Join us  

अधिक मास स्पेशल : जाळीदार सुंदर अनारसे करण्याची पारंपरिक परफेक्ट कृती, अनारसे होतील सुरेख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 6:56 PM

अधिक मासात वाण द्यायचं म्हणून अनारसे करणार असाल तर परफेक्ट अनारसे करण्याची कृती जवळ हवीच.

ठळक मुद्देनारसे शांततामय वातावरण व निवांत वेळ असेल तरच करावेत.

ऋचा मोडक

अधिकमासात ३०+३ अपूपदान करतात. या वर्षी अधिक श्रावण मास आहे. त्यासाठीच छान जाळीदार खुसखुशीत अनारसे घरीच बनवूया. अधिकात वाण देताता ३३ अनारसे देतात. अनारसे घरी करण्याची एक सुंदर निगुतीची प्रक्रिया असते. आपण पाहूया अनारसे नक्की कसे करायचे.

अनारसे कसे करायचे?१. जाड जुने तांदूळ १ किलो (नवीन व चिकट तांदूळ घेउ नये) ३ दिवस भिजत ठेवावेत. रोज पाणी बदलावे. तिसऱ्या दिवशी तांदूळ धुवून निथळून फडक्यावर पसरून कोरडे करावेत. किंचित दमट असतानाच ते कुटुन मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावेत. उरलेली चाळ परत परत कुटुन चाळून पूर्ण तांदूळ वापरावेत. मिक्सर मधे पीठी करता येते.

(Image : google)

२. १किलो तांदूळ असेल तर १ किलो चांगला मऊ पिवळा गूळ (चिक्कीचा नको) बारीक चिरून घ्यावा.३. २ वाटी पिठास ४ चमचे तूप या प्रमाणात तूप घ्यावे. सगळे एकजीव होइल इतके कुटावे. चांगले मऊ झाल्यावर लाडवासारखे गोळे करुन हवाबंद डब्यात भरुन ५-६ दिवस ठेवून  द्यावे. मग अनारशासाठी पीठ तयार होते. हे पीठ पुष्कळ टिकते.४. अनारसे करताना पीठाचे पेढ्या इतकी गोळी घेउन प्लास्टिक वर तूप लावून खसखस पसरून त्यावर गोळी हलके थापावी. मंद आचेवर तुपात खसखस वरच्या बाजूस ठेवून तळावे. अनारसा उलटू नये. तळताना झाऱ्याने हळूहळू तूप त्यावर सोडून (उडवून) गुलाबी झाले की काढावेत. निथळून ताटात उभे ठेवावेत. नंतर रंग गडद होतो आधीच लाल करु नये.५. खसखस ऐवजी साखर वापरतात. किंवा खसखस -साखर मिक्स वापरतात.

काळजी काय घ्यायची?

१. तांदूळ जुने व जाडे वापरावे, नवीन चिकट तांदूळ नको.२. तांदूळ, गूळ वजनावर घ्यावेत. वाटीच्या प्रमाणात नाहीत.३. तांदूळ वाटले की मैदा चाळणीने चाळावे.४. अनारसे शांततामय वातावरण व निवांत वेळ असेल तरच करावेत. घाईत उरकण्याचा हा प्रकार नाही.( अनारसे करताना फसले तर काय करायचे? वाचा पुढचा भाग)modakruchab@gmail.com

टॅग्स :अन्न