थंडी म्हटली की आवर्जून डिंकाचे, सुकामेव्याचे आणि अळीवाचे लाडू केले जातात. थंडीत शरीराला उष्णता देणारे लाडू आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. पारंपरिक सूपर फूड म्हणून ओळखले जाणारे हे लाडू आवर्जून खायला हवेत. अळीवात मोठ्या प्रमाणात लोह, फॉलेट, व्हीटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन इ, फायबर, प्रोटीन हे घटक असतात. त्यामुळे लहान मुले आणि विशेषत: महिलांच्या आरोग्यासाठी हे लाडू अतिशय पौष्टीक मानले जातात. अळीवामुळे पोट साफ होण्यास मदत होते. इतकेच नाही तर पाळीच्या तक्रारी, मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी अळीव अतिशय फायदेशीर मानले जातात. त्वचा आणि केस चांगले राहावेत आणि वजन नियंत्रणात राहावे यासाठीही हे लाडू आवर्जून खाल्ले जातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच पौष्टीक असणारे हे लाडू कधी कच्चट होतात तर कधी खूपच गिळगिळीत होतात. कमीत कमी पदार्थात आणि करायला सोपे वाटणारे हे लाडू बिघडले तर कोणीच त्याला हात लावत नाही. त्यामुळे हे लाडू चुकू नयेत यासाठी आपण त्याची आज सोपी रेसिपी पाहणार आहोत (Aliv Laddu Recipe for Winter).
साहित्य -
१. अळीव - अर्धी वाटी
२. गूळ - १.५ वाटी
३. ओलं खोबरं - २ ते ३ वाट्या
४. तूप - १ चमचा
कृती -
१. रात्रभर अळीव नारळाच्या पाण्यात भिजत घाला. नारळाचे पाणी नसेल तर साध्या पाण्यात भिजत घातले तरी चालते. सकाळी हे अळीव जवळपास तिपटीने फुगतात.
२. कढईमध्ये तूप घालून त्यात अळीव आणि खोबरं घालायचं. हे दोन्ही चांगले एकजीव होऊ द्यायचे.
३. मग यामध्ये गूळ घालून हे मिश्रण सतत हलवत राहायचे. कढईला चिकटू नये म्हणून गॅस बारीक करुन हे मिश्रण हलवायचे.
४. साधारणपणे १५ ते २० मिनीटे एकजीव झाले की गॅस बंद करुन कढई खाली उतरवून ठेवायची.
५. थोडे गार झाले की याचे एकसारखे लाडू वळायचे. आवडीनुसार यामध्ये बदाम किंवा काजूचे काप घालू शकतो.