Join us  

इडली - डोसा - आप्पे, पदार्थ ३ - पीठ १! असे मल्टिपर्पज परफेक्ट पीठ कसे बनवायचे, पाहा कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2023 11:19 AM

All Purpose Batter For Idli, Dosa & Appe : एकाच बॅटर पासून डोसा, इडली, आप्पे तयार करण्यासाठी हे बॅटर कसे बनवायचे ते समजून घेऊयात.

आपल्यापैकी बऱ्याचश्या घरात नाश्त्याला सकाळी डोसा, इडली, आप्पे, मेदू वडा असे साऊथ इंडियन पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ घरातील सगळेच खूप आवडीने खातात. जर आपल्याला नाश्त्याला सकाळी डोसा, इडली, आप्पे, मेदू वडा असे काही पदार्थ बनवायचे असतील तर आपण किमान १ दिवस आधी तांदूळ उडीद डाळ भिजत घालून त्याच पीठ काढून आंबवण्यासाठी ठेवून देतो. ही आंबवण्याची प्रक्रिया व्यवस्थित झाली तर इडली, डोसा, आप्पे खूप छान चविष्टय आणि मऊ होतात. डोसा, इडली, आप्पे, मेदू वडा असे साऊथ इंडियन पदार्थ बनवताना त्याच पीठ तयार करण्यासाठी आपण गरजेनुसार उडीद डाळ, तांदूळ, इतर डाळी भिजवण्यास ठेवतो परंतु जर एकाच प्रकारचे पीठ तयार करून जर आपल्याला डोसा, इडली, आप्पे बनवता आले तर खूप सोपं होईल व आपला त्रास वाचेल. घरच्या घरी एकच पीठ तयार करून त्याच पिठापासून आपण डोसा, इडली, आप्पे बनवू शकतो. आता तीन वेगळे पदार्थ बनवण्यासाठी तीन प्रकारची वेगळी पीठ तयार करण्याची गरज भासणार नाही. एकाच बॅटर पासून डोसा, इडली, आप्पे तयार करण्यासाठी हे बॅटर कसे बनवायचे ते समजून घेऊयात(All Purpose Batter For Idli, Dosa & Appe).

साहित्य - 

१. इडली बनवण्यासाठी लागणारा तांदूळ - ३ कप २. उडीद डाळ - १ कप ३. पातळ पोहे - १/२ कप ४. मेथीचे दाणे - १ टेबलस्पून (पर्यायी)     

myadaptedkitchen या इंस्टाग्राम पेजवरून एकाच बॅटर पासून डोसा, इडली, आप्पे तयार करण्यासाठी हे बॅटर कसे बनवायचे याचे साहित्य व कृती शेअर करण्यात आली आहे. 

 

कृती - 

१. एका बाऊलमध्ये इडली बनवण्यासाठी लागणारा तांदूळ घेऊन तो पाण्यात धुवून मग पाण्यात भिजवून घ्या. २. एका बाऊलमध्ये उडीद डाळ घेऊन ती डाळ व्यवस्थित धुवून मग स्वच्छ पाण्यात भिजवून घ्या.  ३. ज्या बाऊलमध्ये उडीद डाळ भिजविली आहे त्याच बाऊलमध्ये पातळ पोहे आणि मेथीचे दाणे घालून ते पण उडीद डाळीसोबत भिजत ठेवा. ४. आता या दोन्ही बाऊलवर झाकण ठेवून पुढील किमान ६ तास तसेच पाण्यात भिजवत ठेवा. ५. ६ तासानंतर इडली बनवण्यासाठी लागणाऱ्या तांदळातील पाणी काढून ते मिक्सरमध्ये रवाळ वाटून घ्या. ६. त्यानंतर उडीद डाळ, पोहे आणि मेथीचे दाणे यांचे मिश्रण देखील मिक्सरमध्ये वाटून घ्या. ७. आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेली ही दोन्ही पीठ एका भांड्यात एकत्रित करून मिक्स करून घ्या. ८. आता ही दोन्ही एकत्रित केलेली पीठ पुढील ८ तास आंबविण्याच्या प्रक्रियेसाठी अशीच ठेवून द्यावीत. ९. ८ तासानंतर जेव्हा आपण डोसा, इडली, आप्पे बनवायला घेऊ तेव्हा त्या पिठात चवीनुसार मीठ घालून ढवळून घ्या.     

एकाच प्रकारचे पीठ तयार करून आपण त्यापासून झटपट डोसा, इडली, आप्पे असे ३ पदार्थ तयार करू शकतो.

टॅग्स :अन्न