मस्त रिमझिम बरसणारा पाऊस पडत असेल, तर अशावेळी काहीतरी वेगळं खावंस वाटतं. असं वाटत असेल तर अमसुलाचा सार आणि गरमागरम खिचडी साजूक तुप हा एक झकास बेत होऊ शकतो. अतिशय पाचक असणारे अमसुलाचे सार पावसाळ्यात आवर्जून प्यायला हवे. कारण पावसाळ्यात जठराग्नी मंद झाल्यामुळे अन्न पचनास त्रास होताे. त्यामुळे पचन संस्थेचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी पावसाळ्यात अधूनमधून अमसुलाच्या सारचा डोस घ्यायलाच हवा.
अमसूल खाण्याचे फायदे - अमसूल हे पित्तनाशक आहे. त्यामुळे ज्यांना वारंवार पचनाचा, पित्ताचा त्रास होतो, त्यांनी अमसूल खावे.- खाज येणे, पुरळ येणे अशा त्वचाविकारांसाठीही अमसूल फायदेशीर आहे. - शरीरातील उष्णता कमी करणे, मानसिक ताण आणि थकवा घालविण्यासाठीही अमसूल उपयुक्त ठरते.- आजारी व्यक्तीसाठीही शारीरिक झीज भरून येण्यासाठी अमसूलाचा सार उपयुक्त ठरतो.- तोंडाची चव गेली असेल, अन्नावरची वासना उडाली असेल तर अशा व्यक्तींना अमसूलाचा सार अवश्य द्यावा.
अमसूल सारसाठी लागणारे साहित्य७ ते ८ अमसूल, दीड टेबलस्पून गूळ, १ टिस्पून तूप, दोन बाऊल पाणी, जिरे, हिंग, मध्यम आकाराची हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ
कसा करायचा अमसूल सार?- सगळ्यात आधी तर कोमट पाण्यात अमसूल भिजत घाला. अमसूल साधारणपणे एक तास भिजले पाहिजेत.- यानंतर कुकरच्या भांड्यात हे अमसूल घाला, थोडे पाणी टाका आणि एक शिट्टी झाली की गॅस बंद करा.- कुकर थंड झाल्यावर वाफावलेले अमसूल चांगले चोळून घ्या. चिंचेचा कोळ काढतो, तसाच अमसुलाचा कोळ काढून घ्यावा. गाळणीने गाळून घ्यावा. - यानंतर गाळलेल्या अमसूलाच्या गरात पाणी टाकावे. त्यामध्ये गुळ, मीठ टाकावे आणि ते उकळत ठेवावे.
- दुसरीकडे गॅसवर फोडणीसाठी छोटी कढई ठेवावी. या कढईमध्ये तूप टाकावे. तूप गरम झाले की त्यात जिरे आणि मिरचीचे तुकडे टाकावेत. फोडणी झाली की त्यामध्ये चिमुटभर हिंग घालावे.- केलेली फोडणी अमसूलाच्या सारामध्ये टाकावी. सार उकळत आला की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी आणि गॅस बंद करावा. - गरमागरम सार खिचडीसोबत खायला तर चवदार लागतोच पण आपण सूप म्हणूनही तो पिऊ शकतो.