आपल्यापैकी बऱ्याच घरांमध्ये अॅल्युमिनियम फॉइल व बटर पेपरचा वापर रोजच्या वापरात केला जातो. डब्यांमध्ये चपाती गरम राहावी किंवा तिचा मऊपणा व स्वाद टिकून राहावा यासाठी आपण अॅल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपरचा वापर करतो. त्याचप्रमाणे काहीवेळा इतर पदार्थांचे पॅकिंग करण्यासाठी आपण बऱ्याचदा अॅल्युमिनियम फॉइल व बटर पेपरचा वापर करतो. काहीवेळा आपण हॉटेल्समधून पार्सल अन्नपदार्थ विकत घेताना आपल्याला हे अन्नपदार्थ अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून दिले जातात.
जेव्हा खाद्यपदार्थ पॅक करण्याचा प्रश्न येतो तेव्हा अॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. टिफिन पॅक करणे असो किंवा काही खाद्यपदार्थ साठवणे असो, अनेकजण अॅल्युमिनियम फॉइलचाच वापर करता. काही लोक अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी किंवा उरलेले जास्तीचे अन्न ठेवण्यासाठी बटर पेपर देखील वापरतात. असे मानले जाते की यामध्ये अन्न पॅक केल्याने ते दिर्घकाळ ताजे राहते. आपल्यापैकी बरेचजण रोजचा डबा नेताना काही अन्नपदार्थ हे अॅल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपरमध्ये पॅक करुन नेतात. परंतु अन्नपदार्थ पॅकिंगसाठी अॅल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपर वापरणे खरंच योग्य आहे का ? अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी अॅल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपर वापरणे कितपत योग्य आहे की नाही याचा अभ्यास इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स (International Journal of Electrochemical Science) यांनी केला आहे. अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी नेमका कोणता पर्याय उत्तम आहे ? हे समजून घेऊयात(Is It Safe To Use Aluminum Foil Or Butter Paper For Packing Food).
अॅल्युमिनियम फॉइलचा वापर ...
बहुतेक घरांमध्ये पदार्थांचे पॅकिंग करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. परंतु अॅल्युमिनियम फॉइलचा जास्त वापर केल्याने अन्नाचा pH बदलू शकतो आणि आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स (International Journal of Electrochemical Science) यांनी केलेल्या अभ्यासानुसार एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, जेव्हा आपण स्वयंपाक किंवा पॅकिंगसाठी अॅल्युमिनियम फॉइल वापरतो तेव्हा काही अॅल्युमिनियमचे कण खाद्यपदार्थमध्ये जातात. विशेषतः जेव्हा आपण खूप गरम खाद्यपदार्थ पॅक करतो किंवा त्यात व्हिटॅमिन सी समृद्ध खाद्यपदार्थ गुंडाळतो. गरम खाद्यपदार्थ किंवा व्हिटॅमिन सी समृद्ध खाद्यपदार्थ आणि अॅल्युमिनियमची रीअॅक्शन होऊ शकते आणि ऑक्सिडाइज होऊ शकतात. अशा परिस्थितीत जे लोक रोज फॉइल वापरतात त्यांच्या शरीरात अॅल्युमिनियम तत्वाचे प्रमाण वाढते आणि यामुळे मज्जासंस्था, मेंदू आणि हाडांचे आजार होऊ शकतात.
माठातले पाणी लवकर भरपूर आणि जास्त वेळ गार होण्यासाठी १ सोपी ट्रिक, प्या पाणी गारेगार...
बटर पेपरचा वापर...
बटर पेपर, ज्याला रॅपिंग पेपर किंवा सँडविच पेपर देखील म्हटले जाते. बटर पेपरचा वापर अन्नपदार्थ पॅकिंगसाठी करणे हा अॅल्युमिनियम फॉइल वापरण्यापेक्षा अधिक चांगला पर्याय आहे. सर्वसाधारणपणे बटर पेपर हा नॉन-स्टिक पृष्ठभागाचा सेल्युलोजपासून बनलेला कागद आहे. साधारणतः बटर पेपर हॉटेल आणि मिठाईच्या दुकानांमध्ये विविध प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांची साठवण आणि पॅकेजिंगसाठी करण्यासाठी वापरले जाते. बटर पेपरच्या वापरामुळे पदार्थांमधील ओलावा टिकून राहतो, जास्तीचे तेल शोषले जाते आणि ते आरोग्यासाठी चांगले असते. म्हणूनच, जर आपल्याला खूप मसालेदार, खारट आणि व्हिटॅमिन सी युक्त अन्नपदार्थ पॅक करायचे असतील तर त्यासाठी बटर पेपरचा वापर अवश्य करावा. तसेच, बटर पेपर अॅल्युमिनियम फॉइलपेक्षा जास्त तापमान सहन करू शकतो त्यामुळे आपण गरम अन्नपदार्थदेखील बटर पेपरमध्ये रॅप करुन ठेवू शकता.
अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी नेमका कोणता पर्याय उत्तम आहे ?
खरंतर, अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक ठरु शकते. यामुळे अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी अॅल्युमिनियम फॉइल पेक्षा बटर पेपरचा वापर करणे हे केव्हाही उत्तम ठरेल. बटर पेपरचा वापर अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी केला जाऊ शकतो, परंतु अन्नपदार्थ पॅकिंगसाठी काचेचे बॉक्स आणि लंच बॉक्स वापरणे हा त्याहूनही चांगला पर्याय आहे असे मानले जाते. याशिवाय, आपण सिलिकॉन कंटेनरचा वापर करु शकता, सिलिकॉन कंटेनरमध्ये अन्नपदार्थ दिर्घकाळ ताजे ठेवले जातात. पण जेव्हा जास्तीचे उरलेले अन्न सुरक्षितपणे पॅक करून ठेवायचे असते तेव्हा फॅब्रिक कव्हर्स (किंवा स्वच्छ सुती कापडाचा वापर करावा) हा एक उत्तम पर्याय असतो.