पावसाळी आणि गार हवा पडली की आपल्याला सतत काहीतरी गरमागरम प्यावसं वाटतं. हवेतील तापमानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असताना शरीराला गरम करण्यासाठी आपण गरम पेय पितो. यामध्ये प्रामुख्याने चहा किंवा कॉफीचा समावेश असतो. भारतात चहा आणि कॉफी घेण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. यामुळे साखर तर पोटात जातेच पण या पेयांमधून म्हणावे तितके शरीलाला काही मिळत नाही. आळस जाऊन एनर्जी मिळण्यासाठी किंवा थंडी कमी होऊन ऊब मिळण्यासाठी चहा-कॉफी घेतली जाते. मात्र त्यामुळे आपली भूक मरते, पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतात. डायबिटीस आणि लठ्ठपणा या सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या समस्या आहेत. गार हवेत गरम तर काहीतरी प्यायचंय, पण चहा-कॉफी नकोय असं असेल तर त्यासाठी गरमागरम झटपट करता येतील असे पर्याय पाहूया (Alternate hot drinks to tea and Coffee)...
१. हर्बल टी
हर्बल टी आरोग्यासाठी केव्हाही चांगला. यासाठी आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही. घरात असणारं आलं, तुळशीची ४ पाने, लवंग, गवती चहा, आवडत असेल तर वेलची आणि अर्धा चमचा चहा पावडर, चवीपुरती अर्धा चमचा साखर. या गोष्टी पाण्यात चांगल्या उकळून ते गाळून चहासारखे प्यावे. यामुळे चहा प्यायल्यासारखे तर वाटतेच पण यातील मसाल्याच्या पदार्थांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आणि गरमागरम प्यायल्याने पावसाळी हवेत घसा खवखवत असेल तर घशालाही बरे वाटते.
२. हळद दूध
दुधाला आपल्याकडे पूर्णान्न म्हटले जाते. दुधामधून शरीराला प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम असे अनेक घटक मिळतात. पावसाळ्याच्या दिवसांत हवा गार असते. अशावेळी घशातून वेगवेगळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. दूधामध्ये हळद घालून प्यायल्यास त्याचा चांगला फायदा होतो. यामध्ये थोडासा गूळ, केशर आवडत असेल तर ड्रायफ्रूट पावडर आणि वेलची पावडरही घालू शकतो.
३. सूप
गरम काहीतरी प्यावेसे वाटल्यावर चहा किंवा कॉफी करायला सोपे असल्याने आपण त्यांनाच प्राधान्य देतो. पण वेगवेगळ्या भाज्यांचे सूप प्यायल्यास शरीराला एनर्जी तर मिळतेच आणि पोषणही मिळते. या सूपात आलं, लसूण घातल्यास त्याची चव वाढते आणि इन्फेक्शन्सपासून आपला बचाव होतो. पालक, कोथिंबीर, मशरुम, कॉर्न, मिक्स व्हेज अशा कोणत्याही प्रकारच्या भाज्या शिजवून त्यामध्ये मीठ आणि आवडीनुसार मिरपूड, मिक्स्ड हर्ब्स घातल्यास ते चविष्ट लागते.
४. सार
सार हा साधारण दक्षिणेकडे केला जाणारा पदार्थ. पण चिंचेचे, आमसुलाचे, टोमॅटोचे किंवा अगदी डाळी किंवा कडधान्यांच्या पाण्याचेही आपण सार करु शकतो. जीरे आणि लसणाची फोडणी देऊन तिखट, मीठ घातल्यास हे सार पिण्यास अतिशय चविष्ट लागतात. इतकेच नाही तर यामुळे तोंडाला चव येण्यास मदत होते आणि घशात इन्फेक्शन असेल तर गरमागरम सार प्यायल्याने घसा मोकळा होतो.