आपल्याकडे श्रावण म्हटलं की वेध लागतात ते सणासुदीचे. श्रावण महिना हा सणांसाठीचा खास महिना म्हणूनच ओळखला जातो. या महिन्यात येणारे सण व या सणांदरम्यान घरात तयार होणारे गोडधोड पदार्थ म्हणजे खाण्याची चंगळच असते. या अधिक श्रावणमासाला 'धोंड्याचा महिना' असेही म्हणतात. अधिकमासातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो. आपल्याकडील प्रथा, परंपरेनुसार अधिकमासात घरच्या जावयाचा मानपान केला जातो. आपल्या मुलीला सासरच्या वातावरणात प्रेमाने सांभाळून घेणारा जावई, हा मुलीच्या मात्यापित्यांना 'नारायणा' समान भासतो. म्हणून अधिकमासात जावयाचा मान म्हणून त्याला वाण दिले जाते.
या प्रथेनुसार जावयाला घरी बोलवून साग्रसंगीत त्याचा पाहुणचार करुन त्याला मानपान दिला जातो. याबरोबरच जावयाला जेवायला बोलवून त्याला सोन्या - चांदीच्या वस्तू मानपान म्हणून दिल्या जातात. एवढेच नव्हे तर जेवणामध्ये अतिशय रुचकर व पुरणा - वरणाचा स्वयंपाक केला जातो. जावयाचे लाड म्हणून त्याला गोड पदार्थ खायला दिले जातात. या गोड पदार्थांमध्ये मुख्यत्वेकरून अनारसे, म्हैसूर पाक, बत्तासे, पुरणाचे धोंडे असे पदार्थ तयार केले जातात. यासाठीच आपल्या घरी येणाऱ्या जावयाचे लाड पुरवण्यासाठी पारंपरिक नारळाच्या पुरणाचे धोंडे घरच्या घरी कसे बनवावेत याची सोपी कृती पाहूयात(Adhikmas Special Crispy Purnache Dhonde)
साहित्य :-
१. चणा डाळ - अर्धा कप
२. पाणी - १ कप
३. हळद - चिमुटभर
४. साजूक तूप - १ टेबलस्पून
५. गूळ - अर्धा कप (बारीक चिरून घेतलेला)
६. काजू व बदामाचे काप - अर्धा कप
७. ओल्या नारळाचा किस - अर्धा कप
८. वेलदोडा - ४ ते ५ (बारीक पूड करुन घेतलेले)
९. मीठ - चवीनुसार
१०. गव्हाचे पीठ - १ कप
११. तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून
१२. दूध - गरजेनुसार
१३. तेल - तळण्यासाठी
अधिक मास स्पेशल : जाळीदार सुंदर अनारसे करण्याची पारंपरिक परफेक्ट कृती, अनारसे होतील सुरेख!
कृती :-
१. सर्वप्रथम एका भांड्यात चणा डाळ घेऊन ती ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावी.
२. धुवून घेतलेली ही डाळ कुकरमध्ये शिजण्यासाठी लावून घ्यावी. कुकरमध्ये डाळ, पाणी, किंचित हळद, साजूक तूप घालून ४ ते ५ शिट्ट्या काढून ही डाळ शिजवून घ्यावी.
३. डाळ शिजवून घेतल्यानंतर ती एका चाळणीत काढून त्यातील पाणी निथळून जाईपर्यंत तशीच पसरवून ठेवावी.
४. डाळ संपूर्णपणे सुकल्यानंतर एका कढईत शिजवून घेतलेली डाळ, किसलेले ओले खोबरे, बारीक करून घातलेला गूळ, काजू व बदामाचे काप, वेलदोडा पूड घालून पुरण व्यवस्थित शिजवून घ्यावे.
५. आता पाऱ्यांसाठी एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, तांदुळाचे पीठ, तेल, चवीनुसार मीठ, साजूक तूप घालावेत त्यानंतर हळूहळू दूध घालून हे पीठ भिजवून घ्यावे. आता या पिठाची एकदम घट्टसर अशी कणिक मळून घ्यावी.
६. ही कणिक मळून झाल्यानंतर १५ ते २० मिनिटे व्यवस्थित झाकून ठेवावी.
७. २० मिनिटांनंतर या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. या लहान गोळ्यांच्या पुरी एवढ्या पाऱ्या लाटून घ्याव्यात.
८. पाऱ्या लाटून घेतल्यानंतर त्यात पुरणाचा एक गोळा भरुन घ्यावा. व हातांनी दाब देत मोदकासारखा गोल आकार करत या धोंड्याचे तोंड बंद करून घ्यावे.
९. आता हे तयार धोंडे आपण मोदकासारखे वाफवून पण घेऊ शकतो किंवा तेलात तळू देखील शकतो. धोंडे हे वाफवून किंवा तळून अशा दोन्ही पद्धतीने केले तरी तितकेच चवीला छान लागतात.
पारंपरिक बंगाली मिष्टी दोई आता करा घरी चटकन, गोड खाऊनही वजन वाढायची भीती नाही...
अस्सल गावरान झणझणीत चवीचं मेथी पिठलं खाऊन तर पाहा, पावसाळ्यातला झक्कास बेत!
धोंडे वाफवण्यासाठी :-
१. धोंडे वाफवून करायचे असल्यास एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यावर चाळण ठेवून त्यात हे धोंडे ठेवून द्यावेत व वरून झाकण ठेवून झाकून घ्यावेत.
२. त्यानंतर हे धोंडे संपूर्णपणे वाफेवर शिजेपर्यंत १५ ते २० मिनिटे शिजवून घ्यावे.
धोंडे तळण्यासाठी :-
१. तयार धोंडे वाफवून करायचे नसतील तर आपण तेलात किंवा साजूक तुपात देखील तळून करु शकतो.
२. एका कढईमध्ये तेल किंवा आपल्या आवडीनुसार साजूक तूप घ्यावे.
३. त्यानंतर हे तयार धोंडे तेलात दोन्ही बाजुंनी खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
अधिकमास स्पेशल नारळाच्या पुरणाचे खुसखुशीत धोंडे खाण्यासाठी तयार आहेत.