अभिनेत्री अनुष्का शर्माच्या चेहेर्यावर कायम उत्साह दिसतो. एक अभिनेत्री आणि निर्माती म्हणून ती किती महत्त्वाकांक्षी आहे हे तिने दाखवून दिलं आहे. आई झाल्यानंतरही अनुष्का शर्माच्या चेहेर्यावर कधीच थकवा दिसत नाही. तिच्यातला उत्साह आणि ऊर्जा सतत सळसळून वाहात असते. तिच्यातल्या उत्साहाचं आणि ऊर्जेचं गुपित तिनं नुकतंच इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधे शेअर केलं आहे. ही पोस्ट तिनं आपल्या प्रिय कॉफीसाठी लिहिली आहे. यात ती लिहिते की, ‘ माझं कॉफीवर खूप प्रेम आहे. या कॉफीनेच मला आशावादी बनवलं आहे.’ कॉफीबद्दलच्या अनुष्काच्या भावनांशी अनेक कॉफी प्रेमी सहमत असतील. स्वत:ही कॉफीबद्दल असंच काही अनुभवत असतील हे नक्की!
कॉफीमधे उत्साह पेरण्याची ताकद आहे. अजूनही ज्यांना कॉफी पिण्याबद्दल द्विधा असेल त्यांनी कॉफीचे फायदे अवश्य समजून घ्यावेत. एखादा दिवस खूप कंटाळवाणा आणि उदास करणारा असतो. तेव्हा कॉफी पिल्यास मूड एकदम छान होतो. कॉफीने मूड सुधारण्याचं शास्त्रीय कारण आहे. कॉफीमुळे मेंदूत आनंदी आणि उत्साही करणारे सेरोटोनिन, नोराड्रेनलाइन आणि डोपामाइन ही संप्रेरकं स्त्रवतात.
फिल्टर कॉफी
कॉफीमुळे चवीच्या ज्ञानपेशींना बळ मिळून ती सुधारते. त्यामुळे तोंडाची चव गेली असल्यास अवश्य कॉफी प्यावी. वेगवेगळ्या चवीची आणि पध्दतीची कॉफी पिण्याचा कधीच कंटाळा येत नाही. अनेक कॉफी प्रेमींना दक्षिण भारतीय फिल्टर कॉफी आवडते. फेसाळ आणि स्ट्रॉंग असलेली ही फिल्टर कॉफी सकाळच्या वेळेस अंगात असलेला आळस घालवण्यासाठीचा उत्तम उपाय आहे. कपाच्या ऐवजी ती स्टीलच्या ग्लासात पिण्यात मजा आहे. उत्तम चवीची अस्सल फिल्टर कॉफी ही फक्त रेस्टॉरण्टमधेच मिळते असं नाही. ती घरीही करता येते. फिल्टर कॉफीचे चहाते असाल तर घरी फिल्टर कॉफी बनवण्याचं छोट्य डब्यासारखं दिसणारं सच्छिद्र दोन ताली भांडं घेऊन यावं. सोबत झाकण आणि कॉफी दाबण्यासाठी प्रेसरही मिळतं.वरच्या भांड्यात कॉफी पावडर टाकून ती प्रेसरने दाबावी. आणि वरुन गरम पाणी टाकून खालच्या भांड्यात ती झिरपू द्यावी. फिल्टर कॉफी करणं एकदम सोपं आहे. एक पाव कप स्टॉंग कॉफी पावडर घ्यावी. ती प्रेसरनं दाबावी. एक कप पाणी उकळावं. ते उकळलं की लगेच कॉफी पावडरवर ओतावी. भांड्याला वरुन झाकण लावावं.कॉफीचं पाणी खालच्या भांड्यात झिरपू द्यावं. एक पंधरा वीस मिनिटं लागतात. मग कॉफीचं द्रावण घ्यावं. दूध गरम करावं. ते चांगलं गरम झालं की कॉफीच्या द्रावणात टाकावं. आवडीनुसार साखर टाकावी की अस्सल फिल्टर कॉफी तयार.
कॅपुचिनो कॉफी
कॉफीचा आणखी एक प्रकार खूप लोकप्रिय आहे. छान गप्पांचा फड जमला की त्याला रंगत आणण्यासाठी खास कॅपुचिनो कॉफी मागवली जाते. घट्ट आणि क्रीमी टेक्श्चरची ही कॉफी सोबत बनपाव किंवा बिस्कीट की मन तृप्त होतं. कॅफे आणि रेस्टॉरण्टमधे जाऊन पिता येणारी ही कॅपुचिनो ही घरीही तयार करता येते. यासाठी भांड्यात दोन कप दूध घ्यावं. त्यात एक दालचिनीचा तुकडा घालावा. आणि दुधाला उकळी आणावी. उकळी आल्यानंतर मंद गॅसवा दूध उकळू द्यावं. मग दुधातून दालचिनीचा तुकडा काढून टाकावा. अर्धा कप कॉफी पावडर घ्यावी. त्यात चवीपुरती साखर घालावी. गरम दूध ती फेसाळ करण्यासाठी अगदी वरुन कपात ओतावं. सर्वात शेवटी त्यावर दालचिनीची पूड भुरभुरावी.
मिंट कॉफी
एखाद्या संध्याकळी स्वत:ला किंवा आपल्यासोबत इतरांनाही काहीतरी चवदार ट्रीट द्यावीशी वाटत असल्यास मिंट अर्थात पुदिना कॉफी करावी. या कॉफीचं वैशिष्ट्य म्हणजे ती बर्फ आणि पुदिन्यामुळे थंड गुणाची होते. या कॉफीची आणखी मजा येण्यासाठी त्यात आलं, वेलची, किसलेलं चॉकलेट घालावं. मसाले आणि चॉकलेटमुळे कॉफीची चव भन्नाट होते. त्यावर जायफळ पूड भुरभुरल्यास अशी कॉफी म्हणजे चवीचा सोहळा . मिंट कॉफी घरच्या घरी तयार करणं अतिशय सोपं आहे. शेकरमधे 5-6 पुदिन्याची पानं आणि साखर घालून ते चांगलं एकत्र करुन घ्यावं. मग त्यात बर्फ, कॉफी पावडर आणि दूध घालावं. आणि शेकरमधे ते छान एकत्र करुन घ्यावं. कॉफी कपात ओतल्यावर वर पुदिन्याची पानं ठेवावी. संध्याकाळचा उत्साह वाढवण्यासाठी ही अशी मिंट कॉफी बेस्ट आहे.