बाळांतपणानंतर तीन महिन्यात आपल्या नेहेमीच्या फॉर्ममधे परतलेली अनुष्का शर्मा म्हणजे सर्वांच्याच कौतुकाचा विषय. अनुष्काला हे जमलं ते तिच्यात असलेल्या शिस्तबध्दतेमुळे. आहार-विहाराच्या बाबतीत अतिशय काटेकोर असलेली अनुष्का म्हणूनच फिट दिसते. पण अनुष्का ही खाण्याचे खूप शौकिन आहे. विविध पदार्थांबद्दलच्या तिच्या पोस्ट कायम व्हायरल होत असतात. आपल्या खाण्यापिण्याच्या पोस्टमधूनही अनुष्का आरोग्यदायी जगण्यासाठीच्या आहाराचे पर्याय सूचवत असते. अनुष्काने इन्स्टाग्रामवर पाच दिवसांपूर्वी शेअर केलेली ‘ब्रेकफास्ट इन जार’ची स्टोरी खूपच व्हायरल होत आहे. अनुष्काच्या या पोस्टमुळे नाश्त्याचा हा नवीन आणि पौष्टिक ट्रे्ण्ड वाचकांपर्यंत आणि तिच्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचला आहे.
Image: Google
जार ब्रेकफास्ट काय आहे हा ट्रेण्ड?
जार ब्रेकफास्ट म्हणजे काचेच्या बरणीतला नाश्ता. आपल्याला काचेची बरणी माहिती असते ती लोणचं वगैरे ठेवण्यासाठीच. पण अनुष्कानं आपल्या इन्स्टा स्टोरीतून काचेच्या बरणीतून आरोग्यदायी नाश्ता करण्याचा पर्याय सूचवला आहे. अनुष्काच्या स्टोरीतील फोटोत एक काचेची बरणी दिसते. या बरणीला तिने ‘ब्रेकफास्ट इन जार’ असं टायटल दिलं आहे. फोटोत दिसणार्या या बरणीत बरेच पदार्थ एकत्र केलेले दिसतात. मुळातच जार ब्रेकफास्टचे फोटोच इतके आकर्षक असतात की केवळ फोटो पाहूनही तोंडाला पाणी सुटतं. अनुष्कानं टाकलेल्या बरणीच्या फोटोच्याबाबतीतही असंच झालं. अनुष्काच्या या बरणीत आहे काय? असा प्रश्न पाहणार्यांना पडतोच. तर तिच्या या बरणीत एक आरोग्यदायी आणि चविष्ट नाश्ता आहे. हा पदार्थ आहे ‘ सिम्पल ओव्हरनाइट ओटस विथ चिया सीडस’
सकाळच्या घाईत कधी कधी नाश्ता करायचा राहातो. पण अनुष्कासाठी सकाळचा नाश्ता ही आवश्यक बाब आहे. निरोगी आणि परफेक्ट शेपमधे राहाण्यासाठी आरोग्यदायी नाश्ता हवाच असं अनुष्का म्हणते. नाश्ता करायला मजा यायला हवी यासाठी त्यात वैविध्य हवं. हे वैविध्य कसं आणता येईल त्याचं उदाहरण म्हणजे अनुष्कानं सुचवलेला ‘ब्रेकफास्ट इन जार’. नाश्त्याच्या पदार्थांमधे ओटस, चिया सीडस यांच्या समावेशामुळे सकाळच्या वेळेस शरीराला आवश्यक ते पौष्टिक घटक मिळतात. नाश्त्याला ओटसचे विविध प्रकार करता येतात. पण ओटस न शिजवता करता येणार प्रकार अनुष्कानं या ब्रेकफास्ट इन जार या संकल्पनेतून सुचवला आहे. यात ओटस आहे पण ते शिजवलेले नाही तर रात्रभर भिजवलेले आहे. ओटस रात्रभर भिजवून खाल्ल्याने त्यातील गुणधर्म आणि पौष्टिकता वाढते. तसेच ओटसमधील स्टार्चचं विघटन होतं जे पचनासाठी अतिशय लाभदायक असतं. ओटस हे पाण्यात, बदामाच्या दुधात, नारळाच्या दुधात भिजवता येतात.
