Join us  

अळीवाचे लाडू, पारंपरिक लाडू जेव्हा सुपरफूड बनतात, 5 परफेक्ट फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 3:15 PM

अळीवाच्या लाडूंचे भन्नाट फायदे सांगत आहारतज्ज्ञ हे लाडू नियमित खाण्याचा सल्ला देतात....

ठळक मुद्देसर्वच वयोगटातील महिलांसाठी सूपरफूड असणारे अळीव आवर्जून खायला हवेतअळीवाचे आरोग्याच्यादृष्टीने अनेक फायदे... तुम्हीही खा अळीवाचे लाडू आणि घरच्यांनाही खाऊ घाला

अळीव किंवा अहळीव या पारंपरिक पदार्थाबाबत आपण अनेकदा ऐकतो. यापासून केले जाणारे लाडू, खीर गर्भवती स्त्रियांना आवर्जून दिली जाते. मात्र इतर महिलांसाठीही आरोग्याच्यादृष्टीने अळीव अतिशय चांगले असतात. अळीवात मोठ्या प्रमाणात लोह, फॉलेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन इ, फायबर आणि प्रोटीनसह अनेक पोषक घटक असतात. अळीवामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, महिलांमध्ये अनेकदा लोह, हिमोग्लोबिन या गोष्टींची कमतरता असल्याने अॅनिमियासारख्या किंवा इतर समस्या उद्भवतात. अशावेळी महिलांनी चमचाभर अळीवाचा नियमित आहारात समावेश केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. सध्या विविध कारणांमुळे अनेकांना पोटाशी किंवा पचनाशी निगडीत समस्या उद्भवतात. अशावेळी अळीवातील फायबर्समुळे बद्धकोष्ठता, अपचन यांसारखे त्रास दूर होण्यास मदत होते. ज्यांना सतत अॅसिडीटी, ब्लोटींग यांसारखे त्रास होतात त्यांच्यासाठीही अळीव एक चांगला घटक ठरतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांनी अळीवाबाबत नुकतीच एक पोस्ट आपल्या सोशल  मीडिया अकाऊंटवर केली आहे. त्यामध्ये अळीव कोणी, कसे खावे याबाबत त्या आपल्या फॉलोअर्सना सांगतात...करायला अतिशय सोपी असलेली अळीवाची खूर किंवा लाडू सगळ्यांनी आवर्जून खायला हवेत...

१. अळीव हे सौंदर्याचे सिक्रेट आहे असे म्हणता येईल. याचे मुख्य कारण म्हणजे अळीवात असणारे बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन केसांच्या वाढीसाठी अतिशय चांगले असते. ज्यांना केसांशी निगडीत समस्या आहेत अशांनी नियमित अळीव खायला हवेत. अळीवाच्या सेवनाने केस चमकदार होतात आणि तुटत नाहीत. अळीवामध्ये व्हिटॅमिन इ मोठ्या प्रमाणात असल्याने ज्यांना कोंड्याची समस्या आहे त्यांनी आहारात अळीवाचा जरुर समावेश करावा. तसेच अळीवामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येतात पण तुम्ही नियमित अळीव खात असाल तर चेहऱ्यावरील सुरकुत्यांपासून तुम्ही काही प्रमाणात दूर राहू शकता. 

२. तारुण्यात पदार्पण कऱणाऱ्या मुलींना आणि मुलांनाही हे लाडू आवर्जून खायला द्यायला हवेत. त्यामुळे त्यांच्यात लोहाची आणि हिमोग्लोबिनचीही कमतरता उद्भवत नाही. तारुण्यात मुलींना मासिक पाळी येणे, हार्मोन्समध्ये होणारे बदल, त्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या पुटकुळ्या यांसारखे अनेक शारीरिक, मानसिक बदल होत असतात. अशांसाठी हे लाडू सूपरफूड असल्याचे ऋजूता दिवेकर आवर्जून सांगतात. या लाडूमध्ये असणारे ओले नारळ, गूळ यांमुळे त्याची पौष्टीकता वाढण्यास मदत होते. 

३. टीन एजर असणाऱ्या कोणाचे ब्रेक अप झाले असतील तर त्यांनी आवर्जून हे लाडू खायला हवेत कारण त्यामुळे त्यांना ब्रेक आऊटची समस्या उद्भवणार नाही असे ऋजूता गमतीने सांगतात. म्हणजेच अळीवातील फओलेटमुळे तुम्ही वेगवेगळ्या रोगांपासून दूर राहण्यास मदत होईल. तसेच या लाडूतील घटक मेंदूसाठी आणि विविध हार्मोन्ससाठी चांगले असल्याने मानसिकरित्याही अळीव खाणे चांगले. 

४. गर्भधारणेसाठी विचार करणाऱ्या जोडप्यांनी अळीवाचे लाडू आवर्जून खायला हवेत. गर्भधारणा राहण्यासाठी तसेच गर्भधारणा राहिल्यांतरही गर्भाच्या वाढीसाठी या लाडूंचा आहारातील समावेश अतिशय उपयुक्त ठरतो. गर्भधारणा होण्याच्या आधी आणि गर्भधारणेच्या काळात स्त्रीचे उत्तमरितीने पोषण होणे आवश्यक असते. त्यामुळे या काळात आहारात अळीवाचा आवर्जून समावेश करायला हवा.

५. मेनोपॉजच्या काळात स्त्रियांमध्ये अनेक मानसिक आणि शारीरिक बदल होत असतात. त्या काळात हे लाडू खाल्ल्यास त्यातील सल्फोराफेनमुळे बरेच फायदे होतात. त्वचेवरील पिगमेंटेशनची समस्या दूर होण्यासाठी या काळात अळीव महत्त्वाची भूमिका निभावतात. तसेच मेनोपॉजशी निगडीत इतरही समस्या दूर होण्यास यामुळे मदत होते.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्सस्त्रियांचे आरोग्य