Join us  

अक्षय्य तृतीया : आमरस करताना करा फक्त 4 गोष्टी, आंबा बाधणारच नाही! रस खा पोटभर हवा तेवढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2022 12:16 PM

आमरस खा, पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात, नाहीतर बिघडेल तब्येत...

ठळक मुद्देआंब्याच्या कोयी आणि सालींचा रस काढण्यासाठी त्या दुधातून काढायला हव्यात. आंबा उष्ण असल्याने तो बाधण्याची शक्यता असते, पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.

उन्हाळा आला की आपण सगळेच आतुरतेने वाट पाहतो ती आंब्याची. वर्षातून एकदाच येणारा फळांचा राजा म्हणजे आपल्यापैकी अनेकांचा जीव की प्राण. अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून या दिवशी घरोघरी आवर्जून आमरस पुरीचा बेत केला जातो. महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ असलेल्या आमरसाची चवच न्यारी. आंब्यामध्ये हापूस, पायरी, केसर, गावठी आंबा असे अनेक प्रकार असल्याने महाराष्ट्राच्या विविध भागांत वेगवेगळ्या पद्धतीने आमरस केला जातो. अनेकदा आपल्याला आमरस आवडतो म्हणून आपण जास्त खातो आणि त्याचा शरीराला त्रास होतो. आंबा उष्ण असल्याने अनेकांना उष्णताही होते. आमरस करताना काही चुका झाल्यासही तो बाधण्याची शक्यता असते. पाहूयात आमरस करताना कोणती काळजी घेतल्यास त्याचा तब्येतीला त्रास होत नाही...

(Image : Google)

१. मीरपूड आणि तूप 

आमरसात मीरपूड आणि तूप घालून खाण्याची पद्धत आहे. या दोन्ही पदार्थांमुळे आंबा जास्त प्रमाणात खाल्ला तरी बाधत नाही. आंबा हा उष्ण असतो पण तूप आणि मीरपूड यामुळे तो पचायला हलका होतो. म्हणून आमरसात तूप घालून खाल्ले जाते, ज्यामुळे तो सहज पचतो. 

२. आंबा पाण्यात भिजवून ठेवावा

आंब्यात जास्त प्रमाणात उष्णता असते. त्यामुळे आमरस करण्याच्या किमान २ तास आधी आंबे मोठ्या पाटीत घेऊन पाण्यात भिजवून ठेवायला हवेत. यामुळे आंब्यातील उष्णता कमी होते आणि आंबा थोडा जास्त खाल्ला गेला तरी बाधत नाही. 

३. चीक पोटात जाऊ देऊ नये

आंब्याला अनेकदा चीक असतो, हा चीक तोंडात गेल्यास तोंड येणे, जर उठणे असे होऊ शकते. इतकेच नाही तर चीक पोटात गेल्यास जुलाबही होण्याची शक्यता असते. त्यामुळे रस करण्याआधी आंबे स्वच्छ धुवून घ्यायला हवेत. सालांचा आणि आंब्याच्या देठाचा चीक निघाला नाही तर त्रास होतो. म्हणून आमरस करताना आंबे स्वच्छ धुवून घेतलेले केव्हाही चांगले.

(Image : Google)

४. आंब्याची कोय आणि साली दुधात धुवाव्यात 

अनेकदा आमरस काढताना आंब्याच्या कोयीला आणि सालांना बराच गर राहतो. हा गर काढण्यासाठी काही जण पाण्याचा वापर करतात. पण आंबा आणि पाणी हे विरुद्ध कॉम्बिनेशन असते, त्यामुळे रसात पाणी एकत्र झाल्यास तो बाधण्याची शक्यता असते. मात्र आंब्याच्या कोयी आणि सालींचा रस काढण्यासाठी त्या दुधातून काढायला हव्यात.  

टॅग्स :अन्नआंबाअक्षय तृतीयाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.