खिचडी हा घरातल्या प्रत्येकाचाच आवडता पदार्थ आहे. कधी झटपट स्वयंपाक बनवायचा असल्यास आपण पटकन कुकरला खिचडी लावतो. खिचडी अगदी कमी साहित्यात लगेच होणारा पदार्थ आहे. खिचडी पचनाला सोपी आणि पोटाला हलका आहार म्हणून मानली जाते. भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी डाळ खिचडी हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि भात एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर असते. काहीवेळा आपण रात्रीच्या जेवणात हलका आहार म्हणून खिचडी आवडीने खातो. जर कधी रात्री तयार केलेली खिचडी जास्त उरलीच तर फेकून न देता या खिचडीचा वापर करून आपण इटालियन अरिंचिनी (Italian Arancini) घरच्या घरी तयार करू शकतो. यामुळे जास्तीची उरलेली खिचडी वाया जाणार नाही तसेच या खिचडीपासून एक नवीन इटालियन पदार्थ देखील तयार करता येऊ शकतो(Recipe : Khichdi Arancini). साहित्य :-
१. उरलेली खिचडी - १ बाऊल २. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)३. कांदा - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेला) ४. आमचूर पावडर - चवीनुसार ५. गरम मसाला - १/८ टेबलस्पून६. मीठ - चवीनुसार ७. पिझ्झा सिझनिंग (ओरेगॅनो, चिली फ्लेक्स) - १/२ टेबलस्पून ८. मैदा - १ ते २ टेबलस्पून ९. पाणी - गरजेनुसार १०. पापड - ६ ते ७ (भाजून त्याचा चुरा केलेला)११. तेल - तळण्यासाठी
ohcheatday या इंस्टाग्राम पेजवरून उरलेल्या खिचडीपासून इटालियन अरिंचिनी ही इटालियन डिश कशी बनवायची याचे साहित्य व कृती शेअर करण्यात आले आहे.
कृती :-
१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये उरलेली खिचडी घ्यावी. त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, आमचूर पावडर, गरम मसाला, कोथिंबीर, पिझ्झा सिझनिंग, गरम मसाला, मीठ घालून ते एकत्रित करून घ्यावे. २. आता मैदा आणि पाणी यांचे थोडे जाडसर पीठ बनवून घ्यावे. ३. भाजलेल्या पापडाचा चुरा करून घ्यावा. ४. आता या खिचडीच्या मिश्रणाचे छोटे गोल बॉल्स तयार करून घ्यावेत.
५. त्यानंतर तयार झालेले बॉल्स मैदा आणि पाणी यांच्या जाडसर मिश्रणात भिजवून घ्यावेते. ६. मग पापडाचा तयार केलेला चुरा एका बाऊलमध्ये घेऊन त्यात हे गोल बॉल्स घोळवून घ्यावेत. ७. एका कढईत तेल गरम करून घ्यावेत. या गरम तेलात हे बॉल्स सोडून खरपूस तळून घ्यावेत.
उरलेल्या खिचडीपासून इटालियन अरिंचिनी (Italian Arancini) खाण्यासाठी तयार आहे.