Image: Google
तसेच जार ब्रेकफास्ट मधील बहुतांश पदार्थात चिया सीडस असतात. याचं कारण चिया सीडस पदार्थातील पौष्टिकता वाढवतात. चिया सीडसमधे प्रथिनं, अ, ब, ड, ई ही जीवनसत्त्वं, फॅटी अँसिडस, मॅग्नेशियम, फायबर, थायमिन या पौष्टिक घटकांसोबतच भरपूर प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस असतात. चिया सीडसमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. स्तनाचा, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर या आजारांचा धोका कमी होतो. चिया सीडसमुळे चयापचय क्रिया सुधारते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी चिया सीडस आहारात असणं आवश्यक मानलं जातं. जार ब्रेकफास्टमधे ओटस, चिया सीडस, फळं, सुकामेवा, वेगन मिल्क हे घटक महत्त्वाचे मानले जातात.
Image:Google
अनुष्काची ब्रेकफास्ट इन जार रेसिपी
अनुष्कानं इन्स्टावर शेअर केलेल्या स्टोरीमधील ब्रेकफास्ट इन जार मधील पदार्थाचं नाव ओटस विथ चिया सीडस हे आहे. या पदार्थाची रेसिपी अगदीच सोपी आहे.हा जार ब्रेकफास्ट करण्यासाठी दोन तृतियांश कप रोल्ड ओटस, 2 मोठे चमचे चिया सीडस, 1 कप बदामाचं दूध, 2 मोठे चमचे मॅपल सिरप, 1 मोठा चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट आणि चिमूटभर मीठ एवढंच जिन्नस लागतं.हे सर्व घटक एका काचेच्या बरणीत एकत्र करायचे. बाटलीचं झाकणं नीट लावायचं. बाटली चांगली हलवून घ्यायची. ही बाटली दोन तास फ्रिजमधे ठेवावी. किंवा रात्रभर फ्रिजमधे ठेवावी. सकाळी खाताना जर बाटलीतलं मिश्रण घट्ट वाटलं तर त्यात थोडं बदामाचं दूध घालावं.
Image: Google
क्रीमी कोकोनट चिया पुडिंग
जार ब्रेकफास्टसाठीचा हा एक चविष्ट पर्याय आहे. यासाठी एक कप नारळाचं दूध, 2 मोठे चमचे मॅपल सिरप, 1 मोठा चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट, 2 मोठे चमचे चिया सीडस , आपल्या आवडीच्या फळाचे तुकडे घ्यावेत.हे सर्व जिन्नस एका काचेच्या बरणीत घालून बरणीचं झाकणं घट्ट लावावं. बरणी चांगली हलवून घ्यावी. रात्रभर ती फ्रिजमधे ठेवावी.
चॉकलेट कोकोनट ओव्हरनाइट ओटस
Image: Google
हा जार ब्रेकफास्ट करण्यासाठी एक तृतियांश कप दही, अर्धा कप रोल्ड ओटस, दोन तृतियांश कप नारळाचं दूध, 1 मोठा चमचा चिया सीडस, अर्धा चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट, 2 मोट्हे चमचे मॅपल सिरप, 2 मोठे चमचे साखर विरहित कोका पावडर आणि ओल्या नारळाचे पापुद्रयाप्रमाणे पातळ काप घ्यावेत.हे सर्व घटक एका काचेच्या बरणीत भरावेत. बरणीचं झाकण घट्ट लावून बरणी चांगली हलवून घ्यावी. बरणी किमान चार तास फ्रिजमधे ठेवावी. रात्रभर ठेवली तरी चालते.