Join us  

पावसाळ्यात प्यायलाच हवे आमसुलाचे सार; आजीच्या बटव्यातला उपाय -गरमागरम सार प्या,पित्तासह आजार पळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2023 11:35 AM

Amsul or Kokam Saar Authentic Recipe : हे सार नेमके कसे करायचे आणि त्याचे आरोग्याला काय फायदे होतात पाहूया...

उन्हाळ्याच्या दिवसांत ज्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त गार आणि पाणी पोटात जाईल अशा पदार्थांचा आहारात समावेश करतो. त्याचप्रमाणे थंडीत आणि पावसाळ्यात गरम, ताजे आणि घशाला, पोटाला आराम देणारे पदार्थ करतो. विविध प्रकारची सूप, सार या पावसाळ्याच्या दिवसांत आवर्जून केल्या जाणाऱ्या रेसिपी. आपल्याला टोमॅटोचे सार माहित असते पण चिंचेचे किंवा आमसूलाचे सार काही जणांनाच माहित असते. तोंडाला चव आणणारी, झटपट होणारी आणि अतिशय चविष्ट असे हे आमसूल सार पावसाळ्याच्या दिवसांत आवर्जून प्यायला हवे. बाहेर गारवा असल्याने सर्दी, कफ झाला असेल तर घशाला आराम मिळावा म्हणून हे गरम सार अतिशय उपयुक्त ठरते. हे सार नेमके कसे करायचे आणि त्याचे आरोग्याला काय फायदे होतात पाहूया (Amsul or Kokam Saar Authentic Recipe)...

रेसिपी...

साहित्य -

१. आमसूल - ८ ते १० 

२. गूळ - पाव वाटी 

३. कोथिंबीर - पाव वाटी चिरलेली 

४. तिखट - अर्धा चमचा 

५. मीठ - चवीनुसार 

६. लसूण - ४ ते ५ पाकळ्या

(Image : Google)

७. ओलं खोबरं - २ ते ३ चमचे

८. तूप - २ चमचे

९. जीरे - अर्धा चमचा 

१०. हिंग - चिमूटभर कृती -

१. आमसूल स्वच्छ धुवून घ्या 

२. तूपाची फोडणी करा. त्यात जीरे, हिंग आणि लसूण घाला. 

३. फोडणी झाली की त्यात अंदाजे पाणी घाला

४. पाण्यात धुतलेले आमसूल, गूळ, मीठ आणि तिखट आणि किसलेलं किंवा खोवलेले ओलं खोबरं घाला

५. आमसूलाचा रंग उतरायला सुरुवात होईपर्यंत चांगली उकळी येऊद्या. 

६. उकळी आली की गॅस बारीक करा आणि वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. 

७. हे गरमागरम सार पुलाव, खिचडी, पराठा किंवा अगदी कशासोबतही छान लागते.

अमसूल खाण्याचे फायदे 

- अमसूल हे पित्तनाशक आहे. त्यामुळे ज्यांना वारंवार अपचनाचा, पित्ताचा त्रास होतो, त्यांनी अमसूल खावे.

- खाज येणे, पुरळ येणे अशा त्वचाविकारांसाठीही अमसूल फायदेशीर आहे. 

(Image : Google)

- शरीरातील उष्णता कमी करणे, मानसिक ताण आणि थकवा घालविण्यासाठीही अमसूल उपयुक्त ठरते.

- आजारी व्यक्तीसाठीही शारीरिक झीज भरून येण्यासाठी अमसूलाचा सार उपयुक्त ठरतो.

- तोंडाची चव गेली असेल, अन्नावरची वासना उडाली असेल तर अशा व्यक्तींना अमसूलाचा सार अवश्य द्यावा.

-सर्दी, कफ झाला असेल तर घशाला आराम मिळण्यासाठी आणि कफ बाहेर पडण्यासाठी गरम सार पिण्याचा फायदा होतो.

-आमसूलात असलेले व्हीटॅमिन ए आणि इ हे घटक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. 

-रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी आणि हृदयाचे कार्य सुरळीत होण्यासाठी आमसूल अतिशय उपयुक्त ठरते. 

-शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी आमसूल उपयुक्त असते. मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव झाल्यास हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता होऊ शकते. त्यावर उपाय म्हणून आमसूल अतिशय उपयुक्त ठरते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मोसमी पाऊसपावसाळा आणि पावसाळी आजारपण