प्रतिभा जामदार
कोणताही सण म्हटलं की गोडधोड आलंच. त्यात विशेषकरून श्रीखंड पुरीला अनन्यसाधारण महत्व. त्यातही श्रीखंड हल्ली बाजारात मिळतं म्हणून विकत आणलं जातं. मात्र घरी करता येईल अशा एका वेगळ्या, उत्तम चवीच्या मस्त श्रीखंडाची ही रेसिपी. अस्सल फणसाच्या चवीचं आणि अफलातून फणसाच्या गंधाचं हे "फणसखंड ".
फणस आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. फणसामध्ये व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन सी , आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम असते जे शरीरासाठी आवश्यक असते. फणस वजन कमी करण्यास मदत करतो तसेच फणसाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि डोळ्यांचे विकारही कमी होतात.
फणसाचा सिझन नसताना देखील फणसाची चव वर्षभर जिभेवर रेंगाळण्याची मजा काही औरच. सगळ्या फणस प्रेमींनी नक्की फणसाचा रस काढून ठेवा, फणसखंड, फणसाचे सांदण करुन पहा.
या चवीची मजा खास आहे.
फणसखंड कृती
साहित्य-
१ लिटर सायीचे दूध
पाव किलो साखर
पाव किलो फणसाचा रस (साठवून ठेवलेला)
वेलची पावडर 2 चमचे
कृती-
प्रथम दूध तापवून कोमट करून घ्यावे, त्यामध्ये १ चमचा दही लावून (विरजण) दही तयार करून घ्यावे.
दही पातळ मलमल च्या फडक्यात बांधून ८-१० तास ठेवून चक्का तयार करून घ्यावा.
साखर दळून पिठीसाखर तयार करून घ्यावी.
पिठीसाखर, चक्का, फणसाचा रस आणि वेलदोडा पूड एकत्र करून घ्यावे. मिश्रण चाळणीवर घेऊन वाटीने किंवा डावाने दाबून फिरवत चाळणीमधून गाळून घ्यावे. चक्क्यामध्ये असलेल्या गुठळ्या मोडल्या जाऊन एकदम मऊसूद लोण्यासारखे फणसखंड तयार होते.
फणसाच्या आगळ्या वेगळ्या चवीचे हे श्रीखंड अतिशय सुरेख लागते.
करुन पहा हे फणसखंड आणि मस्त वेगळं काहीतरी ट्राय करा..
फणसाचा रस सिझन मध्ये काढून गाळून डब्यामध्ये भरून फ्रिजर मध्ये ठेवून द्यावा. वर्षभर टिकतो.