भरावं. सिंकमध्ये जिथे चिलटे जास्त होतात तिथे हे पाणी फवारावं. स्प्रे मारल्यानंतर 10 मिनिटांनी सिंक पाण्यानं धुवून स्वच्छ केल्यास चिलटे होत नाही.
4. स्वयंपाकघरातील फरशी अस्वच्छ असल्यास माशा होतात. माशा होवू नये आणि फरशी स्वच्छ राहावी यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग होतो. यासाठी एक लिटर कोमट पाणी घ्यावं. पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस आणि थोडं व्हिनेगर घालून या पाण्यानं स्वयंपाकघरातील फरशी पुसल्यास फरशी स्वच्छ होते, माशा होत नाहीत.
Image: Google
5. स्वयंपाकघरात सर्वात जास्त जंतू पसरवणारी गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरातील स्वच्छतेची फडकी. ही फडकी निर्जंतुक करण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग होतो . यासाठी गर्म पाणी घ्यावं. त्यात 2 चमचे लिंबाचा रस घालावा. त्यात स्वयंपाकघरातली स्वच्छतेची फडकी बुडवून 15 मिनिटं ठेवावी. 15 मिनिटानंतर फडकी हातानं घासून स्वच्छ करावी. या उपायानं फडकी निर्जंतुक होतात, त्यावर डाग असल्यास ते निघून जावून फडकी स्वच्छ होतात.