Join us  

अधिक मास स्पेशल: जावई जेवणाचा बेत? करा ३ सोपे मेन्यू; लेक जावई होतील खुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 11:29 AM

Adhik Mas Special Menu Options for Javai Son in Law : झटपट होणारे आणि सगळ्यांना आवडेल असा बेत करण्यासाठी काही सोपे पर्याय

अधिक महिना ३ वर्षांनी एकदा येतो. या निमित्ताने विष्णूची पूजा केली जाते. जावयाला विष्णूच्या रुपात पाहिले जात असल्याने अधिक महिन्यात जावयाचा आणि मुलीचा विशेष मान असतो. यावेळी जावयाला भेटवस्तू, सोनं, चांदी, देवकार्याशी निगडीत वस्तू दिल्या जातात. इतकेच नाही तर बत्तासे, अनारसे, म्हैसूरपाक असा जाळीदार गोड पदार्थही आवर्जून दिले जातात. या काळात जितके दान करु तितके चांगले असे मानले जात असल्याने बहुतांश लोक अन्नदान, वस्तूदान किंवा पैशाच्या रुपाने दान करतात. या दानाचे पुण्य आयुष्यभर आपल्या पाठीशी राहते अशी समजूत असल्याने हे दान केले जाते (Adhik Mas Special Menu Options for Javai Son in Law). 

जावयाचा मान असल्याने जावयाला आणि मुलीला, तिच्या सासरच्या मंडळींना अधिक सणाचा सोहळा म्हणून जेवायला बोलवण्याची रीत फार जुनी आहे. आता घरी पाहुणे जेवायला येणार म्हटल्यावर बेत काय करायचा असा आपल्या सगळ्यांपुढील एक महत्त्वाचा प्रश्न असतो. पावसाळ्याचे दिवस, पचनशक्ती क्षीण झालेली असल्याने आणि आजारपणं वाढलेली असल्याने स्वयंपाक फार विचार करुन करावा लागतो. त्यातही लहान मुलं किंवा वयस्कर मंडळी असतील, झटपट होणारे आणि सगळ्यांना आवडेल असा बेत करण्यासाठी काही सोपे पर्याय आज आपण पाहूयात...

१. पारंपरिक पुरणपोळीचा बेत

पुरणपोळी हा पारंपरिक मराठमोळा पदार्थ. बहुतांश सगळ्यांना पुरणपोळी आवडत असल्याने हा बेत अधिक महिन्यात आणि श्रावणात आवर्जून केला जातो. करायला थोडा किचकट असेल तरी आधीपासून नीट तयारी असेल तर पुरणपोळ्या झटपट होऊ शकतात. यासोबत कटाची आमटी किंवा दूध आणि थोडं तळण, बटाटा किंवा फ्लॉवर अशी साधीशी कोरडी भाजी असेल तरी बाकी काहीच नसले तरी चालते. सोबत वरण भात किंवा आमटी भात, खोबऱ्याची चटणी असा कमीत कमी पदार्थांचा पण नेमका बेत केला तर येणारे सगळेच आवडीने आणि पोटभर जेवतात. 

२. झणझणीत बेत

जावयांना तिखट आवडत असेल तर गोळ्याची आमटी, शेव भाजी किंवा मटकीची थोडी झणझणीत उसळ करु शकतो. यासोबत आवडीनुसार पुऱ्या किंवा पोळ्या केल्या तरी चालतात. सोबत कांदा, पालक, बटाटा यांची भजी आणि पुलाव किंवा मसालेभात केला तरी चालतो. हा बेत असेल तर पानात काकडी किंवा गाजराची कोशिंबीर मात्र आवर्जून हवी. यासोबत गुलाबजाम, जिलेबी असे नेहमीचे आवडणारे गोड पदार्थ ठेवू शकतो. बाहेरुन काही आणायचे नसेल तर तूपातला शिरा, मुगाचा हलवा किंवा दलियाची खीर हे पर्यायही मस्त होतात. 

३. नेहमीपेक्षा थोडा वेगळा बेत

अनेकदा सणावारांचे आणि लग्नाकार्याचे जेवण करुन कंटाळा येतो. अशावेळी नेहमीचा पारंपरीक बेत न ठेवता जावयाला आणि त्याच्या घरच्यांना चालणार असेल तर मेदू वडा आणि बटाटे वडा सांबार, सोबत एखादा भात आणि गोडाचा पदार्थ इतकेच ठेवू शकतो. पावसाळ्याच्या दिवसांत गरमागरम वडे आणि सांबार अतिशय चविष्ट लागते आणि आवडीने पोटभर खाल्लेही जाते. थोडा शॉर्टकट आणि जेवणापेक्षा थोडं वेगळं चालत असेल तर हा पर्याय अतिशय उत्तम असतो. यामुळे लहान मुलेही खूश होतात आणि पोटभर खातात.  

टॅग्स :अन्नअधिक महिना