पोहे हा जगभरात अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. झटपट होणारे, पोटभरीचे आणि सगळ्यांच्या आवडीचे हे पोहे. मात्र हे पोहे पहिल्या वाफेचेच छान लागतात. गार झाले की त्यातली मजा जाते. कधी आपल्याला कामानिमित्त किंवा फिरायला जाण्यासाठी प्रवास करावा लागतो. कधी घराचं शिफ्टींग असतं तर कधी काही महिन्यांसाठी दुसऱ्या राज्यात, देशात जावे लागणार असते. अशावेळी आपण सोबत खाण्या-पिण्याच्या गोष्टी आवर्जून ठेवतो. यामध्ये कोरडा खाऊ तर असतोच. पण पोटभरीचा आणि झटपट होणारा असा काही खाऊ सोबत असेल तर आपल्याला पोट भरण्याची चिंता राहत नाही (How To Make Instant Pohe Premix).
अनेकदा आपण जातो त्याठिकाणी घरच्यासारखे, घरच्या चवीचे काही मिळतेच असेही नाही. अशावेळी आपल्याकडे झटपट होणारे रेडी टू कूक काही असेल तर आणखी काय हवं. हल्ली बाजारात बऱ्याच कंपन्यांचे रेडी टू कूक पोहे, उपमा, शेवयांचा उपमा, मूगाच्या डाळीची खिचडी असे काही ना काही मिळते. मात्र त्यामध्ये प्रिझर्व्हेटीव्ह घातलेले असण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर हे पदार्थ आपल्याला हव्या त्या चवीचे असतातच असेही नाही. अशावेळी आपण घरीच प्रिमिक्स तयार केले तर? घरच्या घरी अगदी झटपट आणि चविष्ट होणारे हे पोहे प्रिमिक्स कसे तयार करायचे पाहूया.
१. कढईत ४ चमचे तेल घालायचे, त्यात मोहरी, जीरं, मिरच्या, कडीपत्ता घालायचे.
२. यात शेंगादाणे घालून हे सगळे तेलात चांगले खमंग परतून घ्यायचे.
३. यात हिंग आणि हळद घालून वरुन कच्चे जाडे पोहे घालायचे.
४. त्यावर मीठ आणि साखर घालून ३ ते ४ मिनीटे चांगले परतून घ्यायचे.
५. थोडे थंड झाल्यावर हे मिश्रण एका हवाबंद डब्यात भरुन ठेवायचे. हे मिश्रण साधारणपणे २० दिवस टिकते.
६. ज्यावेळी पोहे खायचे असतील तेव्हा अर्धी वाटी पोहे असतील तर पाव वाटी गरम पाणी घालायचे.
७. चांगले एकजीव हलवून अगदी आपण घरात खातो त्याप्रमाणे गरमागरम पोहे खाता येतात.